नरेंद्र दराडे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 10:20 PM2018-05-24T22:20:34+5:302018-05-24T22:20:34+5:30

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे तब्बल ३९९ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी कॉँग्रेस-भाजपा आघाडीचे शिवाजी सहाणे यांचा १६७ मतांनी दणदणीत पराभव केला. सहाणे यांना २३२ मते मिळाली. नरेंद्र दराडे यांच्या विजयाने नाशिकच्या मतदारसंघावर पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकला.

Narendra Darade won | नरेंद्र दराडे विजयी

नरेंद्र दराडे विजयी

Next
ठळक मुद्देविधान परिषदेच्या निवडणूक : आघाडीसह भाजपाला धोबीपछाड

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुुकीत शिवसेनेचे नरेंद्र दराडे तब्बल ३९९ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी कॉँग्रेस-भाजपा आघाडीचे शिवाजी सहाणे यांचा १६७ मतांनी दणदणीत पराभव केला. सहाणे यांना २३२ मते मिळाली. नरेंद्र दराडे यांच्या विजयाने नाशिकच्या मतदारसंघावर पहिल्यांदाच शिवसेनेचा भगवा फडकला असून, या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्णातील राजकीय समीकरणांवर आगामी काळात मोठा परिणाम जाणवणार आहे. दराडे यांच्या विजयाची घोषणा होताच जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.
मतदानाच्या अखेरच्या दिवसापर्यंत उत्कंठा व उत्सुकता वाढविणाऱ्या या निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मतदानाच्या आदल्या दिवशी भारतीय जनता पार्टीने कॉँग्रेस आघाडीचे शिवाजी सहाणे यांना पाठिंबा जाहीर केला, तर भाजपाच्या भरवशावर जिल्हा विकास आघाडीकडून उमेदवारी करणारे परवेज कोकणी यांनी शेवटच्या दिवशी आपले समर्थन शिवसेनेच्या दराडे यांच्या पाठीशी उभे केल्याने निवडणुकीचे सारे चित्र पालटले. सर्वच पक्षांच्या मतांची फाटाफूट होऊन निवडणुकीचा निकाल घोषित होताच, भाजपासह कॉँग्रेस आघाडीला मोठा धक्का बसला. सोमवारी या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले होते. ६४४ मतदारांनी शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावल्यानंतर दराडे व सहाणे या दोघांनीही विजयाचा दावा केला होता.
गुरुवारी सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत भवन येथे मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. साधारणत: साडेनऊ वाजता निवडणुकीचा कल लक्षात येताच, कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी आपल्या समर्थकांसह मतदान केंद्रातून काढता पाय घेतला. या मतमोजणीत प्रारंभी वैध, नोटा व संशयित मतपत्रिकांची छाननी करण्यात आली असता १३ मते बाद ठरविण्यात आली. त्यामुळे उर्वरित ६३१
वैध मतांमधून विजयी उमेदवारासाठी
३१६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.

प्रत्यक्ष मतमोजणीत नरेंद्र दराडे यांना ३९९, तर शिवाजी सहाणे यांना २३२ मते मिळाली. जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी यांना शून्य मते मिळाल्याचे जिल्हाधिकाºयांनी जाहीर केले.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेचे सर्वाधिक म्हणजे २०७, भाजपाचे १६७, राष्टÑवादीचे १००, कॉँग्रेसचे ७१, मनसेचे ५, आरपीआयचे ५, एमआयएमचे ७, जनता दलाचे ६, शहर विकास आघाडीचे १८, जनशक्ती पॅनलचे ५, माकपाचे १३ व अपक्ष ३८, बसपा १ असे ६४४ मतदार होते. त्यातील भाजपा, मनसेने कॉँग्रेस आघाडीला जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेस या मतदारसंघावरील आपले वर्चस्व कायम राखेल असा अंदाज व्यक्त केला जात होता, तर शिवसेनेने या निवडणुकीत एकाकी लढत देऊनही विजयश्री खेचून आणली.
विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच शिवसेनेने सर्वप्रथम नरेंद्र दराडे यांची उमेदवारी जाहीर करून इच्छुक शिवाजी सहाणे यांची पक्षातून हकालपट्टी केली होती, तर उमेदवाराच्या शोधात असलेल्या राष्टÑवादीने शिवाजी सहाणे यांना पक्षप्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केली होती. कॉँग्रेस व मनसेने त्यांना पाठिंबा दिला होता. लोकसभेच्या पालघर येथील पोटनिवडणुकीत सेनेने उमेदवार उभा केल्यामुळे नाराज भाजपाने जिल्हा विकास आघाडीच्या नावे परवेज कोकणी यांच्या पाठीशी प्रारंभी आपले बळ उभे केले. परंतु अखेरच्या क्षणी कोकणी यांना ठेंगा दाखवित राष्टÑवादीला आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे दराडे व सहाणे यांच्यात सरळ सरळ लढत झाली. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मतदारांना मोठ्या प्रमाणावर ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्याने तसेच अखेरच्या टप्प्यात जातीय धुव्रीकरण करण्यात आल्यानेही जय-पराजयाचे गणित विस्कटले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. मतमोजणीदरम्यान दराडे आघाडीवर असल्याचे कळताच शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धाव घेत जोरदार जल्लोष साजरा केला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार अनिल कदम, राजाभाऊ वाजे, संपर्क नेते भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाऊलाल तांबडे, सुहास कांदे, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बिडवे, अजय बोरस्ते आदींनी नरेंद्र दराडे यांचे अभिनंदन केले. ‘आला रे आला, शिवसेनेचा वाघ आला’अशा घोषणा देत ढोलताशांच्या गजरात दराडे यांची मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघालेली मिरवणूक शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय येथे विसर्जित करण्यात आली.
सकाळी ६ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत स्ट्रॉँग रूम उघडून सर्व मतपेट्या पोलीस बंदोबस्तात मतमोजणीस्थळी आणण्यात आल्या.
मतपत्रिका वैध ठरविताना १३ मतपत्रिका बाद ठरविण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने मतपत्रिकेवर नोंद करताना मतदारांनी वेगवेगळ्या प्रकारच्या खुणा केल्या होत्या. या १३ मतांमध्ये ११ मते दराडे यांचे, तर सहाणे यांचे दोन मते होती.
सर्व मतपत्रिकांच्या छाननीत एकाही मतदाराने नोटाचा (यापेक्षा कोणी नाही) वापर केला नाही. विशेष म्हणजे मत बाद होऊ नये म्हणून दोन अशिक्षित मतदारांनी मतदान करण्यासाठी सहायकाची मदत घेतली होती.
* पसंतीक्रमाने मतदाराची निवड करण्यात येत असल्याने यंदाच्या निवडणुकीत दराडे व सहाणे या दोघांनाही मतदारांनी पहिल्याच पसंतीक्रमाचे मतदान केले, त्यामुळे दुसºया किंवा तिसºया क्रमांकाची मते मोजण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही.
* एकूण ६३१ वैध मतांना दोनच्या संख्येने भागून त्यात अधिकचे एक मत असा ३१६ मतांचा कोटा ठरविण्यात आला.
* मतांची मोजणी सुरू असतानाच कॉँग्रेस आघाडीचे शिवाजी सहाणे यांनी मतमोजणी केंद्र सोडले.
* प्रारंभी मतमोजणीत दराडे यांना ४०० मते, तर शिवाजी सहाणे यांना २३१ मते पडल्याचे लक्षात आले. परंतु त्यातील एका मतपत्रिकेवर दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांनी हरकत घेतली व पुन्हा मतमोजणीचा निर्णय घेण्यात आला. फेरमतमोजणीत दराडे यांचे एक मत कमी झाले व सहाणे यांना वाढीव एक मत मिळाले.
* मतमोजणी कक्षात दराडे यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून विनायक पांडे व सुधाकर बडगुजर हे उपस्थित होते.
* दराडे यांनी आघाडी घेतल्याचे वृत्त वाºयासारखे पसरताच खासदार हेमंत गोडसे हे थेट मतमोजणी कक्षात दाखल झाले, ही बाब निवडणूक निर्णय अधिकारी बी. राधाकृष्णन् यांच्या लक्षात येताच, त्यांनी गोडसे यांना कक्षातून बाहेर काढले.

भुजबळ यांची मदत नेमकी कोणाला?

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील गेल्या दोन निवडणुकीत राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. त्याच बळावर जयंत जाधव यांना दोन वेळा आमदारकीची संधी मिळाली होती. परंतु दोन वर्षांपूर्वी भुजबळ तुरुंगात गेल्यानंतर त्यांची नाशिक जिल्ह्णाच्या राजकारणा वरील पकड काहीशी सैल झाल्याचे जाणवत असताना विधान परिषदेच्या निवडणुकीत तुरुंगातून नुकतेच सुटलेले छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेतात याकडे साºयांचेच लक्ष होते. राष्टÑवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी भुजबळ यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले, तर त्यांच्या पाठोपाठ परवेज कोकणी यांनीदेखील भुजबळ यांची भेट घेतली होती. त्यामुळे येवल्याचे असलेले नरेंद्र दराडे यांना भुजबळ पाठिंबा देतील की नाही याविषयी राजकीय वर्तुळात विविध तर्क बांधले जात होते. परंतु भुजबळ यांनी या निवडणुकीत पक्षाच्या बाजूने उभे राहण्याचे ठरविले होते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी झाल्याचे घोषित होताच, भुजबळ यांच्या भूमिकेविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली. त्याच पार्श्वभूमीवर आपल्या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नरेंद्र दराडे यांनी ‘आपल्या विजयात छगन भुजबळ यांनी मदत केली’ अशा प्रकारचे विधान केल्याने वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

जातीयवादी प्रचाराचा पराभव
विधान परिषदेच्या निवडणुकीची गेल्या एक वर्षापासून तयारी करीत होतो. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची उमेदवारी दिली त्यामुळे ही निवडणूक अधिक सोपी होऊन आपला विजय निश्चित झाला होता. या निवडणुकीच्या निमित्ताने काही प्रमाणात जातीयवादी प्रचार करण्यात येऊन मतदारांना भुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु मतदारांनी तो झुगारून लावला.
- नरेंद्र दराडे,
विजयी उमेदवार

Web Title: Narendra Darade won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.