मानव म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला देवदर्शनाची संधी मिळाली पाहिजे - अनिता पगारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 06:08 PM2018-10-27T18:08:23+5:302018-10-27T18:24:33+5:30

अवैज्ञानिक कारण पुढे करत जर त्यांना प्रवेश नाकारला जात असेल तर ते योग्य नाही.

Everybody born as a human should have an opportunity to reflect - Anita Pagare | मानव म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला देवदर्शनाची संधी मिळाली पाहिजे - अनिता पगारे

मानव म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला देवदर्शनाची संधी मिळाली पाहिजे - अनिता पगारे

Next
ठळक मुद्देअवैज्ञानिक कारण पुढे करत जर त्यांना प्रवेश नाकारला जात असेल तर ते योग्य नाही. एकीकडे मानव चंद्रावर होणाºया वसाहतीत घर बुक करत आहे आणि दुसरीकडे अशा साध्या साध्या गोष्टींसाठी त्यांना लढावे लागत आहे.


शबरीमाला मंदिरात १० ते ५० वयोगटांतील सर्व महिलांना देवदर्शन करू द्यावे, मंदिरात जाऊ द्यावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असताना दुर्दैवाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास शबरीमाला देवस्थान आणि तेथील कट्टर देवभक्त विरोध करत आहेत ही दुर्दैवी गोष्ट असून, मानव म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला त्याच्या आवडत्या देवाचे दर्शन घेण्याची संधी मिळालीच पाहिजे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या अनिता पगारे यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला असता याविषयासह इतर अनेक पैलूंवर त्यांनी प्रकाश टाकतानाच देवळांबाबत मांडलेला बाजार थांबला पाहिजे व तो चिकित्सकपणे प्रत्येकाने थांबवावा, असे आवाहनही केले. त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
प्रश्न : शबरीमाला मंदिरात १० ते ५० वयोगटांतील महिलांना प्रवेश दिला जावा, असा आदेश सर्वोच्च न्यायायलाने दिला आहे. तो योग्य आहे असे वाटते का?
उत्तर : शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबत न्यायालयाने दिलेला निर्णय अत्यंत योग्य आहे. मानव म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला त्याच्या आवडत्या देवाचे दर्शन घेण्याची, त्याची उपासना करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे. उलट तो फार उशिरा घेतला गेला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देवदर्शनाच्या संधीसाठी एवढा कालावधी लागावा हेच चुकीचे आहे. देवदर्शनासाठी न्यायालयात अर्ज करावा लागतो हे किती दुर्दैव आहे. त्यामुळे आता आपल्या देशात राज्यघटनेची अंमलबजावणी व्हायला सुरुवात झाली आहे असे वाटते. हरकत नाही, पण ज्यांची इच्छा आहे अशा महिलांना तो अधिकार मिळालाच पाहिजे.
प्रश्न : धार्मिकतेच्या नावाखाली महिलांवर व्रतवैकल्ये लादली जातात. त्यातील जास्तीचे कष्ट महिलांच्या वाट्याला येतात. अशा परिस्थितीत महिलांनी देवदर्शनाचा अट्टाहास करावा का?
उत्तर : धार्मिक म्हणून नाही, पण माणूस म्हणून स्त्रियांनी अट्टाहास केला तर काय हरकत आहे. अवैज्ञानिक कारण पुढे करत जर त्यांना प्रवेश नाकारला जात असेल तर ते योग्य होणार नाही. पुजाऱ्याचा जन्मच ज्या मासिक पाळीतून झाला, ती नैसर्गिक गोष्ट मान्य केली जात नसेल तर महिलांनी अट्टाहास केलाच पाहिजे. एकीकडे मानव चंद्रावर होणाºया वसाहतीत घर बुक करत आहे आणि दुसरीकडे अशा साध्या साध्या गोष्टींसाठी त्यांना लढावे लागत असेल तर ते चुकीचे आहे. शेकडो महिलांना मंदिरात जाण्यात रसच नाही. त्यामुळे ज्या महिलांना जाण्याची इच्छा आहे, त्यांची इच्छा पूर्ण झालीच पाहिजे.
प्रश्न : देवाच्या नावाखाली आपल्याकडे बाजार मांडलेला दिसतो. उद्या इतरही मंदिरांबाबत असाच लढा द्यावा लागेल. या साºयातून सामान्य माणसाने काय भूमिका घ्यावी?
उत्तर : देवही आता आपल्याकडे मोठी इंडस्ट्री बनली आहे. ती फार हुशारीने चालवली जात आहे. उदाहरणार्थ तुम्ही त्र्यंबकेश्वरी जाऊन पूजा केली की तिथला पुजारी तुम्हाला सांगतो की, तुम्ही यानंतर काशीला जाऊन दुसरी पूजा केली तर तुम्हाला पूर्ण पुण्य मिळेल. काशीला गेल्यानंतर आणि तिथली पूजा झाल्यानंतर तिथला पुजारी तुम्हाला अलाहाबादला जाऊन पूजा केली तर पुण्य मिळेल असे सांगतो. ही मोठी साखळी असून ते एकमेकांच्या दुकानाची जणू जाहिरातच करत असतात. चेन मार्केटिंगसारखा प्रकार होतो आहे. त्याला चॅलेंज होत नाही हे दुर्दैव आहे. दहा वर्षांपूर्वी एका व्यक्तीने भारतातील सर्व देवस्थानांमधील तिजोºयांमधील पैसा हा सरकारी तिजोरीत जमा करावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच्या याचिकेत तथ्य आढळून आल्याने न्यायालयाने त्याच्या बाजूने निर्णय दिला व ७० टक्के निधी (देणग्या) सरकारला द्यावा व ३० टक्के निधी देवस्थानांनी स्वत:कडे ठेवावा, असा आदेश दिला होता. त्यावेळी सर्व देवस्थानांचे लोक एकत्र आले व त्यांनी आपण दवाखाने, अनाथाश्रम असे लोकोपयोगी काम करत असल्याने आम्हाला ७० टक्के रक्कम मिळावी व ३० टक्के रक्कम आम्ही शासनाला देऊ असे शासन दरबारी सांगितले. न्यायालयाने त्यांना यावर अनेक प्रश्न विचारले. यानंतर पुन्हा याचिका दाखल झाली. तिचा निकाल अद्याप आलेला नाही. यावरून लक्षात येईल की ही किती मोठी इंडस्ट्री आहे. कुणाकुणाचे आणि किती हितसंबंध त्यात गुंतलेले आहेत. सामान्य माणसाने हे सारे जाणून घेऊन आपली भूमिका ठरवली पाहिजे. आपण देवाच्या चरणी वाहत असलेल्या पैशाचे काय होते याचा विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्ही धाडसाने या गोष्टींना विरोध कराल तेव्हाच हे सारे थांबू शकेल.
प्रश्न : काळानुरूप विचारसरणी बदलली पाहिजे. पण आपल्या देशात असे बदल व्हायला फार वेळ लागतो. याबाबत काय वाटते?
उत्तर : आपल्याकडे विषमता खूप आहे. ती विषमता दूर व्हायला वेळ लागणार आहे. आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणावे असा प्रश्न पडावा असे प्रकार हल्ली अनुभवायला येत आहे. जिथे जिथे चांगले बदल होऊ घातले आहे, तिथे तिथे लोक त्याचा भलताच अर्थ काढून, त्यावर चुकीच्या टिप्पणी करून त्या विषयाचा कचराच केला जातो. त्यामागच्या गांभीर्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. मुलांना चूक बरोबर स्वत: ठरवता येईल असे शिक्षण दिले पाहिजे. त्यांना लहानपणापासून ‘हे चुकीचे आहे, हे बरोबर आहे’ असे ठसवून सांगितले जाते. ते चुकीचे आहे. त्यातून मग तशीच विचारसरणी बनत जाते. ज्याला समज आहे, चांगल्या वाईटाचे परीक्षण करण्याची कुवत आहे अशा लोकांनाच आता सुशिक्षित म्हटले पाहिजे. केवळ शिक्षण झाले आहे, जवळ डिग्री आहे म्हणून तो सुशिक्षित म्हणावा का? असा प्रश्न पडतो आहे. त्यापेक्षा शाळेची पायरीही न चढलेल्या, पण आपल्या साहित्यातून, कृतीतून जीवनाचे प्रभावी तत्त्वज्ञान सांगणाºया व्यक्ती लाख पटीने चांगल्या वाटतात. ‘मी-टू’ चळवळीबद्दल होत असलेले जोक, फटाके-शबरीमाला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याविरुद्ध होत असलेले जोक, कमेंटस पाहून यांना सुशिक्षित म्हणावे का? असा प्रश्न पडतो आहे. म्हणूनच आपल्या देशातील लोकांना या साºयातून बाहेर यायला फार वेळ लागेल असे दिसते.

Web Title: Everybody born as a human should have an opportunity to reflect - Anita Pagare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.