लष्कराचा माजी जवान बनला नाशिक जिल्ह्यातील एकमेव मशरूम उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:12 PM2018-11-21T12:12:11+5:302018-11-21T12:12:20+5:30

यशकथा : केवळ सात महिन्यांत केंद्र उभारणी आणि इतर खर्च वजा जाता त्यांनी चार लाख ७६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

ex Army jawan becomes the only mushroom producer in Nashik district | लष्कराचा माजी जवान बनला नाशिक जिल्ह्यातील एकमेव मशरूम उत्पादन

लष्कराचा माजी जवान बनला नाशिक जिल्ह्यातील एकमेव मशरूम उत्पादन

googlenewsNext

- आकाश  गायखे (चांदोरी, जि. नाशिक)

लष्कराची नोकरी सोडून बेभरवशाच्या शेती व्यवसायात उतरणे म्हणजे शुद्धवेडेपणाच. मात्र, नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील चांदोरी येथील सतीश खरात या लष्करी जवानाने घरच्यांचा विरोध डावलून हा धाडसी निर्णय घेतला. आज तो जिल्ह्यातील एकमेव मशरूम (आळंबी) उत्पादन केंद्राचा मालक आहे. केवळ सात महिन्यांत केंद्र उभारणी आणि इतर खर्च वजा जाता त्यांनी चार लाख ७६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे.

सतीश खरात भारतीय लष्कराच्या सेवेत असताना त्यांची बदली शिमला (हिमाचल प्रदेश) येथे होती. तेथे त्यांना मशरूम उत्पादनाची प्रेरणा मिळाली. नोकरी सोडून शेती करण्याचा विचार त्यांनी घरात बोलून दाखविला. मात्र, त्याला घरच्यांसह अनेकांनी विरोध केला. मात्र, निर्धार कायम असल्याने त्यांनी वैद्यकीय कारणास्तव लष्कराची नोकरी सोडून दिली आणि मशरूम उत्पादन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, जळगाव, शिमला या ठिकाणी मशरूम उत्पादन केंद्रांना भेटी देऊन त्यांनी त्याची सखोल माहिती घेतली. त्यासाठी लागणाऱ्या वातावरणाचा अभ्यास केला.

नाशिक जिल्ह्यातील तापमान मशरूमसाठी पाहिजे तेवढे अनुकूल नसल्याचे अभ्यासानंतर त्यांच्या लक्षात आले. मात्र, हार न मानता त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून विविध देशांत मशरूम उत्पादन तंत्रज्ञानाविषयीची माहिती घेतली. त्यानंतर  इस्रायल  तंत्रज्ञानाला भारतीय तंत्रज्ञानाची जोड देत मशरूमसाठी लागणारे अनुकूल वातावरण चांदोरीसारख्या गावात तयार केले. प्रथम स्वत:च्या राहत्या घरात अळंबी उत्पादनाचा त्यांनी  प्रयोग केला. या प्रयोगात त्यांना २०० ते २५० ग्रॅम मशरूमचे उत्पादन मिळाले. उत्पादन कमी झाले तरी प्रयोग सफल झाल्याचा आनंद मोठा होता. यातूनच त्यांनी मोठ्या  प्रमाणात अळंबी उत्पादन करण्याचा निर्णय घेतला.

आळंबी उत्पादन केंद्र उभे करण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता होती. चांदोरी गावातील गोदावरी सोसायटी आवारात असलेला एक मोठा हॉल त्यांनी भाडेतत्त्वावर घेतला. आणि आळंबी उत्पादन केंद्र सुरू केले. ७६०० हजार चौरस फुटांच्या हॉलमध्ये ओलिस्टर ब्लू, साजर काजू, फ्लोरिडा, पिंक या चार प्रकारच्या मशरूमचे उत्पादन घेतले जाते. केंद्र उभारणीसाठी त्यांना सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला.  मे ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत त्यांनी १३०० किलोहून अधिक ताज्या (ओल्या) व १७० किलोहून अधिक सुक्या अळंबीचे उत्पादन घेतले आहे.

मोठ मोठे मॉल्स, स्थानिक बाजारपेठ आणि अगदी घरपाहोच ते मशरूमची विक्री करतात. मशरूमला त्यांना  सरासरी २१० ते ४९० रुपये किलो याप्रमाणे भाव मिळत आहे. आतापर्यंतच्या उत्पादनातून केंद्र उभारणीचा आणि इतर खर्च वजा जाता त्यांना चार लाख ७६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पुढील काही दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मशरूम विक्र ी करण्याचा त्यांचा मानस आहे. 

Web Title: ex Army jawan becomes the only mushroom producer in Nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.