मालेगाव तहसिलदारांना लाचप्रकरणी अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 10:18 PM2017-09-22T22:18:30+5:302017-09-22T22:19:02+5:30

गौण खनिजाचे उत्खनन करुन डंपरद्वारे वाहतुकीची परवानगी देण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन व तडजोडी अंती ४० हजार रुपये हप्ता ठरल्याप्रकरणी मालेगाव येथील तहसिलदार डॉ. सुरेश कोळी यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे.

Malegaon tahsildars arrested in bribe | मालेगाव तहसिलदारांना लाचप्रकरणी अटक

मालेगाव तहसिलदारांना लाचप्रकरणी अटक

Next

नाशिक, दि. २२ - गौण खनिजाचे उत्खनन करुन डंपरद्वारे वाहतुकीची परवानगी देण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन व तडजोडी अंती ४० हजार रुपये हप्ता ठरल्याप्रकरणी मालेगाव येथील तहसिलदार डॉ. सुरेश कोळी यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. तर याच प्रकरणात फरार झालेले गौण खनिज विभागाचे लिपिक गोकुळ पाटील हे पथकाला शरण आले होते. रात्री उशीरापर्यंत येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
तालुक्यातील व-हाणे येथील मनोज पवार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पवार यांचा विटभट्टी व गौणखनिज विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी येथील महसुल विभागाकडे गौणखनिज वाहतुकीसाठी परवानगी मागितली होती. तसेच ११ जुलै रोजी येथील महसुल विभागाच्या पथकाने त्यांचे डंपर पकडले होते. २ ब्रास गौणखनिजापोटी २ लाख ४ हजार रुपयांचा दंड भरला होता. पवार यांना केवळ १३ हजार रुपयांची दंड भरल्याची पावती देण्यात आली होती. यानंतर डंपर चालवायचे असेल तर ५० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल असे सांगण्यात आले होते. तडजोडीअंती ४० हजार रुपये हप्ता ठरला होता. याप्रकरणी पवार यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पथकाने ११ जुलै रोजी पडताळणी केली होती. त्यानंतर चार ते पाच वेळेस पथकाने सापळा रचला होता. मात्र तहसिलदार कोळी व लिपिक पाटील यांनी पैसे स्वीकारले नाहीत. पथकाने लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरुन शुक्रवारी तहसिलदार कोळी यांना कार्यालयातुन ताब्यात घेतले. तसेच त्यांच्या कार्यालयाची तपासणी केली. येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई चालू असताना लिपिक पाटील हे पथकाला शरण आले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक पवन देसले, पोलीस हवालदार कैलास शिरसाठ, संतोष हिरे, जितेंद्र परदेशी, किरण साळी, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडीले, सतीश जावरे, कैलास जोरे, सुधीर सोनवणे, मनोहर ठाकुर, प्रकाश सोनार आदिंनी ही कारवाई केली.

Web Title: Malegaon tahsildars arrested in bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.