बापाचे वागणे मुलांना जीवनाचे तत्वज्ञान शिकवून जाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 05:38 PM2018-11-20T17:38:22+5:302018-11-20T17:38:37+5:30

सिन्नर: आईचा स्वयंपाक मुलांच्या जीभेला चवीचे वळण लावणारा तर बापाची शिकवण आयुष्य कसे जगाचे याचे वळण लावणारे असते. बाप ही अव्यक्त संस्था असते.

Parents are taught life's philosophy to children | बापाचे वागणे मुलांना जीवनाचे तत्वज्ञान शिकवून जाते

बापाचे वागणे मुलांना जीवनाचे तत्वज्ञान शिकवून जाते

googlenewsNext

सिन्नर: आईचा स्वयंपाक मुलांच्या जीभेला चवीचे वळण लावणारा तर बापाची शिकवण आयुष्य कसे जगाचे याचे वळण लावणारे असते. बाप ही अव्यक्त संस्था असते. सासरी जाणाऱ्या मुलीला उराशी कवटाळून माता धायमोकलून रडू शकते मात्र बापाला तसे करता येत नाही. आई ही नदीसारखी तर बाप समुद्रासारखा अनेक खस्ता खात, दु:खाचे प्रसंग पोटात सामावून घेणारा असतो. बापाचे वागणे मुलांना जीवनाचे तत्वज्ञान शिकवून जाते, असे प्रतिपादन प्रसिध्द वक्ते स्वानंद बेदरकर यांनी केले.
सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालय सप्ताहात ‘शोध बाप -मुलांच्या नात्याचा’ या विषयावरील सहावे पुष्प गुंफतांना ते बोलत होते. वाचनालयाचे पदाधिकारी तसेच व्याख्यानाचे प्रायोजक महेंद्रसिंग परदेशी व कुटुंबिय व्यासपीठावर उपस्थित होते. संत ज्ञानेश्वरांना माउली संबोधून विश्वात्मक पातळीवर स्वतंत्र स्थान देण्यात आले. याच संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांच्या जीवनाची वाटचाल सुकर व्हावी यासाठी त्यांचे वडील विठ्ठलपंतांनी पत्नीसह स्वत:चे जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. माउलींच्या वडिलांचे समर्पण उपेक्षीत असले तरी त्यालाही कधीतरी न्याय द्यावाच लागेल. छत्रपती शिवराय व शंभूराजे यांच्यातील बाप-मुलाच्या नात्याकडेही असेच हळुवारपणे पाहावे लागेल. शिवरायांच्या अंगी असलेले सर्वच गुण अधिक मात्रेने शंभूराजांकडे होते त्या खेरीज अद्वितीय अशी प्रतिभाशक्ती त्यांच्या ठायी होती. त्या अर्थाने ते सवाई असले तरी स्वराज्यासाठीच्या कमालीच्या दगदगीत शिवरायांना इच्छा असूनही शंभूराजांच्या पाठीशी वडील म्हणून हवे तेवढे उभे राहता आले नाही. या बाप-लेकातील नात्याची ओढ, तळमळ आणि बाप म्हणून शिवरायांची उलघाल आपणास इतिहास वाचतांना समजते. जेव्हा रायगडाला जाग येते या वसंत कानेटकरांच्या नाटकातूनही ती अनुभवण्यास मिळते. जन्माला आलेल्या मुलाला डोळे भरून पाहण्यापूर्वीच दाराशी आलेल्या इंग्रज पोलिसांनी सावरकरांना केलेली अटक व नंतर झालेली काळयापाण्याची शिक्षा, तुरूंगात असतांना मुलगा मरण पावल्याचा आलेला निरोप, लोकमान्य टिळकांचा त्यांच्या दत्तकपुत्राने अपेक्षाभंग केल्याने त्यांच्या वाटयाला आलेले दु:ख, बाप म्हणून महात्मा गांधींची मनसिक ओढाताण अशी अनेक उदाहरणे देतांना बेदरकर यांनी बापाचे मोठेपण, कर्तृत्व व त्याग समजावून सांगितला.
 

Web Title: Parents are taught life's philosophy to children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक