नाईक संस्थेसाठी ७९ टक्के मतदान; आज मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:01 AM2019-07-21T01:01:06+5:302019-07-21T01:02:25+5:30

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत २९ जागांसाठी शनिवारी (दि. २०) संस्थेच्या ८ हजार ६९४ सभासदांंपैकी ...

79 percent voting for Naik organization; Today counting | नाईक संस्थेसाठी ७९ टक्के मतदान; आज मतमोजणी

नाईक संस्थेसाठी ७९ टक्के मतदान; आज मतमोजणी

Next

नाशिक : क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत २९ जागांसाठी शनिवारी (दि. २०) संस्थेच्या ८ हजार ६९४ सभासदांंपैकी ६ हजार ८४६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला असून, संध्याकाळी मतदानप्रक्रिया संपेपर्यंत सरासरी ७९ टक्के मतदान झाले आहे. गत निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानात २ टक्क्यांनी घसरण झाली असून, त्याचा निकालावर निश्चित प्रभाव दिसण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. रविवारी मतमोजणी झाल्यानंतर संस्थेवर नवीन संचालक मंडळ कोणाच्या नेतृत्वात काम करणार ते स्पष्ट होऊ शकणार आहे.
नूतन संचालक मंडळ निवडून देण्यासाठी सभासदांनी शनिवारी
(दि. २०) संस्थेच्या मतदान केंद्रावर रांगा लावून मतदान केले. केंद्रावर दोन्ही पॅनलच्या उमेदवार प्रतिनिधींनी मतदारांच्या ओळखपत्रांविषयी घेतलेल्या आक्षेपांवरून बाचाबाची व शाब्दिक वादासोबतच हमरीतुमरीचे प्रकारही घडले.
मात्र पोलीस व निवडणूक नियंत्रण मंडळाने वेळीच हस्तक्षेप करून संपूर्ण मतदानप्रक्रिया शांततेत पार पाडली. या निवडणुकीत सत्ताधारी कोंडाजी आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील प्रगती व तुकाराम दिघोळे व पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वातील क्रांतिवीर पॅनलमध्ये सरळ लढत असून, मतदानप्रक्रिया झाल्यानंतर दोन्ही पॅनलने विजयाचा दावा केला आहे. मात्र सत्ताधारी विरोधकांमध्ये संस्थेच्या जागा विक्री, सभासद नोंदणी, मयत सभासदाच्या वारसांना सभासदत्व, विकासकामांचे श्रेयवाद आदी मुद्द्यांवरून प्रचंड आरोप प्रत्यारोप करताना मोठ्या प्रमाणात चिखलफेक झाल्यामुळे दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दरम्यान, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गजेंद्र सानप यांनी मतदान सुरू होण्यापूर्वी सरस्वती पूजन केले. तसेच दोन्ही पॅनलच्या अध्यक्षपदाचे उमेदवार आव्हाड व थोरे यांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन मतदानास सुरुवात झाली. संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहचिटणीस, ६ विश्वस्त, २ महिला प्रतिनिधी, तर १७ तालुका प्रतिनिधी अशा एकूण २९ जागांसाठी सकाळी ७ ते ५ वाजे दरम्यान मतदान झाले.
इन्फो-
बाचाबाची, हमरीतुमरीचे प्रकार
ओळखपत्र आणि मतदार यादीत नावातील भिन्नतेमुळे अनेक केंद्रांवर सभासदांना मतदानापासून रोखण्यात आले. यावेळी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी आरडा-ओरड करीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. काही मतदान केंद्र्रावर उमेदवारांच्या हस्तक्षेपावर दोन्हा बाजूने आक्षेप घेतल्याने बाचाबाची आणि हमरीतुमरीसारखे प्रकार घडले. नांदगाव तालुक्यासाठी असलेल्या बुथवर लाइट गेल्याने काहीवेळ अंधारात मतदान करावे लागले. सिन्नर तालुक्याच्या एका बुथवर उमेदवार मनोज बुरकूल व शशीकांत आव्हाड यांच्यात बाचाबाची झाली. असे किरकोळ अपवाद वगळता दिवसभरात मतदानप्रक्रिया शांततेत पार पडली.
इन्फो-
पावसाचा व्यत्यय
सक ाळच्या सत्रात ११ वाजेपर्यंत सुमारे ३० टक्के मतदान झाल्यानंतर दुपारी पावसाच्या व्यत्ययामुळे मतदानाला संथ प्रतिसाद मिळाला. परंतु, दुपारनंतर पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्याने ग्रामीण भागातील सभासदांनी मतदान केंद्रावर गर्दी करून मतदानाचा हक्क बजाविला. त्यामुळे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३९ बुथवर ७९ टक्के मतदान झाले. मात्र शहरातील अनेक सभासदांनी निवडणुकीकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.
इन्फो-
अशी होणार मतमोजणी
नाईक संस्थेची निवडणूक प्रक्रिया शनिवारी पूर्ण झाल्यानंतर मतमोजणीची प्र्रक्रिया रविवारी (दि.२१) चोपडा लॉन्स येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण ८० टेबल राहणार असून, प्रत्येक टेबलवर दोन कर्मचारी व दोन प्रतिनिधी असे एकूण १६० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. प्रथमत: ३९ मतपेट्यांमधील मतपत्रिकांचे २५च्या पटीत विभागणी केली जाईल. यानंतर प्रत्येक उमेदवारास मिळालेल्या मतांची नोंदणी झाल्यानंतर अकराव्या फेरीअखेर उमेदवाराला प्राप्त मतांची बेरीज केली जाईल. याप्रमाणे एकूण ३९ बुथवरील मतपेट्यांमध्ये बंदिस्त मतांची बेरीज केल्यानंतर सर्वाधिक मतदान असलेल्या उमेदवारास विजयी घोषित केले जाईल. रात्री ९ वाजेपर्यंच निकाल हाती येण्याची शक्यता निवडणूक मंडळाकडून व्यक्त करण्यात आली आहे.



इन्फो-
तालुकानिहाय झालेले मतदान
तालुका मतदार झालेले मतदान टक्केवारी
नाशिक २५३८ १८३१ ७२.१४
दिंडोरी ५८७ ५३१ ९०.४५
मालेगाव १७१ १०२ ६०
येवला ५९९ ४९५ ८३
नांदगाव ९०८ ७१८ ७९.०७
निफाड २०४० १६७२ ८१.८०
सिन्नर १८४५ १४९७ ८१.१३



(फोटो- २०पीएचजेएल १२९) नाईक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी आलेल्या मतदारांना आपल्याच पॅनल कौल देण्यासाठी हात जोडून विनंती करताना सत्ताधारी प्रगती पॅनलचे नेते कोंडाजी आव्हाड व क्रांतिवीर पॅनलचे पंढरीनाथ थोरे यांच्यासह अ‍ॅड. पी. आर. गिते, मनोज बुरकुल आदी.

(फोटो- २०पीएचजेएल १३०) नाईक श्क्षिण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी संस्थेच्या सभासदांनी केलेली गर्दी.

Web Title: 79 percent voting for Naik organization; Today counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.