आप-काँग्रेसमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब! दिल्ली, गुजरातसह 4 राज्यांमध्ये युती, कोणाला किती जागा मिळाल्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 12:34 PM2024-02-24T12:34:41+5:302024-02-24T12:35:59+5:30

Lok Sabha elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आप आणि काँग्रेस यांच्यातील करार अंतिम झाला आहे. 

Congress and AAP announce seat-sharing for the upcoming Lok Sabha elections 2024, Delhi Gujarat Goa Haryana   | आप-काँग्रेसमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब! दिल्ली, गुजरातसह 4 राज्यांमध्ये युती, कोणाला किती जागा मिळाल्या?

आप-काँग्रेसमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब! दिल्ली, गुजरातसह 4 राज्यांमध्ये युती, कोणाला किती जागा मिळाल्या?

Lok Sabha elections 2024 :  नवी दिल्ली :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी ही लढत रंगणार असल्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत आम आदमी पार्टी (आप) आणि काँग्रेसमध्ये एकमत झाले आहे. दिल्ली, गुजरातसह 4 राज्यांमध्ये आप-काँग्रेसमधील जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात आप आणि काँग्रेस यांच्यातील करार अंतिम झाला आहे. 

आज दिल्लीत दोन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटपाची माहिती दिली. पत्रकार परिषदेला आपकडून आतिशी, संदीप पाठक आणि सौरभ भारद्वाज तर काँग्रेसकडून मुकुल वासनिक, दीपक बाबरिया आणि अरविंदर सिंग लवली उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते मुकुल वासनिक म्हणाले की, इंडिया ब्लॉकमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी लखनऊमध्ये सपा-काँग्रेस आघाडीची घोषणा करण्यात आली होती.

सध्या भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी आप आणि काँग्रेसने लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे, पण एकदिलाने लढून भाजपाचा पराभव करू, असे मुकुल वासनिक म्हणाले. तसेच, आप आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावर बरीच चर्चा झाली. त्यानंतर जागावाटपाचा करार अंतिम झाला. दिल्लीत चार जागांवर आप निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेसने चांदणी चौकसह तीन जागा लढवणार आहे, असे मुकुल वासनिक यांनी सांगितले. 

याचबरोबर, चंदीगड आणि गोव्यातील दोन्ही लोकसभा जागांवर काँग्रेस आपला उमेदवार उभे करणार आहे. हरयाणात काँग्रेस 9 जागांवर तर आप 1 जागा लढवणार आहे. गुजरातमध्ये आप दोन तर काँग्रेस 24 जागांवर निवडणूक लढवणार आहे, असेही मुकुल वासनिक म्हणाले. दरम्यान, दिल्लीतील नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्ली या लोकसभा मतदारसंघातून आप निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस ईशान्य, उत्तर पश्चिम आणि चांदणी चौक या जागांवर निवडणूक लढवणार आहे.

गुजरातमध्ये आप भरूच आणि भावनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. याशिवाय, हरयाणात कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातून आप उमेदवार उभा करणार आहे. दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांनी पंजाबबाबत कोणतीही माहिती दिली नाही. इतर राज्यात काँग्रेस आणि आपने एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरीही पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. कारण, पंजाबमध्ये आप सर्व जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत आहे.

Web Title: Congress and AAP announce seat-sharing for the upcoming Lok Sabha elections 2024, Delhi Gujarat Goa Haryana  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.