राजस्थानात भाजपापुढे आव्हान, कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 05:18 AM2019-02-07T05:18:47+5:302019-02-07T05:19:27+5:30

राजस्थानातून गेल्या लोकसभा निवडणुकीत २५ पैकी २५ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाने लोकसभेसाठी भाजपातील इच्छुकांची धाकधूक वाढवली आहे.

Challenge to BJP in Rajasthan, enthusiasm among Congress workers | राजस्थानात भाजपापुढे आव्हान, कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

राजस्थानात भाजपापुढे आव्हान, कॉँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

Next

 - राजेश भिसे

राजस्थानातून गेल्या लोकसभा निवडणुकीत २५ पैकी २५ जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाने लोकसभेसाठी भाजपातील इच्छुकांची धाकधूक वाढवली आहे. विधानसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती लोकसभेत होऊ नये, यादृष्टीने भाजपाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकांत राजस्थानच्या मतदारांनी भाजला भरभरुन मतदान केले. राजस्थानमध्ये २५ जागांपैकी १८ खुल्या प्रवर्गासाठी, ४ अनुसूचित जाती, तर ३ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. या सर्व जागांवर पक्षाला निर्भेळ यश मिळविले होते. मात्र, २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची स्थिती बदलली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी ही बाब स्पष्ट केली आहे.

डिसेंबर २०१८ मध्ये १९९ जागांसाठी झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपाला ७२, काँग्रेसला १००, तर अपक्ष व इतरांना २६ जागांवर विजय मिळाला. विधानसभेत काँग्रेसने सत्ता स्थापन करून, अशोक गेहलोत मुख्यमंत्री, तर उपमुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट यांनी पदभार घेतला आहे. भाजपाने २०१३ च्या विधानसभा निवडणुकांत तब्बल १६३ जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसचे केवळ
२१ जागांवर उमेदवार निवडून आले होते.

पण २0१८ साली चित्र पूर्ण पालटले. मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंदिया यांच्याबद्दल मतदारांमध्ये असलेली नाराजी मतदानयंत्रांतून उमटली आणि भाजपाच्या हातातून हे राज्य गेले. अर्थात प्रशासनाकडे दुर्लक्ष, अनेक प्रश्न व समस्या रेंगाळत पडून राहणे, मंत्री व आमदारांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनीच न ऐकणे यामुळे लोकांत मोठी नाराजी होती. मध्यम जातींच्या आरक्षणाचा मुद्दा, शेतकऱ्यांची आंदोलने याकडेही वसुंधरा राजे यांनी गांभीर्याने पाहिले नाही, अशी तक्रार होती. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकांत दिसला.

बदलत्या राजकीय समीकरणांमुळे २०१४ प्रमाणे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपासाठी सध्या तरी अवघड दिसत आहे. कदाचित विधानसभा निकालांचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता अधिक. विधानसभा निवडणूक स्थानिक तर लोकसभा राष्ट्रीय मुद्द्यांवर लढली जाते. असे असले तरी मतदारांची मानसिकता व राजस्थानमधील राजकीय स्थिती यांवरच राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. त्यामुळेच भाजपाने बुथनिहाय तयारी सुरू केली आहे. पारंपरिक माध्यमांसह सोशल मीडियाचाही
वापर भाजपाकडून प्राधान्याने केला जाईल.

विधानसभा निवडणुकीत अध्यक्ष राहुल गांधी यांच्या परिश्रमांमुळेच काँग्रेसला यश मिळू शकले. या यशानंतर काँग्रेस पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम असल्याचे अनेक मतदारांच्या प्रतिक्रियांतून दिसून आले आहे. नाराजी होती ती मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबद्दल. ती व्यक्त करून झाली. या पार्श्वभूमीवर मोदींची लोकप्रियता महत्त्वाचा मुद्द ठरणार की लोकसभेतही लोकांना बदल हवा, हे निवडणुकांतून समजेल.

Web Title: Challenge to BJP in Rajasthan, enthusiasm among Congress workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.