अमेठी, रायबरेलीत एकतरी बूथ जिंकून दाखवा; अमित शहांना काँग्रेसचं खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 04:29 PM2018-06-05T16:29:44+5:302018-06-05T16:32:13+5:30

'शहा अपयशी ठरल्यास त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा'

congress mlc deepak singh challenge bjp president amit shah statement to win amethi or raebareli | अमेठी, रायबरेलीत एकतरी बूथ जिंकून दाखवा; अमित शहांना काँग्रेसचं खुलं आव्हान

अमेठी, रायबरेलीत एकतरी बूथ जिंकून दाखवा; अमित शहांना काँग्रेसचं खुलं आव्हान

Next

अमेठी: नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशातील कैराना आणि नुरपूर पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव केल्यानं विरोधकांचं मनोबल उंचावलं आहे. भाजपाला 2019 मध्ये केंद्रातील सत्ता राखायची असल्यास, उत्तर प्रदेशातील कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदारानं थेट भाजपा अध्यक्ष अमित शहांना खुलं आव्हान दिलं आहे. 'अमेठी, रायबरेली मतदारसंघ जिंकणं दूरच, या मतदारसंघातील एकतरी बूथ जिंकून दाखवा,' असं आव्हान काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार दीपक सिंह यांनी शहांना दिलं आहे. दीपक सिंह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. 





काही दिवसांपूर्वीच अमित शहांनी काँग्रेसचे परंपरागत मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या अमेठी आणि रायबरेलीवरुन काँग्रेसवर निशाणा साधला होता. येत्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपा विजयी होईल, असं शहांनी म्हटलं होतं. राहुल गांधी अमेठी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. तर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार आहेत. अमेठी आणि रायबरेलीवर भाष्य करत अमित शहांनी थेट राहुल आणि सोनिया गांधींना आव्हान दिलं होतं. शहांनी दिलेल्या या आव्हानाला आता काँग्रेसनं प्रतिआव्हान दिलं आहे. 

काँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांनी ट्विट करत शहांना थेट आव्हान दिलं आहे. 'अमेठी-रायबरेलीमधील एक जागा अमित शहा भाजपाला जिंकून देणार आहेत? स्वप्न पाहणं वाईट नाही. मात्र शहांना मी आव्हान देतो की, त्यांनी अमेठी-रायबरेलीतील किमान एका बूथवर भाजपाला यश मिळवून द्यावं. अमित शहांनी एकतरी बूथ जिंकला, तर मी आमदारकीचा राजीनामा देईन आणि शहा अपयशी ठरले, तर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा,' असं आव्हान सिंह यांनी दिलं. 



 

Web Title: congress mlc deepak singh challenge bjp president amit shah statement to win amethi or raebareli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.