गुजरात निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधींकडे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 10:50 PM2017-11-18T22:50:29+5:302017-11-18T22:50:39+5:30

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरविण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या सोमवारी बोलाविली आहे. ही निवडणूक गुजरात निवडणुकीच्या पहिल्या फेरीचे मतदान ९ डिसेंबर रोजी होण्याआधी पार पडेल आणि सध्या उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी औपचारिकपणे पक्षाची धूरा हाती घेतील, हे आता नक्की मानले जात आहे.

cwc to meet on monday set ball rolling for rahuls elevation | गुजरात निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधींकडे?

गुजरात निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधींकडे?

Next

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरविण्यासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या सोमवारी बोलाविली आहे. ही निवडणूक गुजरात निवडणुकीच्या पहिल्या फेरीचे मतदान ९ डिसेंबर रोजी होण्याआधी पार पडेल आणि सध्या उपाध्यक्ष असलेले राहुल गांधी औपचारिकपणे पक्षाची धूरा हाती घेतील, हे आता नक्की मानले जात आहे.
बरोब्बर एक वर्षापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काँग्रेस कार्यकारिणीने राहुल गांधींनी सूत्रे हाती घ्यावी, अशी एकमुखी विनंती केली होती. त्यानंतर पक्षाच्या निवडणुका झाल्या. पण पक्षाध्यक्षपदाची निवडणूक मात्र लांबणीववर पडत गेली होती. शिवाय स्वत: राहुल गांधींनी नेमणुकीपेक्षा निवडून येण्याचा आग्रह धरला होता.

पक्षाच्या सूत्रांंनी दिलेल्या माहितीनुसार एम. रामचंद्रन यांच्या अध्यक्षतेखालील पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाने आता या निवडणुकीसाठी विविध संभाव्य तारखांचा कार्यक्रम दिला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतादन व निकाल जाहीर करण्यापर्यंतचे सर्व टप्पे १२ ते १४ दिवसांत पूर्ण होऊ शकतील, अशी तरतूद आहे. यापैकी नेमक्या कोणत्या तारखेला निवडणूक घ्यायची हे ठरविण्याचा अधिकार कार्यकारिणीस असला तरी गुजरात निवडणुकीच्या आधी पूर्ण होईल, असा निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केला जाईल, असे दिसते. यानुसार राहुल गांधी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेस अध्यक्षपदी निवडून येऊ शकतील.

सन २००४ मध्ये सक्रिय राजकारणात आलेल्या राहुल गांधींना सन २०१३ मध्ये पक्षाचे उपाध्यक्ष केले गेले. त्यानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आजारपणामुळे पक्षाचा कारभार लौकिक अर्थाने तेच चालवीत होते. आता गुजरात व हिमाचल प्रदेश निवडणूक प्रचाराची धूराही तेच मोठ्या आक्रमकतेने सांभाळत आहेत.
 
सोनियाजी मार्गदर्शक
सन १९८९ पासून काँग्रेस अध्यक्षा असलेल्या सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक दीर्घकाळ पदावर राहिलेल्या पक्षाध्यक्षा आहेत. राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाल्यावर सोनिया गांधींची पक्षात भूमिका कोणती राहील याचाही निर्णय सोमवारी होईल की त्यासाठी कार्यकारिणीची नंतर वेगळी बैठक होईल, हे लगेच स्पष्ट झाले नाही. तरीही सोनियाजी पक्षाच्या मार्गदर्शक व काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी कायम राहतील, असे संकेत पक्षातून मिळाले.

Web Title: cwc to meet on monday set ball rolling for rahuls elevation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.