हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट का कापले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:52 AM2019-03-24T00:52:55+5:302019-03-24T00:53:17+5:30

सर्वपक्षीय संबंध ही हरिश्चंद्र चव्हाण यांची जशी जमेची बाब तशी ती अडचणीत आणणारी ठरली. भाजपात येऊनही थेट संघटनेशी तुटलेली नाळ आणि सत्तेच्या विरोधातच घेतलेली भूमिका याबाबी चव्हाण यांची उमेदवारी कापण्यास कारणीभूत ठरल्या असल्याचे मानले जात आहे.

Harishchandra Chavan's ticket was cut? | हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट का कापले?

हरिश्चंद्र चव्हाण यांचे तिकीट का कापले?

Next

नाशिक : सर्वपक्षीय संबंध ही हरिश्चंद्र चव्हाण यांची जशी जमेची बाब तशी ती अडचणीत आणणारी ठरली. भाजपात येऊनही थेट संघटनेशी तुटलेली नाळ आणि सत्तेच्या विरोधातच घेतलेली भूमिका याबाबी चव्हाण यांची उमेदवारी कापण्यास कारणीभूत ठरल्या असल्याचे मानले जात आहे.
माकपाचा बालेकिल्ला असलेल्या सुरगाणा तालुक्यात विधानसभा निवडणुकीत चव्हाण यांनी अपक्ष निवडणूक लढवून बाजी मारली. त्यामुळे चव्हाण यांच्या माध्यमातून भाजपाला आदिवासी क्षेत्रात विस्तार करण्याची संधी दिसत होती. चव्हाण यांनी अपेक्षेनुरूप लोकसभेत यश मिळविले. परंतु चव्हाण यांना पक्षाला न्याय देऊ शकले नाही. भाजपाने संघटनात्मक वाढीचा कार्यक्रम आखला. परंतु चव्हाण यांचा सक्रिय सहभाग यथातथाच राहिल्याचे सांगितले जाते. दिंडोरी मतदारसंघातील विधानसभा अथवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला फायदा करून देण्यापेक्षा अलिप्तताच स्वीकारली. पक्षाने त्यांना अनुसूचित मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष, तर त्यांचे चिरंजीव इंद्रजित यांना युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्षपद देण्यात आले, परंतु मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वांकाक्षी सीएम चषकसाठी पालकमंत्र्यांनी सूचित करूनही त्यांनी वेळ दिला नाही.
तीनवेळा निवडून आल्यानंतर प्रस्थापितांच्या विरोधातील जनमताचा फटका त्यांना बसण्याची शक्यता भाजपाच्या सर्वेक्षणात दिसली. त्यातच आदिवासी विभागातील भरती प्रकरण किंवा सुरगाण्यातील शासकीय समित्यांवर अशासकीय नियुक्ती असो सत्तेच्या विरोधात त्यांनी घेतलेली भूमिकादेखील पक्षाला खटकली होती. त्याचा परिणाम उमेदवारी देताना दिसून आला.
भाजपाने केलेल्या सर्वेक्षणात अ‍ॅण्टी इन्कमबन्सीचा फॅक्टर आढळल्याचे सांगितले जाते. तीन वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या चव्हाण यांना जनमत अनुकूल नव्हते, असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय जनता पार्टीच्या संघटना विस्तारात खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची तटस्थता कारणीभूत ठरली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाची सत्ता यावी यासाठी पुढाकार घेऊन काम केले नसल्याचे एक कारण सांगितले जाते.
पक्षाची सत्ता असताना आदिवासी विभागातील कथित गैरव्यवहाराबाबत चर्चा करून पक्षाला अडचणीत आणण्याची घेतलेली भूमिकाही अडचणीत आणणारी ठरली.
काय होऊ शकते?
विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढणे सोपे असले तरी लोकसभा निवडणुकीत ते शक्य नाही. खुद्द हरिश्चंद्र चव्हाण यांना त्याची जाणीव असल्याने ते नाराज असले तरी बंडखोरी करण्याची शक्यता कमी आहे. परंतु निवडणुकीत ते तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता आहे. अनेक पक्ष निमंत्रित करीत असल्याचा त्यांचा दावा असला तरी निवडणूक लढविण्याची शक्यता नाही.
खासदार हरिश्चंद्र चव्हाण निवडणूक लढविणार नसले तरी निवडणूक आपल्याभोवती फिरवण्याचा प्रयत्न करतील. आपली भूमिका निर्णायक असल्याचे वातावरण निर्माण करतील. पक्षाने उमेदवारी दिली नसल्याचे सांगून सहानुभूती मिळवतील.

Web Title: Harishchandra Chavan's ticket was cut?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.