नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 02:47 PM2018-02-09T14:47:06+5:302018-02-09T14:54:17+5:30

आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला : दहाच्या ठोक्यालाच कार्यालयात हजर, अधिका-यांसमवेत बैठक

 Tukaram Mundhe's 'First Day First Show' in Nashik | नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’

नाशिकमध्ये तुकाराम मुंढे यांचा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’

googlenewsNext
ठळक मुद्देजनतेप्रती संवेदनशिलता, कार्यपद्धतीत नियमितता व शिस्तप्रियता राखत शहराच्या शाश्वत विकासावर भर देण्याची सूचनामुंढे यांनी अधिका-यांना आपल्या कामकाजाच्या पद्धतीविषयी अवगत करून दिले

नाशिक - महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे शुक्रवारी (दि.९) सकाळी १० वाजेच्या ठोक्यालाच पालिका मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन येथे पोहोचले आणि पहिल्याच दिवशी आपल्यातील वक्तशीरपणाचे दर्शन घडवले. आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी तातडीने प्रमुख अधिका-यांसह सर्व खातेप्रमुखांची बैठक बोलाविली आणि आपले मनसुबे स्पष्ट केले. अधिकारी-कर्मचा-यांनी जनतेप्रती संवेदनशिलता, कार्यपद्धतीत नियमितता व शिस्तप्रियता राखत शहराच्या शाश्वत विकासावर भर देण्याची सूचना त्यांनी बैठकीत बोलताना केली.


महापालिकेचे मावळते आयुक्त अभिषेक कृष्ण यांची मुंबई एमआयडीसीला सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार सांभाळणारे तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली. शुक्रवारी (दि.९) तुकाराम मुंढे आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे प्रशासनाला सांगण्यात आले होते परंतु, वेळ निश्चित नव्हती. मात्र, राजीव गांधी भवनमध्ये बरोबर दहाच्या ठोक्याला मुंढे यांचे वाहन पार्क झाले आणि सुरक्षा रक्षकांपासून कर्मचारी-अधिकारी वर्गाची धावपळ सुरू झाली. मुंढे यांनी मुख्यालयात प्रवेश करत असतानाच आसपासच्या दालनांची माहिती घेतली. महिला स्वच्छतागृहाचे दरवाजे उघडे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ते बंद करण्याची सूचना केली तर लगतच पाणीगळती होत असल्याचे पाहिल्यानंतर त्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या. दालनात आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुंढे यांनी लगेचच अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त आणि सर्व खातेप्रमुखांची तातडीने बैठक बोलाविली. बैठकीत, विविध खात्यांची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी, मुंढे यांनी अधिका-यांना आपल्या कामकाजाच्या पद्धतीविषयी अवगत करून दिले. प्रत्येक खातेप्रमुखाला त्याच्या खात्याची खडानखडा माहिती असणे आवश्यक आहे. कोणत्याही कामाचा प्रस्ताव तयार करताना अगोदर सदर काम नियमात बसते किंवा नाही, याची खात्री करावी आणि त्यानंतर त्याची आवश्यकता बघून शक्यशक्यता अहवाल तपासून मगच आपल्याकडे प्रस्ताव सादर करावा, असे आदेशच त्यांनी अधिका-यांना दिले. कुणी सांगितले म्हणून लगेच प्रस्ताव तयार करून ते आपल्याकडे स्वाक्षरीसाठी आणले जाऊ नयेत, असेही त्यांनी सुनावले. कामात सातत्य आणि नियमितता असली पाहिजे. कामाप्रती आस्था आणि जनतेप्रती संवेदनशिलता असावी. शाश्वत विकासावर भर देण्यासाठी प्राधान्यक्रम ठरविण्याची सूचनाही त्यांनी केली. महापालिकेच्या उत्पन्नाचा आढावाही त्यांनी घेतला. उत्पन्नवाढीसाठी थकबाकी वसुलीवर भर देण्याचे आदेशित केले याशिवाय, उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचेही सांगितले. दरम्यान, मुंढे यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिका-यांशीही स्वतंत्ररित्या चर्चा करत स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती जाणून घेतली.
अग्निशमन प्रमुखाला काढले बाहेर
तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच अधिका-यांची बैठक घेतली. त्यामुळे अधिकारीवर्गाची धावपळ उडाली. बैठक सुरू असतानाच उशिराने पोहोचलेले अग्निशमन विभागप्रमुख अनिल महाजन यांनी गणवेशावर शोल्डर रॅँक आणि कॅप घातली नसल्याचे मुंढे यांच्या लक्षात आले. त्यांनी महाजन यांना त्याबाबत सुनावले आणि गणवेशात या, असे फर्मान सोडले. मुंढे यांच्या या अनपेक्षित हल्ल्याने महाजन गडबडले आणि बाहेर जात तातडीने आपल्या दालनात जाऊन शोल्डर रॅँक आणि कॅप घालून परत बैठकीला पोहोचले.

Web Title:  Tukaram Mundhe's 'First Day First Show' in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.