सीबीएसई १२ वीची परीक्षा रद्द; कोरोना संकटात विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 06:54 AM2021-06-02T06:54:29+5:302021-06-02T06:55:12+5:30

विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य महत्त्वाचे : पंतप्रधान

CBSE 12th exam canceled | सीबीएसई १२ वीची परीक्षा रद्द; कोरोना संकटात विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

सीबीएसई १२ वीची परीक्षा रद्द; कोरोना संकटात विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

Next

नवी दिल्ली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीबीएसईची १२वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीत घेतला. मुलांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य असेल. या कठीण प्रसंगात त्यांना परीक्षेच्या ताण देणे उचित ठरणार नाही. परंतु १२ वीचा निकाल निश्चित केलेल्या कालावधीत योग्य पद्धतीने मूल्यमापनाच्या आधारे घेतला जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला सीबीएसईचे अध्यक्ष, शिक्षण मंत्रालयाचे सचिव यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, राजनाथ सिंह आणि प्रकाश जावडेकर हेही उपस्थित होते. कोरोनापश्चात आजारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याने केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. या बैठकीत विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारे गुण देता येतील यासाठी शिक्षण मंत्रालयाने तयार केलेल्या तीन पर्यायांची सविस्तर माहिती पंतप्रधानांना देण्यात आली.

सोमवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत या परीक्षांबाबत सविस्तर आराखडा गुरुवारी सादर करू, असे केंद्र सरकारने सांगितले होते. त्यावेळी कोर्टाने म्हटले होते की, तुम्ही कोणताही पर्याय निवडा परंतु त्यासाठी ठोस आधार द्या. 

काही राज्यांनी ही परीक्षा घेण्यास विरोध केला होता. झारखंड, केरळ, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि तामीळनाडू सरकारने परीक्षेआधी मुलांना लस देण्याची मागणी केली होती. उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, गुजरात, आसाम, हिमाचल प्रदेश, चंदीगढ, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगण तसेच ओडिशा आदी या राज्यांनी केवळ मुख्य विषयाची परीक्षा घेऊन परीक्षेचा वेळ कमी करण्याचा आग्रह धरला होता. मुलांनी आपापल्या शाळेतच परीक्षा द्यावी, असे त्यांचे म्हणणे होते. देशातील तीन हजार विद्यार्थ्यांनीही सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन. वी. रमणा यांना चिठ्ठी लिहून सीबीएसईची बारावीची परीक्षा रद्द करून इतर पर्यायांचा विचार करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती केली होती. कोरोना काळात परीक्षा घेतल्याने जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो, असे त्यात म्हटले होते. 

राज्यात बारावीची परीक्षा रद्द होणार?
सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे. महाराष्ट्र सरकारही राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत लवकरच निर्णय घेईल, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी दिले पंतप्रधानांना धन्यवाद
सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत. 
परवाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाईव्ह संबोधनातून १२ वी तसेच अशा काही महत्वाच्या परीक्षांच्या आयोजनाच्या बाबतीत संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय स्तरावरून योग्य निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली होती.

Web Title: CBSE 12th exam canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.