...तरच नाशिकचे पक्षीजीवन होईल अधिक समृध्द

By अझहर शेख | Published: November 9, 2020 07:53 PM2020-11-09T19:53:05+5:302020-11-09T19:57:24+5:30

फटाक्यांच्या आवाजामुळे पक्षी भेदरतात आणि रात्री ते घरटी सोडून बाहेर पडतात यावेळी ते जमीनीवरसुध्दा कोसळतात. त्यामुळे कानठिळ्या बसविणारे व अधिक वायुप्रदूषण करणारे फटाके वाजू नयेत.

... Only then will the bird life in Nashik be more prosperous | ...तरच नाशिकचे पक्षीजीवन होईल अधिक समृध्द

...तरच नाशिकचे पक्षीजीवन होईल अधिक समृध्द

Next
ठळक मुद्देफटाक्यांच्या आवाजामुळे पक्षी भेदरतात नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य हे तर पक्ष्यांचे माहेरघर गिधाडेदेखील नाशिकमध्ये सहज नजरेस पडतात‘बर्ड ट्रिटमेंट सेंटर’ सुरु करणे नीतांत गरजेचे

राज्य शासनाने जाहीर केलेल्या पक्षी सप्ताहचा येत्या गुरुवारी (दि.१२)  पक्षी निरीक्षण दिनाला समारोप होत आहे. भारताचे ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सालीम अली यांची यादिवशी जयंती सर्वत्र पक्षी निरीक्षण दिन म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्ताने उत्तर महाराष्ट्र पक्षी संमेलनाचे अध्यक्ष व नाशिकचे पक्षी अभ्यासक अनिल माळी यांच्याशी साधलेला संवाद....

* नाशिकचे पक्षीजीवन समृध्द आहे, असे वाटते का?
- हो,पक्षीजीवन समृध्द आहे, याचे लक्षण म्हणजे नाशिककरांना आपल्या घरांच्या आजुबाजुला आजही किमान ३० ते ४० पक्षी सहज पहावयास मिळतात. शहरातील व उपनगरांमधील बगीचे, उद्याने महापालिकेने गांभीर्याने लक्ष देत ती अधिक निटनेटकी केली आणि त्यांची वेळोवेळी निगा राखली तर निश्चितच पक्ष्यांची संख्या अधिक वाढेल आणि पक्ष्यांची भूक भागविणारे व त्यांना रात्री आश्रय घेता येईल असे वृक्ष लागवड केल्यास पक्षी संवर्धनाला हातभार लागेल. अलिकडे विस्तारणारे शहरीकरण आणि वृक्षारोपणासाठी चुकीच्या पध्दतीने वृक्ष प्रजातींची होणारी निवड यामुळे पक्षी विविधतेवर परिणाम होताना दिसून येऊ लागले आहे. उदा. स्वर्गीय नर्तक (पॅराडाईज फ्लायकॅचर), धनेश, ग्रे-हॉर्नबिल, सुगरण या पक्ष्यांची संख्या आधिवास ºहासामुळे कमी होऊ लागली आहे. जुने मोठे वृक्ष, ओसाड होत जाणारा गोदावरीचा काठ, काटेरी झाडांची घटती संख्या यांमुळे यांसारख्या पक्ष्यांच्या संख्येवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. याबाबत नाशिककरांना अधिक बारकाईने लक्ष द्यावे लागणार आहे.



* पक्ष्यांची जैवविविधता विकसित होईल, असे वातावरण शहरात आहे का?
- पक्ष्यांची जैवविविधता जर नाशकात विकसीत करायची असेल तर सध्या असलेल्या वातावरणात सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषणाला आळा घालावा लागणार आहे. अलिकडे शहरात झपाट्याने लोकसंख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे ध्वनी, वायु, जल प्रदूषणातही भर पडत आहे. त्याचा थेट परिणाम येथील पक्षीजीवनावर होताना दिसतो. गोदाकाठालगत मोठ्या प्रमाणात यापुर्वी वंचक, पाणकावळे, खंड्या, बंड्या, छोटा धीवर असे विविध पक्षी पहावयास मिळत होते; परंतु वाढलेल्या पाणवेली जलप्रदूषण, माणसांची गर्दी यामुळे नदीकाठापासून हे पक्षी दुरावले आहेत. घार, शराटींसारख्या पक्ष्यांची संख्या शहरातील गोदावरीच्या उपनद्यांभोवती वाढलेली दिसून येते. यावरुन असे लक्षात येते की नाशिक शहरातील नंदिनी, वालदेवींसारख्या नद्या व नैसर्गिक पावसाळी नाले यांची स्वच्छता धोक्यात आली आहे. यामुळे या ठिकाणी घाणीवर पोसणारे पक्षी वाढू लागले आहे. त्यामुळे कुठेतरी पक्षी जैवविविधतेमध्ये होणारा विस्कळीतपणा कमी होण्यास मदत होईल.
* नाशिक पक्ष्यांच्या बाबतीत खरेच नंदनवन आहे का?
- हो..! नाशिकच्या चौहोबाजूंनी टेकड्या, वृक्षराजी, धरण परिसर, गवताळ प्रदेश, माळरान, घाट परिसर असल्यामुळे पक्ष्यांची विविधता आपल्याला आढळून येते. दुर्मीळ झालेला वनपिंगळा ही घुबडाची एक प्रजाती, लांब चोचीचे गिधाड, पांढऱ्या पाठीची गिधाडेदेखील नाशिकमध्ये सहज नजरेस पडतात. यावरुन नाशिकमधील पक्ष्यांची जैवविविधता किती समृध्द आहे, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. मात्र, त्यांचा अधिवास धोक्यात येणार नाही, याची काळजी नाशिककरांना भविष्यात घ्यावी लागणार आहे. त्यासाठी जनजागृतीदेखील आवश्यक ठरणार आहे. जखमी पक्ष्यांकरिता नाशिक शहरात वनविभाग किंवा महापालिका प्रशासनाने ‘बर्ड ट्रिटमेंट सेंटर’ सुरु करणे नीतांत गरजेचे आहे.

* नाशकात पक्षी निरीक्षणाची ठिकाणे नेमकी कोणती?
-पांडवलेणी राखीव वन, चामरलेणी, म्हसरुळजवळील नाशिक वनराई, एकलहरे अ‍ॅश डॅम, गोदाकाठ (आनंदवली बंधारा, सोमेश्वर परिसर, तपोवन) गंगापुर धरण परिसर, वनविभागाची गंगापूर रोपवाटिका, देवळाली कॅम्प भागातील खंडोबा टेकडी ही शहराजवळीची पक्षी निरिक्षणाची ठिकाणे सांगता येतील. तसेच नाशिकपासून अवघे ४५ किमी अंतरावर असलेले नांदुरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य हे तर पक्ष्यांचे हक्काचे माहेरघर आहे. येथील पक्ष्यांच्या समृध्द जैवविविधतेमुळेच या पाणस्थळाला रामसर दर्जा प्राप्त झाला आहे. तसेच जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरजवळील अंजनेरी राखीव वनक्षेत्र, ब्रम्हगिरी, आळंदी धरण, वाघाड धरण, काश्यपी, बोरगड राखीव वन, किकवी नदी इगतपुरी, हरसुल या भागातसुध्दा उत्तमप्रकारे पक्षीनिरिक्षणाला वाव आहे.


* आगामी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर पक्षी संवर्धनासाठी आपण काय आवाहन कराल?
फटाक्यांच्या आवाजामुळे पक्षी भेदरतात आणि रात्री ते घरटी सोडून बाहेर पडतात यावेळी ते जमीनीवरसुध्दा कोसळतात. त्यामुळे कानठिळ्या बसविणारे व अधिक वायुप्रदूषण करणारे फटाके वाजू नयेत. तसेच सभोवताली असलेली मनपाची उद्याने, भुखंड, नदीकाठ, तसेच आपल्या जवळ असलेल्या मोठ्या झाडांजवळ शक्यतो फटाके वाजविणे टाळावे. पर्यावरणपुरक (ग्रीन क्रॅकर्स) फटाक्यांच्या वापरास (मर्यादित) प्राधान्य द्यावे. सर्वत्र फटाक्यांचा आवाज होऊ लागल्यामुळे पक्ष्यांजी भटकंती वाढून सुरक्षित अधिवासाच्या शोेधात त्यांची दमछाक वाढते, मात्र ही बाब आनंदी व उत्साही मनुष्याच्या लक्षात सहजासहजी येत नाही, किंबहुना त्याकडे दुर्लक्षच होते.
---
शब्दांकन : अझहर शेख, नाशिक

Web Title: ... Only then will the bird life in Nashik be more prosperous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.