नक्षलवादी महिलेसाठी सीआरपीएफने जंगलात उभारला दवाखाना, केले रक्तदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 10:58 AM2019-02-18T10:58:10+5:302019-02-18T11:00:42+5:30

डॉक्टरांनी सुरीनचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या सीआरपीएफ जवानांनी तातडीने रक्तदान केले.

The clinic opened by the CRPF in the forest for the Naxalite woman, donate blood | नक्षलवादी महिलेसाठी सीआरपीएफने जंगलात उभारला दवाखाना, केले रक्तदान

नक्षलवादी महिलेसाठी सीआरपीएफने जंगलात उभारला दवाखाना, केले रक्तदान

googlenewsNext

चाईबासा : चकमकीवेळी सीआरपीएफ जवान आणि पोलिसांवर गोळ्या झाडणाऱ्या महिला नक्षलवादीचा जीव वाचविण्यासाठी जवानांनी जंगलामध्ये तात्पुरते हॉस्पिटल उभारले. एवढ्यावरच न थांबता या जवानांनी तिच्यासाठी रक्तदान करत प्राण वाचविला. एकीकडे पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर आत्मघाती हल्ला झालेला असताना दुसरीकडे या जवानांनी दाखवून दिलेली माणुसकी विचार करायला लावणारी आहे. ही घटना झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील आहे. 

14 फेब्रुवारीला पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील गोईलकेराच्या इच्छाबेडा जंगलात सर्च ऑपरेशन सुरु होते. यावेळी सीआरपीएफच्या 60 व्या बटालियनचे जवान आणि पोलिसांसोबत नक्षल्यांची गाठ पडली. दोन्ही बाजुने जवळपास एक हजारहून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या. 
यावेळी वीस वर्षीय महिला नक्षली ननकी सुरीन हीनेही जवानांवर गोळीबार केला. यावेळी जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात सुरीन जखमी झाली. तिच्या पायावर गोळी मारण्यात आली. रक्तस्त्राव झाल्याने ती नक्षल्यांच्या तळाजवळ तडफडत होती. तिचे साथीदार तिला त्याच अवस्थेत सोडून पळाले होते. गोळीबार थांबल्यानंतर पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांनी राबविलेल्या शोधमोहिमेवेळी सुरीन जखमी अवस्थेत आढळली. 

जवानांनी तिला ताब्यात घेतले. यानंतर मानवतेच्या भावनेतून त्यांनी सुरीनवर प्राथमिक उपचार केले. यासाठी त्यांनी तात्पुरता दवाखाना उभा केला. तिचा रक्तस्त्राव खूप झाल्याने नंतर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिथे तिची प्रकृती पाहून चाईबासा येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. उपचारादरम्यान तिला रक्ताची गरज होती. 

डॉक्टरांनी सुरीनचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या सीआरपीएफ जवानांनी तातडीने रक्तदान केले. सीआरपीएफ जवान राजकिशोर प्रधान, अभिनव कुमार आणि संदीप यांनी रक्त देत तिचे प्राण वाचविले. यानंतर सुरीनला जमशेदपूर येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. सुरीनकडे घटनास्थळी 0.315 बोअरच्या 30 गोळ्या आढळून आल्या होत्या. तिच्यासोबत 30 नक्षलवादी होते. यामध्ये पाच महिलाही होत्या. धक्कादायक म्हणजे सुरीन जखमी झाली तेव्हा तिला त्याच अवस्थेत सोडून जाताना तिचे साथीदार तिची बंदुकही घेऊन गेले, असे सीआरपीएफचे कमांडर पी सी गुप्ता यांनी सांगितले. 

Web Title: The clinic opened by the CRPF in the forest for the Naxalite woman, donate blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.