पाऊस, महापुरामुळे देशभरात 993 जणांचा मृत्यू, 17 लाख लोक विस्थापित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 09:25 AM2018-08-27T09:25:47+5:302018-08-27T09:26:08+5:30

यंदाच्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि महापुराचा केरळसह पाच राज्यांना मोठा फटका बसला आहे.

993 deaths Due to heavy rainfall & flood | पाऊस, महापुरामुळे देशभरात 993 जणांचा मृत्यू, 17 लाख लोक विस्थापित

पाऊस, महापुरामुळे देशभरात 993 जणांचा मृत्यू, 17 लाख लोक विस्थापित

नवी दिल्ली - यंदाच्या पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि महापुराचा केरळसह पाच राज्यांना मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे या पाच राज्यांमधील 17 लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले असून, सुमारे 993 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार पाऊस आणि महापुरामुळे 22 ऑगस्टपर्यंत देशात 993 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये केरळमधील सर्वाधिक 400 जणांचा समावेश  आहे. 

 गृहमंत्रालयाकडून प्रसिद्ध आकडेवारीनुसार 2018मध्ये पूरस्थितीमुळे सुमारे 70 लाख लोकांना फटका बसला आहे. त्यापैकी सुमारे 17 लाख लोक विस्थापित झाले . या अहवालानुसार केरळबरोबरच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आसाम आणि कर्नाटकच्या विविध भागात पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यापैकी सर्वाधिक नुकसान केरळमध्ये झाले आहे. केरळमध्ये 22 ऑगस्टपर्यंत 387 जणांचा मृत्यू झाला होता. आता हा आकडा वाढून 400 च्या पुढे गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

केरळबरोबरच मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशमध्ये 204, पश्चिम बंगालमध्ये 195, कर्नाटकमध्ये 161 आणि आसाममध्ये 46 जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये 54 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्यापैकी 14 लाख 52 हजार लोकांना मदत केंद्रात आश्रय घ्यावा लागला आहे. त्याबरोबरच आसाममध्ये 11 लाख 46 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे. तसेच सुमारे 2 लाख 45 हजार जणांना मदत केंद्रात पाठवण्यात आले आहे. 

याआधी 2017 मध्ये पाऊस आणि पुरामुळे 1200 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 2016 साली पुरामुळे बिहारमध्ये 254 तर मध्य प्रदेशात 184 जणांचा मृत्यू झाला होता. पाऊस आणि पुराच्या संकटाचा सामना करण्यासाठी एक विशेष निधी उभा करण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांना अद्याप तयार करू शकलेले नाही.  प्राप्त माहितीनुसार देशातील प्रत्येक राज्याकडे पूर आणि पावसाच्या संकटापासून पुरेशी साधने उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. 

Web Title: 993 deaths Due to heavy rainfall & flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.