केरळच्या पर्यटन व्यवसायाला महापुराने बसला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 02:04 AM2018-08-23T02:04:31+5:302018-08-23T06:47:48+5:30

टूर अनिश्चित काळासाठी स्थगित; लाखो पर्यटकांचा हिरमोड

The big tourist was hit by a tourist bus in Kerala | केरळच्या पर्यटन व्यवसायाला महापुराने बसला मोठा फटका

केरळच्या पर्यटन व्यवसायाला महापुराने बसला मोठा फटका

Next

- चिन्मय काळे 

मुंबई : केरळमधील महापुरामुळे सर्व पर्यटन कंपन्यांनी तेथील टूर अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रातील साडेतीन लाखाहून अधिक पर्यटकांना त्यांंची केरळ टूर रद्द करावी लागली आहे. कंपन्या त्यांना आता अन्य पर्यटनस्थळांचा पर्याय देत आहेत.

केरळमधील पर्यटनाचा हंगाम जुलैनंतर सुरु होतो. जून-जुलैमधील दमदार पावसानंतर वातावरण आल्हाददायी बनल्याने आॅगस्टपासून तिथे पर्यटकांची लगबग वाढू लागते. यंदा मात्र आॅगस्ट महिन्यातच पावसाने रुद्रावतार दाखवला. महापुरामुळे अनेक पर्यटनस्थळांकडे जाणारे मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे कंपन्यांना तेथील टूर रद्द कराव्या लागल्या आहेत.

थॉमस कूक इंडिया लिमिटेडचे भारत प्रमुख राजीव काळे म्हणाले की, सध्या केरळमधील स्थिती भीषण आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तेथील सर्व टूर आम्ही रद्द केल्या आहेत. या पुन्हा कधी निघतील, हे सांगता येणार नाही. तुर्तास आम्ही पर्यटकांना केरळात न जाण्याचा सल्ला देत आहोत. ज्यांचे बुकिंग झाले आहे त्यांना उटी, कोडाईकनाल, कूर्ग, म्हैसूर, बंगळुरू आदी पर्याय देत आहोत. प्रसंगी त्यांना पैसेही परत करीत आहोत.

केरळमध्ये आॅगस्ट महिन्यात देशभरातून जवळपास १२ लाख पर्यटक येतात. यातील ७५ ते ८० हजार पर्यटक विदेशातील असतात. विदेशीतून येणारे अर्धे पर्यटक मुंबईतून केरळकडे जातात. देश-विदेशातील आणि महाराष्टÑातून जाणाऱ्या ३.५० ते ३.८० लाख पर्यटकांना आता केरळ टूर रद्द करावी लागला आहे.

‘या महापुरामुळे १४ ते १६ पर्यटनस्थळांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने निलगिरी डोंगरांमधील ठिकाणांना फटका बसला आहे. पर्यटकांसह एकूण १० लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. महापुरात मुख्यत्वे विविध ठिकाणी जाणारे रस्ते वाहून गेले आहेत. काही ठिकाणी दुभंगले आहेत. येत्या १५ दिवसात पर्यटन पूर्ववत सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पूवार, अ‍ॅलेप्पी, कोल्लम यासारखे उत्तर किंवा दक्षिण केरळमधील समुद्रकिनारी असलेली पर्यटनस्थळे सुरक्षित आहेत. तिथे पर्यटक आजही येऊ शकतात. केवळ हिल स्टेशन व मध्य केरळला प्रचंड फटका बसला आहे.
- पी. बाल किरण, संचालक, केरळ पर्यटन

Web Title: The big tourist was hit by a tourist bus in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.