भाजपा युतीनं 34 आमदारांसह मेघालयात केला सत्ता स्थापनेचा दावा, काँग्रेस सत्तेपासून दूरच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 08:13 PM2018-03-04T20:13:52+5:302018-03-04T20:13:52+5:30

मेघालयमध्ये सर्वाधिक 21 जागा जिंकूनही काँग्रेस सत्तेपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त 2 आमदारांसह भाजपा सरकारमध्ये सहभागी होणार आहे.

BJP combine in Meghalaya with 34 MLAs claiming the formation of power, Congress is far from the power | भाजपा युतीनं 34 आमदारांसह मेघालयात केला सत्ता स्थापनेचा दावा, काँग्रेस सत्तेपासून दूरच

भाजपा युतीनं 34 आमदारांसह मेघालयात केला सत्ता स्थापनेचा दावा, काँग्रेस सत्तेपासून दूरच

googlenewsNext

शिलाँग- मेघालयमध्ये सर्वाधिक 21 जागा जिंकूनही काँग्रेस सत्तेपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त 2 आमदारांसह भाजपा सरकारमध्ये सहभागी होणार आहे. काँग्रेस विरोधी पक्षांनी राज्यपाल गंगा प्रसाद यांच्यासमोर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजपा 2, एनपीपी 19, यूडीपी 6, एचएसपीडीपी 2, पीडीएफ 4 आणि 1 अपक्षासह 34 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र राज्यपालांना सोपवण्यात आलं आहे. आता फक्त राजभवनाकडून सरकार स्थापनेला हिरवा कंदील देण्याची औपचारिकताच बाकी आहे.

तसेच नॅशनल पीपल्स पार्टी(एनपीपी)चे अध्यक्ष कोनराड संगमा यांना मुख्यमंत्रिपद दिलं जाणार आहे. एएनआयच्या मते, मंगळवारी सकाळी 10.30 वाजता कोनराड संगमा यांचा शपथविधी होणार आहे. राज्यपालांच्या भेटीनंतर कोनराड संगमा म्हणाले, आम्ही 34 आमदारांच्या समर्थनासह सरकार स्थापनेचा दावा केला आहे. पुढे दोन-तीन दिवस महत्त्वाचे आहेत. सद्यस्थितीतील सरकारचा कार्यकाळ 7 मार्च रोजी संपणार आहे आणि त्यापूर्वीच सरकार स्थापणं गरजेचं आहे. उद्यापर्यंत सर्व काही स्पष्ट होईल. ज्यावेळी पत्रकारांनी संगमांना मुख्यमंत्रिपदासंदर्भात छेडले, त्यावेळी त्यांनी मला मुख्यमंत्रिपदासाठी इतर सहयोगी पक्षांनी पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं. इतर पक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवणं सोपं नाही हे संगमांना चांगलंच ठाऊक आहे. 

सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसच्याही हालचाली
मेघालयात काँग्रेस सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष ठरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अहमद पटेल आणि कमल नाथ हे लगेचच शिलाँगमध्ये दाखल झालेत. राष्ट्रीय राजकारणाचा तगडा अनुभव असलेले हे दोन्ही नेते मेघालयमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहतील. भाजपानेही कोणत्याही परिस्थिती काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहचून देणार नाही, असा निर्धार व्यक्त केला. मेघालय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिन कोहली यांनी म्हटले की, इतर पक्षाची कामगिरी पाहता यंदाच्या निवडणुकीत जनमत काँग्रेसविरोधी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आम्ही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर आम्ही इतर पक्षांशी बोलणी करू, असे कोहली यांनी म्हटले. तर भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनीदेखील मेघालयमध्ये बिगरकाँग्रेसी सरकार पाहायला मिळेल, असे संकेत दिले. यापूर्वी मणिपूर आणि गोव्यातही भाजपाच्या निकालानंतरच्या मॅनेजमेंटमुळे सर्वाधिक आमदार निवडून येऊनही काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे मेघालयमध्येही असाचा काही चमत्कार पाहायला मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: BJP combine in Meghalaya with 34 MLAs claiming the formation of power, Congress is far from the power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.