उद्रेक : पाच कोटींचा निधी मिळूनही हद्दवाढीतील गावे विकासापासून वंचित

By admin | Published: July 25, 2014 09:59 PM2014-07-25T21:59:12+5:302014-07-26T00:49:22+5:30

संतप्त नागरिकांकडून महापालिकेत तोडफोड

Outbreaks: Overcrowding villages, including five crores of funds, are deprived of development | उद्रेक : पाच कोटींचा निधी मिळूनही हद्दवाढीतील गावे विकासापासून वंचित

उद्रेक : पाच कोटींचा निधी मिळूनही हद्दवाढीतील गावे विकासापासून वंचित

Next

मालेगाव : येथील महानगरपालिकेच्या हद्दवाढ झालेल्या भागासाठी पाच कोटी रुपयांची विकासकामे मंजूर होऊन एक वर्ष झाले तरी त्या कामांची साधी निविदा प्रक्रियादेखील मनपा प्रशासनाने राबविली नाही. परिणामी मुख्यमंत्र्यांकडून नवीन दोन कोटी रुपयांचा विकासनिधी देण्यास वित्त विभागाने नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेले आमदार दादा भुसे, हद्दवाढीतील सर्वपक्षीय नगरसेवक व नागरिकांनी आयुक्त कार्यालया-लगतच्या सभागृहाची तोडफोड केली.
दुपारी आमदार भुुसे यांच्या नेतृत्वाखाली हद्दवाढ भागातील सर्वपक्षीय नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी व नागरिकांचे शिष्टमंडळ मनपा आयुक्त कार्यालयात पोहोचले. तेथे सभागृहात बैठकीस प्रारंभ झाला. आयुक्त मुंबई येथे बैठकीसाठी गेल्यामुळे त्यांच्या जागेवर मनपा उपायुक्त राजेंद्र फातले व बांधकाम अभियंता कैलास बच्छाव यांनी शिष्टमंडळाशी चर्चेस प्रारंभ केला. हद्दवाढीतील नागरिकांनी गेल्या तीन वर्षात जकात, एलबीटी, पारगमन शुल्क (एस्कॉर्ट), गृहकर यांच्या माध्यमातून मनपास १०० कोटींहून अधिक उत्पन्न मिळवून दिले. मात्र त्याच भागासाठी पाच कोटी रुपयांची विकासकामे मंजूर होऊन वर्ष झाले तरीही मनपा प्रशासनाने या कामांची निविदादेखील काढलेली नाही. गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगावच्या हद्दवाढ भागासाठी दोन ते तीन कोटी रुपये देण्याची शिफारस वित्त विभागाकडे केली होती. मात्र वित्त विभागाने आधी दिलेल्या निधीतून विकासकामे झाली नसल्याचे कारण देत नवीन निधी देण्यास नकार दिला. मनपा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच हद्दवाढ भागातील विकासकामे रखडल्याचा व वाढीव निधी मिळू न शकल्याचा आरोप आमदार भुसे यांनी केला.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हद्दवाढ भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या भागात पक्के रस्ते व गटारीची सोय नसल्यामुळे पाऊस झाल्यानंतर चिखल होऊन नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्कील होते. विद्यार्थी, महिला व वृद्ध व्यक्ती चिखलात पडून जखमी होतात. पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात जाते. या भागात बहुसंख्य ठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक शौचालये नाहीत. पथदीप नाहीत. पाणीपुरवठाही जुन्या योजनांद्वारेच होत आहे. मनपात समावेश केल्यानंतर चार ते सहापट गृहकर व पाणीपट्टीत वाढ होऊन या भागातील नागरिकांची आर्थिक लूट केली जात आहे. त्या तुलनेत सोयीसुविधा नाहीत. त्यामुुळे मनपाच्या हद्दवाढ भागासाठी फायदा काय, असा सवाल या भागातील सर्वपक्षीय नगरसेवक व नागरिकांनी या बैठकीत केला.
मनपा अधिकाऱ्यांनी निवडणूक आचारसंहिता होती. यासह काही तांत्रिक कारणे पुढे केली. ती शिष्टमंडळाने मान्य केली नाहीत. आता पुन्हा पुढील महिन्यात विधानसभेची आचारसंहिंता लागू होईल. त्यामुळे प्राथमिक व मूलभूत सोयीसुविधांसाठी करदात्या नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे किती दिवस भीक मागायची, असा सवाल भुसे यांनी केला. जर मनपा प्रशासन हद्दवाढ भागावर असाच अन्याय करत असेल तर आम्हाला मनपा नको, अशी भूमिका मांडली. त्यास उपस्थित नगरसेवक व नागरिकांनी टाळ्या वाजवून संमती दिली. या दरम्यान मनपा सहाय्यक आयुक्त शिरीष पवार बैठकीत सामील झाले.
हद्दवाढ भागातील विकासकामांबाबत मनपा प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याशिवाय आपण येथून हलणार नाही व अधिकाऱ्यांना कोंडून ठेवू, अशी भूमिका भुसे यांनी जाहीर केल्यानंतर अधिकाऱ्यांनी विचारविनिमय करून एक लेखी पत्र तयार केले. ते बघितल्यावर आमदार भुसे अधिक संतप्त झाले. आम्हाला काय मूर्ख समजतात काय, असे म्हणत त्यांनी ते हवेत भिरकावले. आचारसंहिता लागू होण्याअगोदर म्हणजे येत्या १५ आॅगस्टपासून कामे सुरू करण्याचे आश्वासन द्या, अशी आग्रही मागणी भुसे यांनी केली. मात्र मनपा अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बघत त्यावर सोयीस्कर मौन बाळगले. त्यामुळे संतप्त झालेल्या भुसे यांनी टेबलावर जोरदार प्रहार केला. त्यानंतर उपस्थित नगरसेवक, सेना पदाधिकारी व नागरिकांनी सभागृहाच्या तोडफोडीस सुरुवात केली. शिष्टमंडळात समाविष्ट महिला तातडीने सभागृहाच्या बाहेर पडल्या. सदर तोडफोडीत सभागृहातील खुर्च्या, खिडक्या, लाइट, कॅल्क्युलेटर, पंखे, झुंबर, एसी, फलक आदि वस्तूंचे नुकसान झाले. काही नागरिक व कार्यकर्ते यांनी आयुक्त जाधव यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली; मात्र त्यांना आमदार भुसे व पदाधिकाऱ्यांनी रोखले. त्यानंतर मनपाच्या निषेधार्थ घोषणा देत शिष्टमंडळातील नागरिक सभागृहाबाहेर पडले.
यावेळी आमदार भुसे यांच्यासह मनपातील विरोधी पक्षनेते दिलीप पवार, शिवसेना गटनेते मनोहर बच्छाव, नगरसेवक तानाजी देशमुख, विठ्ठल बर्वे, नगरसेविका विजया काळे, ज्योती सुराणा, संगीता चव्हाण, भारत म्हसदे, इब्राहिम शेख, प्रमोद शुक्ला, रामा मिस्तरी, कैलास तिसगे आदिंसह हद्दवाढ भागातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी बैठकीस उपस्थित उपायुक्त राजेंद्र फातले, सहाय्यक आयुक्त शिरीष पवार, बांधकाम अभियंता कैलास बच्छाव व अभियंता संजय जाधव यांनी काढता पाय घेतल्याने संतप्त नागरिकांच्या रोषापासून त्यांचा बचाव झाला.

Web Title: Outbreaks: Overcrowding villages, including five crores of funds, are deprived of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.