१० माओवादी चकमकीत ठार, पोलीस, माओवादीविरोधी पथकाची छत्तीसगढ सीमेवर संयुक्त कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 06:07 AM2018-03-03T06:07:10+5:302018-03-03T06:07:10+5:30

छत्तीसगढ व तेलंगणा सीमेवरील पुजारी कांकेर व तडपुलागुटा जंगलात शुक्रवारी १० माओवाद्यांना ठार करण्यात आले. माओवादीविरोधी विशेष पथक व छत्तीसगड पोलिसांनी सकाळी ६.३० वाजता संयुक्तरीत्या ही कारवाई केली.

10 Maoists encounter, police, Maoist squad, joint action on Chhattisgarh border | १० माओवादी चकमकीत ठार, पोलीस, माओवादीविरोधी पथकाची छत्तीसगढ सीमेवर संयुक्त कारवाई

१० माओवादी चकमकीत ठार, पोलीस, माओवादीविरोधी पथकाची छत्तीसगढ सीमेवर संयुक्त कारवाई

Next


हैदराबाद : छत्तीसगढ व तेलंगणा सीमेवरील पुजारी कांकेर व तडपुलागुटा जंगलात शुक्रवारी १० माओवाद्यांना ठार करण्यात आले. माओवादीविरोधी विशेष पथक व छत्तीसगड पोलिसांनी सकाळी ६.३० वाजता संयुक्तरीत्या ही कारवाई केली. या कारवाईत विशेष पथकाच्या एका जवानाचा मृत्यू झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे कारवाईत माओवाद्यांचा नेता हरी भूषण ठार झाल्याचे वृत्त आहे. लष्करी डावपेच आखण्यात भूषणचा हातखंडा होता, असे बोलले जाते. जगन व बडे अप्पाराव हे नेतेही या कारवाईत ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. ठार झालेल्या माओवाद्यांमध्ये ६ महिलांचाही समावेश असल्याचे बोलले जाते. या माओवाद्यांवर मोठ्या रकमेचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. ठार झालेल्या माओवाद्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. या जंगलात माओवाद्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी ७० जण उपस्थित होते. या बैठकीची माहिती स्थानिक पोलीस व विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. कारवाई सुरू करण्याआधी सर्वसामान्य नागरिकांना जंगलात जाण्यास मनाई करण्यात आली होती. या कारवाईला प्रत्युत्तर देताना माओवाद्यांनीही गोळीबार केला. उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती.
चकमकीत विशेष पथकातील सुशीलकुमार नावाच्या जवानाचा मृत्यू झाला असून दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. गेले काही दिवस माओवाद्यांकडून लष्करी तळांवर सतत हल्ले केले जात होते. त्यामुळे आजची कारवाई ही पोलिसांसाठी मोठे यश मानले जात आहे. 
>हरी भूषणवर होते ३० लाखांचे बक्षीस
तेलंगणा राज्याची स्थापना झाल्यापासून हरी भूषण माओवादी संघटनेचा नेता म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ५० गुन्ह्यांची त्याच्या नावावर नोंद होती.या कारवाईत त्याच्यासह त्याची पत्नी समक्कादेखील ठार झाल्याचे वृत्त आहे. या कारवाईत पोलिसांनी १ एके-४७, १ एसएलआर व ५ रायफली जप्त केल्या.
>दोघांची ओळख पटली
ठार करण्यात आलेल्या १०पैकी संजीव आणि महिला पेड्डा बुद्री यांची ओळख पटली असून, दोघेही या संघटनेत सक्रिय सहभागी असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी अनेक भागांत सुरक्षादलाच्या जवानांना लक्ष्य केले होते. दंतेवाडा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ३ पोलीस जखमीदेखील झाले होते. या पार्श्वभूमीवर नक्षलवादविरोधी मोहिमेत सुरक्षा दलाला मिळालेले हे यश महत्त्वाचे मानले जात आहे. ही चकमक बनावट असल्याचा आरोप क्रांतिकारी लेखक संघटनेचे वारवरा राव यांनी केला आहे. पोलिसांनी माओवाद्यांना पकडले, त्यांचे हाल केले व नंतर त्यांना ठार केले़ तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी राव यांनी केली आहे.

Web Title: 10 Maoists encounter, police, Maoist squad, joint action on Chhattisgarh border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.