नरेंद्र मोदी डरपोक; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:09 PM2019-02-07T15:09:48+5:302019-02-07T16:22:54+5:30

पंतप्रधान मोदींसह भाजपा, संघावर राहुल गांधींची घणाघाती टीका

congress president rahul gandhi slams pm narendra modi bjp and rss | नरेंद्र मोदी डरपोक; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

नरेंद्र मोदी डरपोक; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

googlenewsNext

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्याही मंचावर माझ्यासोबत 10 मिनिटं चर्चा करावी. पण ते घाबरतात. त्यांच्या चेहऱ्यावर आता भीती स्पष्ट जाणवू लागली आहे. ते अतिशय भित्रे आहेत, अशा शब्दांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. दिल्लीत पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीला राहुल यांनी संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घणाघाती टीका केली. 




जाती-धर्मांमध्ये देशाचे तुकडे केल्यानं, द्वेष पसरवल्यानं भारतावर राज्य करता येत नाही, हे आता मोदींच्या लक्षात आलं आहे. देशाच्या पंतप्रधानांनी जोडण्याची भाषा करायला हवी. जो देशाला तोडण्याची भाषा करेल, त्याला पंतप्रधान पदावरुन हटवण्यात येईल, अशी टीका राहुल यांनी केली. मोदींची छाती 56 इंचांची आहे, असं आधी म्हटलं जायचं. त्यांची सत्ता 15 वर्षे कायम राहणार असल्याचंही बोललं जात होतं. मात्र आज मोदींची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे, असं म्हणत राहुल यांनी हल्लाबोल केला. 




मोदींचा खरा चेहरा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशासमोर आणला आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेस नरेंद्र मोदी, भाजपा आणि संघाचा पराभव करेल, असं राहुल म्हणाले. यावेळी राहुल यांनी चौकीदार चोर है अशा घोषणादेखील दिल्या. देशातील चौकीदार आज माझ्यावर रागावतात. तुम्ही आमची बदनामी करता, अशी त्यांची तक्रार असते. मात्र मला देशातील चौकीदारांचा अपमान करायचा नाही. मी फक्त एकाच चौकीदाराबद्दल बोलतो, ज्यानं चोरी केली आहे, असा टोला राहुल यांनी लगावला. 




आगामी निवडणूक ही दोन विचारांमधील लढाई आहे. यातील एक विचारधारा हा देश सर्वांचा असल्याचं म्हणते. तर दुसरी विचारधारा हा देश केवळ एका समुदायाचा असल्याचा दावा करते. देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आजाद होते. देशाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाचा पाया विक्रम साराभाईंनी रचला. देशाच्या आर्थिक प्रगतीचा विचार केल्यास मनमोहन सिंग यांच्या नावाचा आदरानं उल्लेख करावा लागेल, असं राहुल म्हणाले. भाजपा अध्यक्ष अमित शहांना हा देश म्हणजे एक उत्पादन वाटतो. ते या देशाला सोने की चिडिया समजतात. त्या सोन्याचा फायदा देशातल्या मोजक्या लोकांना व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे, अशा शब्दांमध्ये राहुल भाजपावर तुटून पडले. 

Web Title: congress president rahul gandhi slams pm narendra modi bjp and rss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.