जिल्हा परिषदेवर भगवा

By admin | Published: March 22, 2017 02:07 AM2017-03-22T02:07:08+5:302017-03-22T02:07:22+5:30

नाशिक : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना-काँग्रेस-माकपा आघाडी कायम राहत अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल सांगळे यांची, तर उपाध्यक्षपदी कॉँग्रेसच्या नयना गावित यांची निवड झाली.

Saffron on Zilla Parishad | जिल्हा परिषदेवर भगवा

जिल्हा परिषदेवर भगवा

Next

नाशिक : जिल्हा परिषदेच्या बहुचर्चित अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेना-काँग्रेस-माकपा आघाडी कायम राहत अध्यक्षपदी शिवसेनेच्या शीतल उदय सांगळे यांची, तर उपाध्यक्षपदी कॉँग्रेसच्या नयना रमेश गावित यांची ३७ विरुद्ध ३५ अशा दोन मतांनी निवड झाली. या निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीला सोबत घेत सेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु माकपाने सेनेला साथ दिल्याने त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाही.  समविचारी नसलेल्या पक्षांच्या युतीने नाशिक जिल्हा परिषदेची निवडणूक यंदा गाजली. या निवडणुकीत शिवसेनेने पारंपरिक मित्र भाजपाला सोबत न घेता काँग्रेस आणि माकपाला बरोबर घेतले, तर भाजपाने राष्ट्रवादीशी युती केली. नेत्यांच्या वारसांच्या उमेदवारीमुळे चुरस निर्माण झालेली ही निवडणूक अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत शिवसेनेकडून शीतल उदय सांगळे यांनी, तर राष्ट्रवादीच्या मंदाकिनी बनकर यांनी अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नयना गावित यांनी, तर भाजपाकडून  डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सांगळे यांना सूचक म्हणून बाळासाहेब क्षीरसागर व दीपक शिरसाट यांनी स्वाक्षरी केली. तर मंदाकिनी बनकर यांना जयश्री पवार व हिरामण खोसकर सूचक राहिले. उपाध्यक्ष पदासाठी डॉ. आत्माराम कुंभार्डे यांना समाधान हिरे व यतिन कदम सूचक होते. नयना गावित यांना यशवंत गवळी सूचक होते. अर्ज छाननीत सर्व अर्ज वैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेत कोणीही अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक घेण्यात आली.  सर्वप्रथम अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या शीतल सांगळे आणि राष्ट्रवादी-भाजपा आघाडीच्या मंदाकिनी बनकर यांच्यात लढत झाली. यात सांगळे यांना ३७, तर मंदाकिनी यांना ३५ मते मिळाली. अवघ्या दोन मतांनी बनकर यांचा पराभव झाला.मंदाकिनी बनकर या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी आहेत. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत या मतांची पुनरावृत्ती झाली. कॉँग्रेसच्या नयना गावित यांनी भाजपाचे उमेदवार डॉ. आत्माराम कुंभार्डे यांचा अवघ्या दोन मतांनी पराभव केला. जिल्हा परिषदेच्या एकूण ७३ जागा आहेत. त्यापैकी सेना-कॉँग्रेस व माकपाच्या एकूण तीन सदस्यांमुळे ३८ मते होती. परंतु माकपाचे गटनेता तटस्थ राहिल्याने विजेत्यांना एक मत कमी मिळाले. शीतल सांगळे या शिवसेनेचे नेते उदय सांगळे यांच्या पत्नी असून सांगळे हे मुळात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. तीन वर्षांपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे; तर नयना गावित या प्रथमच निवडून आल्या आहेत. त्या कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या नात तर इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदारसंघातील आमदार निर्मला गावित यांच्या कन्या आहेत. (प्रतिनिधी)
चिठ्ठीचा कौल गावितांना
कॉँग्रेसमध्ये उपाध्यक्षपदावरून काहीसे संघर्षाचे वातावरण होते. माजी आमदार अनिलकुमार अहेर यांच्या कन्या अश्विनी अहेर, माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या पत्नी सुनीता चारोस्कर तसेच आमदार निर्मला गावित यांच्या कन्या नयना गावित या तिघांमध्ये स्पर्धा होती. त्यात अनिलकुमार अहेर यांनी माघार घेतल्याने गावित व चारोस्कर यांच्यात स्पर्धा कायम होती म्हणून कॉँग्रेसच्या मंडळींनी चिठ्ठी काढून उमेदवार ठरविण्याचा निर्णय घेतला. अखेर चिठ्ठीद्वारे नयना गावित यांचे नाव निघाल्याने प्रश्न सुटला.

 

Web Title: Saffron on Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.