“विरोधी खासदारांचे निलंबन दुर्दैवी, नक्कल केलेला व्हिडिओ व्हायरल करणे चुकीचे”: मायावती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 02:12 PM2023-12-21T14:12:13+5:302023-12-21T14:12:33+5:30

Mayavati News: केंद्रावर टीका करताना मायावती यांनी विरोधी पक्षालाही खडेबोल सुनावले आहेत.

bsp chief mayawati reaction over suspension of opposition mp and parliament security breach issue | “विरोधी खासदारांचे निलंबन दुर्दैवी, नक्कल केलेला व्हिडिओ व्हायरल करणे चुकीचे”: मायावती

“विरोधी खासदारांचे निलंबन दुर्दैवी, नक्कल केलेला व्हिडिओ व्हायरल करणे चुकीचे”: मायावती

Mayavati News: संसद सुरक्षेतील त्रुटी आणि लोकसभेतील घुसखोरी यांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. गृहमंत्र्यांनी दोन्ही सभागृहात यासंदर्भात निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. या मागणीवर लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहातील गोंधळाप्रकरणी विरोधी पक्षातील १४३ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. या निलंबनावरून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली जात आहे. यातच आता बसपा सुप्रिमो मायावती यांनी प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षातील खासदारांचे निलंबन करणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना मायावती म्हणाल्या की, विरोधी पक्षातील खासदारांचे निलंबन दुर्दैवी आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदारांचे निलंबन हे संसदीय इतिहासासाठी दु:खद आणि लोकांच्या विश्वासाला धक्का आहे, अशी टीका मायावती यांनी केली. तसेच संसद परिसरात निलंबित खासदारांनी उपराष्ट्रपतींची खिल्ली उडवत नक्कल केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. ही बाबही अयोग्य आणि अशोभनीय आहे, या शब्दांत मायावतींनी विरोधकांचेही कान टोचले आहेत.

विरोधकांशिवाय विधेयके मंजूर करणे चुकीची परंपरा

विरोधकांशिवाय विधेयक मंजूर करणे ही चुकीची परंपरा असून, जुनी परंपरा जतन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. मायावती यांनी संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींचाही मुद्दा उपस्थित केला आणि संसदेच्या सुरक्षेतील भंग हा चिंतेचा विषय असल्याचे सांगितले. संसदेत झालेली सुरक्षेची चूक चांगली नाही. ही अत्यंत गंभीर आणि चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी मिळून संसदेच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून दबाव टाकून चालणार नाही. कट रचणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत मायावती यांनी व्यक्त केले.

दरम्यान, INDIA आघाडीच्या बैठकीबाबत बोलताना मायावती म्हणाल्या की, या आघाडीत नसल्याबाबत कोणतीही टिप्पणी करू इच्छित नाही. माझा सल्ला आहे की, असे करणे टाळावे. कारण देशाच्या हितासाठी भविष्यात कोणत्या पक्षाला कोणाची कधी गरज भासेल, हे सांगता येत नाही. अन्यथा मोठा पेच निर्माण होऊ शकतो. विशेषतः समाजवादी पक्षाने याबाबत काळजी घ्यावी. भविष्यात गरज कधी निर्माण होईल? याचे समाजवादी पक्ष हे जिवंत उदाहरण आहे, असे मायावती यांनी म्हटले आहे.  
 

Web Title: bsp chief mayawati reaction over suspension of opposition mp and parliament security breach issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.