येत्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपासमोर आव्हानांचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 09:23 AM2019-01-06T09:23:54+5:302019-01-06T09:24:18+5:30

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशात जबरदस्त कामगिरी करत 80 पैकी 70 हून अधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र....

In the coming Lok Sabha elections, Uttar Pradesh is a challenge for the BJP | येत्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपासमोर आव्हानांचा डोंगर

येत्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपासमोर आव्हानांचा डोंगर

Next

नवी दिल्ली - 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानेउत्तर प्रदेशात जबरदस्त कामगिरी करत 80 पैकी 70 हून अधिक जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे लोकसभेत भाजपाला स्पष्ट बहुमतही मिळाले होते. मात्र यावर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत 2014 मधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान भाजपासमोर आहे. पण खासदारांनी केलेली निराशा, शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न तसेच सपा आणि बसपाने केलेली महाआघाडीची घोषणा यामुळे आगामी निवडणुकीत 2014 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाला आव्हानांचा डोंगर पार करावा लागणार आहे. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपासमोर पुढील आव्हाने असतील.

गोवंशाची वाढलेली संख्या - गोहत्याबंदीमुळे उत्तर प्रदेशात गोवंशाची संख्या वारेमाप वाढली आहे. भटकी जनावरे शेतीचे नुकसान करत असून, त्यासाठी शेतकरी मोदी सरकारला दोषी ठरवत आहेत. त्यामुळे योगी सरकारने मोकाट जनावरांसाठी गोशाला बनवण्याची घोषणा केली आहे. मात्र ही समस्या न सुटल्यास मोदी सरकारला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. 

 खासदारांची अकार्यक्षमता - 2014 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचे बहुतांश उमेदवार विजयी झाले होते. मात्र यापैकी बहुतांश खासदारांच्या कामावर त्यांच्या मतदारसंघातील जनता नाराज आहे. काही खासदारांनी निवडणुका आटोपल्यानंतर आपल्या मतदारसंघात तोंड दाखवलेले नाही. त्यामुळे भाजपाला मोठ्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. 

 फसलेली कर्जमाफी - उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळाल्यावर भाजपाने कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र या कर्जामाफीचा पुरेसा फायदा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. 

 पक्षांतर्गत गटबाजी आणि मतभेद -  उत्तर प्रदेशमध्ये भाजपामधील काही नेते आणि सहकारी पक्षांचे नेते मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. खासदार सावित्रीबाई फुले यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. तर ओमप्रकाश राजभर आणि अनुप्रिया पटेल हे मित्रपक्षांचे नेतेही नाराज आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करताना भाजपाची कसोटी लागणार आहे.
  
सवर्णांची नाराजी - भाजपाचे पारंपरिक मतदार मानले जाणारे सवर्णही भाजपावर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. त्यामुळे त्यांना सांभाळून घेताना भाजपाची कसोटी लागणार आहे. 

राममंदिर - उत्तर प्रदेशामध्ये राम मंदिर हा आजही मोठा मुद्दा आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाने बहुमतासह सरकार बनवल्यावर आता राम मंदिरासाठी निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र राम मंदिराबाबत नरेंद्र मोदी यांनी थेट भूमिका न घेता कोर्टाच्या निकालानंतर निर्णय घेऊ असे सांगितल्याने रामभक्तांची निराशा झाली आहे.

सपा बसपा आघाडी - एकमेकांची प्रतिस्पर्धी असलेले सपा आणि बसपा आगामी लोकसभा निवडणूक एकत्र येऊन लढणार आहेत. या आघाडीमुळे दलित, यादव आणि मुस्लिम यांची एकगठ्ठा मते सपा-बसपाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सपा बसपा आघाडी हे भाजपासमोरील सर्वात मोठे आव्हान असेल.  

Web Title: In the coming Lok Sabha elections, Uttar Pradesh is a challenge for the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.