उत्तर प्रदेशात काँग्रेसचे दमदार उमेदवार; सपा-बसपाचे टेन्शन वाढवणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 09:32 AM2019-03-25T09:32:55+5:302019-03-25T09:52:51+5:30

काँग्रेसने काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसने दमदार उमेदवार दिल्याने या ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Congress strong candidate in Uttar Pradesh | उत्तर प्रदेशात काँग्रेसचे दमदार उमेदवार; सपा-बसपाचे टेन्शन वाढवणार 

उत्तर प्रदेशात काँग्रेसचे दमदार उमेदवार; सपा-बसपाचे टेन्शन वाढवणार 

Next

लखनौ - सपा-बसपाने केलेल्या महाआघाडीत स्थान न मिळाल्याने काँग्रेसनेउत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. प्रियंका गांधी यांना पक्षात महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आल्यानंतर काँग्रेसनेउत्तर प्रदेशात जोरदार प्रचार मोहीमही हाती घेतली आहे. दरम्यान, राज्यातील काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसने दमदार उमेदवार दिल्याने या ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच काँग्रेसच्या उमेदवारांमुळे सपा-आणि बसपाचे टेन्शन वाढले असून, महाआघाडी आणि कांग्रेसमध्ये होणाऱ्या मतविभागणीमुळे काही मतदारसंघात सहज विजय मिळेल, अशी आशा भाजपाच्या मनात निर्माण झाली आहे. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशाता काँग्रेसची दाणादाण उडाली होती. मात्र त्याही परिस्थितीत गाझियाबाद, सहारनपूर, लखनौ, कानपूर, बाराबंकी आणि कुशीनगर येथे काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढती रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच काही ठिकाणी बीएसपीचे उमेदवार कमकुवत भासत आहेत, अशा परिस्थितीत महाआघाडीला मत द्यायचे की काँग्रेसला असा भ्रम  मतदारांच्या मनात निर्माण होऊ शकतो. तसेच काही शहरी मतदारसंघांमध्ये भाजपाविरोधात काँग्रेसच मुख्य प्रतिस्पर्धी आहे. अशा ठिकाणी सपा बसपाकडे दमदार नेते नाहीत, तिथेही काँग्रेसविरुद्ध भाजपा अशीच लढत रंगू शकते. 

  मतदारसंघांचा विचार केल्यास काँग्रेसने सहारनपूर येथून इम्रान मसूद यांना तिकीट दिले आहे. भाजपाविरोधात घणाघाती वक्तव्ये करणाऱ्या मसूद यांची मुस्लिम मतदारांवर चांगली पकड आहे. त्यामुळे ते सपा-बसपाच्या व्होट बँकेला सुरुंग लावू शकतात. अशा परिस्थितीत भाजपा उमेदवार राघव लखनपाल यांना मतविभागणीचा फायदा मिळू शकतो. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना आता मुरादाबादऐवजी फतेहपूर सिक्री येथून उमेदवारी देण्यात आली आहे. येथे एकदा त्यांचा निसटत्या फरकाने पराभव झाला होता. मात्र यावेळी त्यांचा दावा मजबूत दिसत आहेत. इथेही तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. तसेच इथेही काँग्रेस आणि सपा-बसपा आघाडीत मतविभागणी होण्याचा धोका आहे. 

 माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांना फार्रुखाबाद मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.  तिथेही मुस्लिम मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी होण्याची शक्यता आहे. तर अलीगड येथे बसपाने दिलेले उमेदवार अजित बालयान हे बाहेरचे आहेत, मात्र ते मोठ्या प्रमाणावर मतविभागणी घडवून आणू शकतात. काँग्रेसने इथे बृजेंदर सिंह यांना ऊमेदवारी दिली आहे. त्यांना मुस्लिम मतदारांचा चांगला पाठिंबा आहे. 

 गाझियाबाद येथे काँग्रेसला बऱ्यापैकी समर्थन प्राप्त आहे. मात्र 2014 साली भाजपा उमेदवार जनरल व्ही. के. सिंह यांनी काँग्रेस उमेदवार राज बब्बर यांचा दारुण पराभव केला होता. यावेळी  काँग्रेसने गाझियाबाद येथून डॉली शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.  

समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बाराबंकी येथे 2009 मध्ये पी. एल. पुनिया यांनी विजय मिळवला होता. तर 2014 मध्ये भाजपाच्या प्रियंका रावत यांनी पुनिया यांचा पराभव केला होता. यावेळी पुनिया यांचे पुत्र तनुज यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. पण सपा-बसपा आघाडीला मतांचे गणित आपल्या बाजूने फिरण्याची आशा आहे. 

 तर कानपूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. येथेही तिरंगी लढतीचा लाभ भाजपाला होऊ शकतो. तर कुशीनगरमध्ये काँग्रेसचे नेते आरपीएन सिंह यांचा भाजपासोबत थेट मुकाबला आहे. मात्र येथेही तिरंगी लढतीमुळे भाजपा फायदा होऊ शकतो.  
 

Web Title: Congress strong candidate in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.