Bringing Jadhav back to India, government failure of insult at the time of visit | जाधव यांना लगेच भारतात परत आणा, भेटीच्या वेळी अपमान हे सरकारचे अपयश

नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी इस्लामाबादला गेलेल्या त्यांच्या पत्नी व आईला पाकिस्तानकडून अपमानास्पद वागणूक दिली जाणे हे भारत सरकारचे अपयश आहे, अशी टीका काँग्रेसने बुधवारी केली व आणखी वेळ न घालवता जाधव यांना भारतात परत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.
चार दिवसांच्या सुटीनंतर संसदेचे कामकाज सुरु होताच विरोधी पक्षांनी जाधव कुटुंबियांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीचा धिक्कार केला व त्याच बरोबर सरकारलाही धारेवर धरले. लोकसभेत काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खारगे यांनी कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्याची मागणी केली.
काँग्रेसखेरीज शिवसेना, अण्णाद्रमुक व तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनीही निषेधाची वक्तव्ये केली. शिवसेनेचे अनंत गिते यांनी हा मुद्दा उपस्थित केला व सरकारने आता अजिबात गप्प बसू नये, असा आग्रह केला. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी यावर स्वत: निवेदन करावे, अशीही सदस्यांची मागणी होती. सभागृहाबाहेर ज्येष्ठ काँग्रेस नेते एम. विरप्पा मोईली म्हणाले की, जाधव कुटुंबियांना मिळालेली वागणूक अमानवीय आहे. हे सरकार व परराष्ट्र मंत्रालयाचे अपयश आहे. जाधव यांची आई व पत्नी तेथे जाण्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाने भेटीचा ‘प्रोटोकॉल’ ठरवून घ्यायला हवा होता.
>भारताने युध्द करून पाकिस्तानचे चार तुकडे करावेत आणि डोकेदुखी कायमची मिटवून टाकावी, असे मत भाजपा नेते व राज्यसभा सदस्य डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी टिष्ट्वटरवर व्यक्त केले. सूडाने आणि कपटाने वागणाºया या शेजाºयाला धडा शिकविण्याचा हाच एकमेव मार्ग आहे व त्याची तयारी आत्तापासूनच गांभीर्याने सुरू करायला हवी, असेही स्वामी यांनी म्हटले. आज हे माझे व्यक्तिगत मत असले, तरी यापूर्वी माझी मते नंतर पक्षाचीही मते बनली आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.