आगीत डाळिंबबाग खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:46 AM2018-03-01T00:46:50+5:302018-03-01T00:46:50+5:30

तालुक्यातील चौगाव येथे शेतातून गेलेल्या विद्युतवाहिन्यांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने सोमवारी (दि. २६) सायंकाळी आग लागून सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंबबाग भस्मसात झाली. यात आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 Dingambagh khak in the fire | आगीत डाळिंबबाग खाक

आगीत डाळिंबबाग खाक

Next

सटाणा : तालुक्यातील चौगाव येथे शेतातून गेलेल्या विद्युतवाहिन्यांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीने सोमवारी (दि. २६) सायंकाळी आग लागून सुमारे तीन एकर क्षेत्रावरील डाळिंबबाग भस्मसात झाली. यात आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  मंगळवारी महसूल विभागाने पंचनामा केला. डाळिंबबागेतील सर्व १२०० झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने शेवाळे कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते झाले आहे. शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांनी केली आहे. यावेळी शेतात काम करत असलेले भास्कर शेवाळे यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, यात त्यांचा हात व पायाला गंभीर जखमा झाल्या. त्यांनी आरडाओरडा करून परिसरातील इतर शेतकºयांना बोलविण्याचा आटापिटा केला; मात्र सोसाट्याचा वारा व आगीच्या रौद्ररूपामुळे तीन एकर क्षेत्रावरील संपूर्ण बाग भस्मसात झाली. या आगीत शेवाळे यांच्या १२०० डाळिंबाच्या झाडांसह ठिंबक सिंचन, जलवाहिनी, पाणी शुद्धीकरण यंत्र, फवारणी यंत्र, विहिरीवरील विद्युतपेटी, वायर आदी सर्व साहित्य जळून खाक झाले.  दरम्यान, तलाठी वाय. जी. पठाण, कृषी सहायक एस. के. पाटील, ग्रामसेवक आर. एच. शेख यांनी भेट देऊन पंचनामा केला. महसूल, वीज महावितरण व कृषी विभागाने या बाबीची दखल घ्यावी आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नंदकिशोर शेवाळे, दादाजी शेवाळे, दीपक शेवाळे, भाऊसाहेब शेवाळे, बबन गांगुर्डे, दगा गांगुर्डे, रोशन शेवाळे, सुनील जगताप आदींनी केली आहे.
होत्याचे नव्हते झाले...!
चौगाव परिसरात लताबाई शेवाळे व त्यांचे दीर भास्कर शेवाळे यांनी भीमदरा शिवारातील बंद्या डोंगरालगत खडकाळ जमिनीचे दीड वर्षापूर्वी सपाटीकरण करून डाळिंबबाग फुलवली होती. बहार धरण्याची वेळ आली असताना कष्टांना फळ मिळेल या अपेक्षेत शेवाळे कुटुंबीय होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युतवाहिनींमध्ये अचानक घर्षण झाल्याने डाळिंबबागेवर ठिणग्या पडल्या. त्यामुळे संपूर्ण बागेने क्षणात पेट घेतला. १२०० डाळिंबाच्या झाडांसह ठिंबक सिंचन, जलवाहिनी, पाणी शुद्धीकरण यंत्र (फिल्टर मशीन), फवारणी यंत्र, विहिरीवरील विद्युतपेटी, वायर आदी साहित्य जळून खाक झाले. होत्याचे नव्हते झाल्याने शेवाळे कुटूंबियांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
वर्षभरापूर्वी पती वसंत शेवाळे यांचे निधन झाल्यानंतर सोने गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घेतले होते. आपल्या दीड एकरावर डाळिंबबाग घ्यावी, कुटुंबाचे भविष्य घडवावे आणि कर्ज फेडायचे अशी इच्छा होती; मात्र आगीने होत्याचे नव्हते झाल्याने आता कर्ज फेडायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने मदत करावी अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही.  - लताबाई वसंत शेवाळे

Web Title:  Dingambagh khak in the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.