Atal Bihari Vajpayee : ...म्हणून त्यांनी इस्टेट बनवली नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 04:56 AM2018-08-17T04:56:55+5:302018-08-17T04:57:00+5:30

राजकारणात माणसे झटपट श्रीमंत होतात. नव्हे तर श्रीमंत होण्यासाठीच अलीकडे लोक राजकारणात येऊ पाहतात हा एकूण कल आहे. सारेच असे नसतील. पण अपवाद मिळणे कठीण. पण वाजपेयींचे सारेच जगावेगळे होते.

Atal Bihari Vajpayee: ... so they did not make any estate! | Atal Bihari Vajpayee : ...म्हणून त्यांनी इस्टेट बनवली नाही!

Atal Bihari Vajpayee : ...म्हणून त्यांनी इस्टेट बनवली नाही!

Next

राजकारणात माणसे झटपट श्रीमंत होतात. नव्हे तर श्रीमंत होण्यासाठीच अलीकडे लोक राजकारणात येऊ पाहतात हा एकूण कल आहे. सारेच असे नसतील. पण अपवाद मिळणे कठीण. पण वाजपेयींचे सारेच जगावेगळे होते. चार दशके राजकारणात राहूनही त्यांनी इस्टेट बनवली नाही. जमीन तर सोडा, त्यांचं स्वत:च घरही उरलेले नव्हतं. ग्वाल्हेरमधले वडिलोपार्जित घर त्यांनी फार पूर्वीच देऊन टाकलं. तिथे वाचनालय आहे.
सत्तेचा त्यानी स्वत:साठी तर उपयोग केलाच नाही. पण आपल्या कुटुंबियांनाही त्या मोहापासून दूर ठेवले. ‘अपने दम पे खडे रहो. नही तो भांग पीकर पडे रहो’ असे त्यांचं घरच्यांना सांगणं असे. आग्रा येथे राहणाऱ्या त्यांच्या बहिणीकडे गॅस नव्हता. खासदारांना गॅस कनेक्शनचा कोटा असतो. पण त्या कोट्यातून अटलजींनी तिला गॅस दिला नाही आणि बहिणीनेही मागितला नाही. आता बोला! राजकीय जीवनात वावरताना अटलजींनी किती संयम राखला असेल याची कल्पना या लहानशा उदाहरणावरून यावी. ते म्हणतही. मी कशाला भीत नाही. भीतो तर बदनामीला.
उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बटेश्वर हे अटलबिहारी यांचे मूळ गाव. बटेश्वरमध्ये प्राचीन काळी कान्यकुब्ज ब्राह्मणांपैकी कुणी वाजपेय यज्ञ केला . तेव्हापासून त्या परिवारात ‘वाजपेयी’ हे आडनाव पडलं असे मानलं जातं. पणजोबा, आजोबा, वडील... संस्कृतचे सारे विद्वान होते. साहित्यप्रेमी होते. बटेश्वरहून हे कुटुंब ग्वाल्हेरला आलं. अटलबिहारी यांचे वडील कृष्णबिहारी. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर संस्थानात ते राजमान्यकवी होते. व्यवसायाने शिक्षक होते. घरी श्रीमंती नसली तरी खाऊनपिऊन सुखी घर होतं. अटलबिहारींना तीन भाऊ आणि तीन बहिणी. अवधबिहारी, सदाबहारी आणि प्रेमबिहारी. अटलबिहारी हे या तिघांच्या पाठीवर जन्माला आले. अटलबिहारी शाळेत हुशार होते. पण खोडकर होते. त्यासाठी त्यांनी वडिलांच्या हातचा मारही खाल्ला. घरचे लाडके. त्यांची आई त्यांना लाडाने ‘अटल्ला’ म्हणायची. आईच्या हातचे पदार्थ त्यांना खूप आवडायचे. मूगडाळीचे लाडू, बाजरीची शिळी भाकरी, दालबाटी... ग्वाल्हेरमधल्या एका ठिकाणचा समोसा, कचोरी त्यांना खूप आवडायची. ग्वाल्हेर तर जीव की प्राण. कुटुंबवत्सल होते. घरी गेले की, राजकारण विसरून जात. घरात कुणाचं लग्न, मुंज असो, हजर रहायचे. त्यांनी लग्न केले नाही. पण भावाबहिणींची मिळून दीडशे माणसं आहेत. इतर मुलांप्रमाणे अटलबिहारी यांनीही लग्न करावे, संसार थाटावा अशी त्यांच्या आईवडिलांची खूप इच्छा होती. आईनं तर अनेक वेळा रडून त्यांना राजी करू पाहिलं. पण अटलजी बधले नाहीत. पूर्ण वेळ संघाचं काम करण्यासाठी ते बाहेर पडले होते. त्यामुळे लग्नाचा विचार त्यांनी मनातून काढून टाकला
होता.

गर्दीत राहूनही एकटे ! साठच्या दशकापासून वाजपेयींनी कौल कुटुंबाला आणि त्या कुटुंबाने वाजपेयींना आपलं मानले. जणू अटलजींचं ‘दत्तक’ कुटुंब ! नमिता भट्टाचार्य ही मानलेली मुलगी दिल्लीतल्याच एका शाळेत शिक्षिका आहे. दत्तक नात नेहा ही त्यांची अतिशय लाडकी. लग्न न करताही कुटुंबवत्सल, सतत माणसांच्या गर्दीत राहूनही एकटे वाजपेयी, गेलेही एकटे एकटे....
त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे -
‘क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत मैं
संघर्ष पथ पर जो भी मिला, वो भी सही ये भी सही’

Web Title: Atal Bihari Vajpayee: ... so they did not make any estate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.