लखनऊ - उत्तर प्रदेशातील रायबरेलीत बुधवारी एक मोठी दुर्घटना झाली. नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशनच्या (एनटीपीसी)  उंचाहार प्लांटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट झाला होता. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा वाढला असून, 26 पर्यंत पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 200 हून अधिक लोक दुर्घटनेत जखमी झाले होते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी घटनेचं गांभीर्य ओळखत आपला गुजरात दौरा अर्ध्यातच सोडला आणि जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी पोहोचले. राहुल गांधींनी जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांची भेट घेत शक्य ती मदत करण्याचं आश्वासन दिलं. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीदेखील घटनेनंतर शोक व्यक्त केला होता. 

रायबरेलीच्या खासदार असणा-या सोनिया गांधी यांनी आपण पीडित कुटुंबांच्या दुखात सहभागी असल्याचं सांगितलं होतं. जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी स्वत: सोनिया गांधींना येण्याची इच्छा होती, मात्र प्रकृती खराब असल्या कारणाने त्या जाऊ शकल्या नाहीत. त्यांच्या खासगी सचिवाने रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली होती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घटनेवर शोक व्यक्त केला होता. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे.  

जिल्हाधिकारी संजय कुमार यांनी दुर्घटनेबद्दल सांगतना सकाळी, आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. तर 66 जण गंभीर जखमी झाले आहेत. एनडीआरएफचं एक पथक बचावकार्याचं काम करत आहे. दुर्घटनेच्या तपासासाठी एक पथक गठीत करण्यात आलं असून, यामध्ये मॅजिस्ट्रेट आणि तांत्रिक अधिका-यांचा समावेश आहे. 

रायबरेलीच्या उंचाहार येथील एनटीपीसी प्लांटमध्ये बॉयरलचा स्फोट झाला होता. आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्रीपर्यंत 18 जणांच्या मृत्यूची माहिती दिली होती. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना जिल्हा रुग्णालयासहित अलाहाबादच्या रुग्णालयात आणि लखनऊमधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यामधील अनेकांची स्थिती नाजूक आहे. दुर्घटना झाली तेव्हा जवळपास 150 कामगार प्लांटमध्ये काम करत होते. तसंच त्यावेळी 500 मेगावॅट वीजनिर्मिती सुरु होती. 
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.