पावसाळी सहल : पर्यटकांना भुरळ घालतयं नाशिकचं ‘कोकण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 02:19 PM2018-07-07T14:19:25+5:302018-07-07T14:38:22+5:30

चौहोबाजूंनी वेढलेली सह्याद्रीची पर्वतरांग हिरवाईने नटली आहे. या नटलेल्या पर्वतरांगांवरुन फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे वाहू लागले आहे. जणू हे धबधबे या डोंगरकड्यांचे ‘दागिने’ भासत आहेत.

Rainy Tour: Likes tourists, 'Kokan' of Nashik | पावसाळी सहल : पर्यटकांना भुरळ घालतयं नाशिकचं ‘कोकण’

पावसाळी सहल : पर्यटकांना भुरळ घालतयं नाशिकचं ‘कोकण’

googlenewsNext
ठळक मुद्दे पर्यटकांनी बेभानपणे या भागात वावरु नये, अशीच अपेक्षा आहे.निसर्गाला ओरबाडू नका

नाशिक : शहरात जरी पावसाची प्रतीक्षा कायम असली तरी मात्र जिल्ह्याचे कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर व नाशिक तालुक्यात पावसाची दमदार सुरुवात झाली आहे. यामुळे पर्यटकांना नाशिकचे ‘कोकण’ भुरळ घालू लागले आहे. पावसाळी सहलींसाठी शहरवासीयांची पावले आता या कोकणाकडे चालू लागली आहे.


मागील आठवड्यापर्यंत दडी मारलेल्या पावसाने अचानक पुन्हा आगमन केल्याने त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्याने हिरवा शालू पांघरला आहे. चौहोबाजूंनी वेढलेली सह्याद्रीची पर्वतरांग हिरवाईने नटली आहे. या नटलेल्या पर्वतरांगांवरुन फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे वाहू लागले आहे. जणू हे धबधबे या डोंगरकड्यांचे ‘दागिने’ भासत आहेत. या निसर्गसौंदर्याचे शहरवासियांमध्ये आकर्षण वाढले असून नाशिकसह गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांमधील भाविक त्र्यंबकेश्वर येथील देवदर्शन आटोपून पावसाळी सहलींचा आनंद या भागात लुटताना दिसत आहे.
पर्यटकांच्या वाढत्या गर्दीबरोबरच या तालुक्यांमध्ये बळीराजाची लगबगही नजरेस पडत आहे. शेतीच्या कामांनी वेग घेतला असून नांगरणी पूर्ण झाली असून लवकरच भात लावणीच्या कामााला सुरूवात होणार असल्याचे चित्र आहे. यंदा पावसाने उशिरा दमदार हजेरी लावल्यामुळे या तालुक्यांमध्येही यंदा शेतीच्या कामांना विलंब झाला; मात्र जुलै महिना उजाडताच पावसाची पुन्हा ‘एन्ट्री’ झाल्याने दुबार पेरणीचे सावट टळले.


‘वाघेरा’चे बहरले सौंदर्य
पावसाच्या आगमनाने हरसूल-वाघेरा घाटाला हिरवाईचे कोंदण लाभले आहे. हा घाट वाघेरा पाडा ते नाकेपाडापर्यंत सात किलोमीटरचा आहे. वनौषधींसाठी घाटाचा परिसर प्रसिध्द आहे. काळानुरूप या घाटामध्येही अतिक्रमण वाढीस लागल्याने वनौषधी नष्ट होऊ लागल्या आहेत. दरडी कोसळण्याचा धोका घाटात अधिक असल्याने पर्यटकांनी पावसाळी सहलीचा आनंद घाटात लुटताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. या घाटात लावण्यात आलेल्या सुचना फलकांकडे दुर्लक्ष करणे दुर्घटनांना निमंत्रण देणारे ठरु शकते.

त्र्यंबकेश्वर-घोटी रस्त्यावर पावसाळी सहलींची धम्माल
त्र्यंबकेश्वर-घोटी हा मार्ग पावसाळी सहलींसाठी प्रसिध्द आहे. या मार्गावर असलेल्या घाटाच्या दुतर्फा असलेले सह्याद्रीचे उंचचउंच डोंगर जणू धुक्यांमुळे लुप्त झाले की काय? असाच भास पर्यटकांना होतो. पाऊसधारांचा वर्षाव अंगावर झेलत पर्यटक छायाचित्रांची हौस भागविताना दिसतात. पेगलवाडी, पहिने या आदिवासी गावातील गावकºयांना पर्यटकांच्या सहलींमुळे काही प्रमाणात रोजगारही उपलब्ध होताना दिसतो. भटकंती करतांना विविध जातीचे वृक्ष, रानभाज्या, फुलं, रानफुलं, पक्ष्यांची घरटी यांचं जवळून निरिक्षण करतानाही काही निसर्गप्रेमी नजरेस पडत आहे.



दुगारवाडी धबधबा बघताय, पण जरा जपून
शहरात येणा-या पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण म्हणजे दुगारवाडी धबधबा होय. या भागातील डोंगरमाथ्यावरून वाहणारे दुधाळ धबधबे, गर्द हिरवाईने नटलेल्या वाटा, अधूनमधून सातत्याने संततधार कोसळणारा पाऊस असे हे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना मोहिनी घालते. नाशिक शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर पर्यटकांच्या पसंतीचा आहे. दुगारवाडी धबधबा हा गर्द हिरवाईतून कोसळणारा अत्यंत उंचीचा धबधबा आहे. मात्र हा भाग धोकादायक असून, पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
सापगाव पासुन धबधब्याकडे पायी जावे लागते. डोंगर दºयातून वाट काढत जाताना उपनदी ओलांडावी लागते, हा अत्यंत अवघड असा टप्पा आहे. त्यामुळे जरा जपूनच या धबधब्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा. सापगावपासून थेट दुगारवाडी धबधब्यापर्यंत जाण्यासाठी अडीच तास लागतात.


त्यांच्या कष्टाचा वाटतो हेवा
‘‘मातीच्या लेकराचं मातीमंदी मन सारं, आभाळाची माया अंगी कष्टाचं वारं ...,’’ या ओळीतुन कष्टाळु शेतकरी आपल्याला अशाच भटकंतीतून सापडतो; मात्र पावसाळी सहलीचा आनंद लुटताना तसा दृष्टीकोनही गरजेचा असतो. येथे फिरताना आदिवासी बांधवांची शेती, शेतीची पद्धत आणि वा-यावर झुलणारी पीके मनाला मोहिनी घालतात आणि आपण ज्यांच्यामुळे अन्न खातो ते अन्नदाता आणि त्याचे कष्ट बघून हेवा वाटतो आणि अभिमानही. घाटमाथ्यावरच्या भटकंतीत शुद्ध हवा तर मिळतेच शिवाय रोजच्या व्यापामुळे शिणलेलं मन प्रसन्न होतं.



निसर्गाला ओरबाडू नका
पावसाळी सहलीदरम्यान अनेक पर्यटक निसर्गाचे नियम सर्रास पायदळी तुडवितात. मद्यपान,नाचगाणे, वृक्षवेलीनां ओरबाडने जेवणानंतरचे खाद्यपदार्थ, प्लास्टिक, रिकाम्या बाटल्या बसल्याजागी फेकून देणे असे प्रकारही सर्रास पहायला मिळतात. निसर्गकृपेने बहरलेला आदिवासी भाग मानवीकृत्यामुळे गलिच्छ होत चालाला आहे. पर्यटकांनी बेभानपणे या भागात वावरु नये, अशीच अपेक्षा अन् आदिवासी बांधवांची मागणी आहे.

Web Title: Rainy Tour: Likes tourists, 'Kokan' of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.