शिवसेनेशी युती झाली तरी मुख्यमंत्री भाजपाचाच ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 09:32 AM2019-06-10T09:32:32+5:302019-06-10T09:34:59+5:30

विधानसभेला भाजपाच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्यासाठी मेहनत घ्या, तसेच मित्रपक्षांच्या जागा निवडून आणण्यासाठी तितकीच मेहनत करा

Bjp Core committee meeting in delhi, discussion on Chief minister from BJP after election | शिवसेनेशी युती झाली तरी मुख्यमंत्री भाजपाचाच ?

शिवसेनेशी युती झाली तरी मुख्यमंत्री भाजपाचाच ?

Next

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि मित्रपक्षांशी युती होईलच पण मुख्यमंत्रीपदासाठी भाजपा आग्रही राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक दिल्ली येथे पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगुंटीवार,  चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपाचे अनेक नेते हजर होते. या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपा ज्या जागांवर लढतंय तिथे आणि मित्रपक्षांच्या जागेवरही जिंकण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी, लोकसभा निवडणुकीत ज्याप्रकारे लोकांनी भाजपावर, महायुतीवर, नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखविला तसाच विश्वास विधानसभा निवडणुकीत दाखवतील असा विश्वास आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा रोडमॅप तयार आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा एकत्र जागा लढवतील असं ठरलं आहे. शिवसेना-भाजपा समसमान जागा लढवणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. तर 18 जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र या फॉम्युल्यावर शिवसेना नाराज होती. पण दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपाने विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा केली. विधानसभेला भाजपाच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्यासाठी मेहनत घ्या, तसेच मित्रपक्षांच्या जागा निवडून आणण्यासाठी तितकीच मेहनत करा असा कानमंत्र राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपा नेत्यांना दिला. 

भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथील आगामी विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात अमित शहा यांनी बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र भाजपच्या कोअर समितीचे सदस्य उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन, मंत्रीमंडळ विस्तार, महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी आवश्यक निधी आदींच्या बाबतीत अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली. 

तसेच भाजपमधील ‘एक व्यक्ती एक पद’ या नियमानुसार रावसाहेब दानवे यांचे प्रदेशाध्यक्षपद जाणार, अशी चर्चा होती. त्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘प्रदेशाध्यक्षपदाच्या संदर्भात संपूर्ण देशाचे वेळापत्रक निश्चित होत असते. त्याचा निर्णय पक्षाची केंद्रीय समिती घेईल.’ येत्या १३ व १४ जूनला प्रदेशाध्यक्षांच्या बदलासंदर्भात दिल्लीत केंद्रीय समितीची बैठक होणार आहे. त्यावेळी दानवेंच्या बाबतीत चित्र स्पष्ट होईल, असे कळते
 

Web Title: Bjp Core committee meeting in delhi, discussion on Chief minister from BJP after election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.