काँग्रेसने ७ जागा सपा-बसपाला सोडल्या; मायावती, मुलायमविरोधात उमेदवार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 06:08 AM2019-03-18T06:08:21+5:302019-03-18T06:08:36+5:30

उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीने काँग्रेससाठी अमेठी व रायबरेली मतदारसंघात उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसनेही सपा-बसपाच्या सात मतदारसंघांत आपले उमेदवार न देण्याचे ठरविले आहे.

Congress leaves SP, BSP in 7 seats; There is no candidate against Mayawati, Mulayam | काँग्रेसने ७ जागा सपा-बसपाला सोडल्या; मायावती, मुलायमविरोधात उमेदवार नाही

काँग्रेसने ७ जागा सपा-बसपाला सोडल्या; मायावती, मुलायमविरोधात उमेदवार नाही

Next

लखनौ : उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीने काँग्रेससाठी अमेठी व रायबरेली मतदारसंघात उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसनेही सपा-बसपाच्या सात मतदारसंघांत आपले उमेदवार न देण्याचे ठरविले आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व अभिनेते राज बब्बर यांनी रविवारी ही घोषणा केली.
सपाचे नेते मुलायम सिंह यादव, अक्षय यादव, डिंपल यादव, बसपाच्या प्रमुख मायावती व राष्ट्रीय लोक दलाचे नेते अजित सिंह व जयंत चौधरी यांच्या मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार नसतील. तसेच अखिलेश यादव यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास, तिथेही काँग्रेसचा उमेदवार नसेल, असे राज बब्बर यांनी स्पष्ट केले आहे. अखिलेश यादव आझमगडमधून निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे.
याखेरीज भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर यांच्याविरोधातही काँग्रेसचा उमेदवार नसेल. चंद्रशेखर यांनी वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी चार दिवसांपूर्वी रुग्णालयात जाऊन चंद्रशेखर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्याचवेळी काँग्रेस त्यांच्या भीम आर्मीशी समझोता करेल, असे बोलले जात होते.
राज्यात पप्पू यादव यांच्या जन अधिकार पक्षाशीही काँग्रेसचा समझोता झाला आहे. त्यानुसार त्या पक्षासाठी पाच जागा सोडण्यात आल्या आहेत. त्यापैकी दोन जागांवर त्या पक्षाचे उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
राज्यात भाजपा, सपा- बसपा-रालोद आघाडी व काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार असली तरी अन्य छोट्या राजकीय पक्षांनीही आमची वोट बँक ‘निर्णायक’ असल्याचे सांगितले आहे. निशाद पार्टी, अपना दल (एस), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी आणि अन्य पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती तयार करण्यात व्यग्र आहेत. अपना दलच्या अनुप्रिया पटेल गटाने भाजपाशी पुन्हा समझोता केला आहे. त्या केंद्रात राज्यमंत्री आहेत.
निशाद पार्टीचे अध्यक्ष संजय निशाद म्हणाले, सपा-बसपा-रालोद आघाडीमध्ये आमचाही सहभाग आहे. सपाच्या कोट्यातून दोन जागा देण्याचे आश्वासन आम्हाला मिळाले आहे. प्रवीण निशाद हे गोरखपूरमधून लढतील व भाजपाला पराभूत करतील. मच्छिमार हा आमचा आधार आहे. आघाडीसाठी आमचा आधार निर्णायक ठरणार आहे.
योगी सरकारमध्ये मंत्री असलेल्या ओमप्रकाश राजभर यांच्या पक्षानेही दावा केला आहे की, आमच्या पक्षाचा ५० मतदारसंघांमध्ये प्रभाव आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील प्रोफेसर संजय के. पांडे म्हणाले की, प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे निवडणूक अधिक अटीतटीतची होईल.

भाजपाला मदत होऊ देणार नाही

भाजपाला अप्रत्यक्षपणेही मदत होणार नाही, याप्रकारे आम्ही निवडणूक रणनीती ठरवली आहे, असे राज बब्बर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, राज्यात शक्यतो थेट दुरंगी सामने व्हावेत, असा आमचा प्रयत्न होता. तसे होणे आता शक्य नाही. पण जिथे भाजपाविरोधात अन्य पक्षांचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता अधिक आहे, तिथे आम्ही उमेदवार उभे करण्याचे टाळू. अशा मतदारसंघांमध्ये तरी दुरंगी लढत व्हावी आणि भाजपाचा पराभव प्रयत्न व्हावा, असेच आमचे प्रयत्न राहतील.

Web Title: Congress leaves SP, BSP in 7 seats; There is no candidate against Mayawati, Mulayam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.