दिल्ली महापौर निवडणुकीत मोठा गोंधळ; AAP आणि BJP नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 04:01 PM2023-01-06T16:01:32+5:302023-01-06T16:01:45+5:30

आज राजधानी दिल्लीत महापौरपदाची निवडणूक होणार होती, पण नगरसेवकांच्या गोंधळानंतर पुढे ढकलण्यात आली आहे.

Delhi Mayor Election; Clash between AAP and BJP corporators, before the commencement of voting for the Delhi Mayor elections | दिल्ली महापौर निवडणुकीत मोठा गोंधळ; AAP आणि BJP नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी, कारण काय..?

दिल्ली महापौर निवडणुकीत मोठा गोंधळ; AAP आणि BJP नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी, कारण काय..?

googlenewsNext

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतमहापौरपदाच्या निवडणुकीत मोठा गोंधळ झाला. सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजप आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची आणि हाणामारी झाली. यादरम्यान, अनेक नगरसेवकांनी खुर्च्या उचलून एकमेकांवर फेकण्यास सुरुवात केली. तर काहींनी टेबलावर चढून पीठासीन अधिकाऱ्यांसमोर घोषणाबाजीही केली. गदारोळानंतर महापालिकेचे कामकाज पुढे ढकलण्यात आले. यानंतर दोन्ही पक्षांतून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू झाल्या आहेत.

आपचा या गोष्टीला विरोध
आज दिल्लीच्या महापौरांची निवड होणार होती, मात्र त्यापूर्वी पीठासीन अधिकाऱ्याची निवड झाली आणि त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्याने प्रथम नामनिर्देशित नगरसेवकांना शपथ घेण्यासाठी बोलावले. यावरून आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी गदारोळ सुरू केला. पीठासीन अधिकाऱ्याने नामनिर्देशित नगरसेवकांना बोलावताच आप नेते मुकेश गोयल यांनी उभे राहून विरोध केला आणि गेल्या 15 वर्षांपासून हे होत आहे, आता ते बदलावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ सुरू केला.

आपचा भाजपवर आरोप
घंटानाद झाल्यानंतर आप नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी पीठासीन अधिकाऱ्यांच्या टेबलासमोर घोषणाबाजी केली. दरम्यान, दिल्लीतील महापौरपदाच्या निवडणुकीत विजय-पराजय अत्यंत कमी फरकाने होणार, त्यासाठी दोन्ही पक्ष जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत. 10 नामनिर्देशित नगरसेवकांना मतदानाचा अधिकार देण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप 'आप'कडून करण्यात येत आहे.

भाजपचा आपवर गंभीर आरोप
महापालिकेच्या कामकाजात गदारोळ झाल्यानंतर भाजपचे खासदार प्रवेश वर्मा म्हणाले की, आमच्या महिला नगरसेवकांशी गैरवर्तन करण्यात आले. दारुच्या नशेत आलेल्या नगरसेवकांनी धारदार वस्तू, काचेच्या तुकड्याने जखमी केले आणि केसही ओढले. यासोबतच भाजपच्या महिला नगरसेवकाने आपल्याला शिवीगाळ करुन शपथ घेण्यापासून रोखल्याचा आरोप केला आहे. एमसीडीच्या इतिहासात यापेक्षा काळा दिवस असू शकत नाही.

काँग्रेसने निवडणुकीत भाग घेतला नाही
काँग्रेसने महापौरपदाच्या निवडणुकीत भाग घेतला नाही. याबाबत आम आदमी पक्षाकडून भाजप आणि काँग्रेसमध्ये करार झाला आहे, त्यामुळे काँग्रेसने निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला. आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज म्हणाले की, काँग्रेस-भाजपमधील डील उघड झाली आहे. काँग्रेसने घराबाहेर राहिल्यास महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपसाठी चांगलेच होईल आणि काँग्रेसनेही त्यास सहमती दर्शवली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्यासाठी भाजपने एमसीडीमधील काँग्रेसचे नेते नाझीश दानिश यांना हज समितीचे सदस्य बनवले असल्याचा आरोप आप नेत्याने केला आहे.

Web Title: Delhi Mayor Election; Clash between AAP and BJP corporators, before the commencement of voting for the Delhi Mayor elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.