मजिठियांची माफी मागणारे केजरीवाल घाबरट, सिद्धूंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 05:13 PM2018-03-16T17:13:16+5:302018-03-16T17:13:16+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया यांच्या मागितलेल्या माफीवरून पंजाबच्या राजकारणात वादळ आले आहे. एकीकडे आपच्या पंजाबमधील कार्यकारिणीकडून केजरीवाल यांच्या माफीनाम्याला तीव्र विरोध होत आहे.

Arvind Kejriwal is afraid of apology, Siddhu shot | मजिठियांची माफी मागणारे केजरीवाल घाबरट, सिद्धूंचा टोला

मजिठियांची माफी मागणारे केजरीवाल घाबरट, सिद्धूंचा टोला

Next

चंदिगड - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया यांच्या मागितलेल्या माफीवरून पंजाबच्या राजकारणात वादळ आले आहे. एकीकडे आपच्या पंजाबमधील कार्यकारिणीकडून केजरीवाल यांच्या माफीनाम्याला तीव्र विरोध होत आहे. तर काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनीही माफीनाम्यावरून केजरीवाल यांना टोला लगावला आहे. मजिठियांची माफी मागणारे केजरीवाल हे घाबरट असल्याचा टोला केजरीवाल यांनी लागावला आहे. 

अरविंद केजरीवाल यांनी मजिठिया यांच्यावर ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटमध्ये गुंतल्याचा आरोप केला होता. मात्र त्या केरजीवाल यांच्या आरोपांमुळे संतप्त झालेल्या मजिठिया यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. अखेर केजरीवाल यांनी  मजिठिया यांची माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. केजरीवाल यांच्या माफीनाम्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी केजरीवालांवर खोचक शब्दात टीका केली आहे. "मजिठियांची माफी मागून केजरीवाल यांनी घाबरटपणा दाखवला आहे. ही पंजाबमधील जनतेची फसवणूक आहे. केजरीवाल यांनी असे करून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची हत्या केली आहे. आता ते पंजाबमध्ये कोणत्या तोंडाने अमली पदार्थांविरोधात बोलणार आहेत," असा सवाल सिद्धू यांनी केला आहे. 





दरम्यान अकाली दलाचे नेते विक्रमसिंग मजिठिया यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माफी मागितल्यानंतर आपचे पंजाबमधील प्रदेशाध्यक्ष भगवंत मान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मी आम आदमी पक्षाच्य़ा पंजाब अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मात्र ड्रग्ज माफिया आणि पंजाबातील सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराविरोधात मी पंजाबच्या 'आम आदमी'बरोबर कायम असेन असं ट्वीट मान यांनी केलं आहे. त्याबरोबरच आपचे पंजाबातील दुसरे नेते सुखपाल सिंग खैरा यांनीही केजरीवाल यांच्या माफीनाफ्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पंजाब सरकारने मजिठिया यांच्याविरोधात सबळ पुरावे दाखल करुनही अरविंद केजरीवाल यांनी त्यांची माफी मागितल्यामुळे पंजाबात आम्ही सगळे (आम आदमी पभाचे नेते, कार्यकर्ते) नाराज झालो आहोत असे खैरा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. 

Web Title: Arvind Kejriwal is afraid of apology, Siddhu shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.