तुकाराम मुंढेंचा दुसरा धक्का, मीडियाशी बोलण्यावर अधिकाऱ्यांवर घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 02:45 PM2018-02-12T14:45:51+5:302018-02-12T15:05:35+5:30

मुख्यमंत्री महोदयांनी नाशिक महापालिकेत ‘पारदर्शक’ कारभारासाठी पाठविलेल्या नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मात्र, कामकाजाच्या दुस-याच दिवशी पारदर्शकतेला छेद देणारा फतवा जारी केला आहे.

Media barricade by Tukaram Mundhe | तुकाराम मुंढेंचा दुसरा धक्का, मीडियाशी बोलण्यावर अधिकाऱ्यांवर घातली बंदी

तुकाराम मुंढेंचा दुसरा धक्का, मीडियाशी बोलण्यावर अधिकाऱ्यांवर घातली बंदी

Next
ठळक मुद्दे कामकाजाच्या दुस-याच दिवशी पारदर्शकतेला छेद देणारा फतवा जारीअधिका-यांना मीडियाबंदी करण्याच्या ह्या फतव्यामुळे मुंढे यांच्या कार्यपद्धतीविषयी संशयाचे मोहोळ

नाशिक - मुख्यमंत्री महोदयांनी नाशिक महापालिकेत ‘पारदर्शक’ कारभारासाठी पाठविलेल्या नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मात्र, कामकाजाच्या दुस-याच दिवशी पारदर्शकतेला छेद देणारा फतवा जारी केला आहे. कोणत्याही अधिका-यांनी मीडियाशी बोलू नये, अशी तंबी देतानाच मुंढे यांनी प्रसिद्धीचा झोत केवळ आपल्यावरच राहण्याची केलेली ही योजकता मुंढे यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘कर्तव्यदक्ष’ म्हणून प्रसिद्धी पावलेले तुकाराम मुंढे यांची दत्तक नाशिकचे नवनिर्माण होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्तपदी नेमणूक केली आणि नाशिक महापालिकेत मुंढे पर्वास प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी मुंढे यांनी बैठकीत गणवेश घालून न आलेल्या अग्निशमन प्रमुखाला बाहेर पाठवत आपल्या कामगिरीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर, पत्रकार परिषद घेत त्यांनी महापालिकेत ‘पारदर्शक’ कारभाराबाबत भाषण ठोकत अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे दिले होते. सोमवारी (दि.१२) तुकाराम मुंढे यांनी ख-या अर्थाने आपल्या कामकाजास सुरूवात केली.

महापालिकेत आल्या-आल्या मुंढे यांनी खातेप्रमुखांची बैठक घेतली आणि यापुढे एकाही अधिका-याने मीडियाशी बोलता कामा नये, असा सज्जड दमच दिला. याशिवाय, मीडियाशी केवळ मीच बोलणार, असे सांगत प्रसिद्धीचा झोत केवळ आपल्यावर राहण्याची योजकताही दाखविली. मुंढे यांनी मीडियाबंदी केल्यामुळे अधिकारीवर्गाकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दर्शविण्यात आला. अधिका-यांना मीडियाबंदी करण्याच्या ह्या फतव्यामुळे मुंढे यांच्या कार्यपद्धतीविषयी संशयाचे मोहोळ निर्माण झाले आहे. यापूर्वी, संजय खंदारे यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकीर्दीत अशाच प्रकारचे पत्रक खातेप्रमुखांना काढले होते. परंतु, हेच खंदारे नंतर रोबोटिक मशिन खरेदी, एलईडी घोटाळा यामध्ये आरोपीच्या पिंज-यात उभे केले गेले होते. नंतर, त्यांची उचलबांगडीही झाली होती. आता ‘कर्तव्यदक्ष’ म्हणून मीडियात झळकणा-या मुंढे यांनी अधिका-यांना मीडिया बंदीचा फतवा काढल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 

कार्यालयात देवबंदीही...!
तुकाराम मुंढे यांनी अधिका-यांना त्यांच्या कार्यालयात असलेल्या देव-देवतांच्या तसबिरीही हटविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर आयुक्तांच्या स्वीय सचिवांच्या कक्षात असलेली दत्ताची तसबिर काढण्यात आली तर अन्य अधिकाºयांनी आपल्या कार्यालयातील तसबिरी हटविल्या. मुंढे यांनी देवबंदी करत न्यायालयाच्या निर्देशाचे पालन केले असले तरी श्रद्धेला हात घालून ‘पारदर्शक’ कारभार होईल काय, असा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. मुंढे यांनी अधिका-यांनी कार्यालयात येताना जीन्स पॅँट, टी-शर्ट घालून येऊ नये, फार्मल ड्रेसमध्येच यावे, पायात स्पोर्ट शूज नकोत, असे आदेशही दिल्याचे समजते. त्यामुळे, अधिकारी वर्ग धास्तावला असून ड्रेस-शूज आणि प्रशासकीय कामकाजाची घालण्यात आलेली सांगड चर्चेचा विषय बनली आहे. राजीव गांधी भवनमधील प्रवेशद्वारावर लागणा-या दुचाकीही हटविण्याचे निर्देश मुंढे यांनी दिले.

 

Web Title: Media barricade by Tukaram Mundhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.