चोरट्यांनी लांबविले २८ ग्रॅमचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:58 PM2019-07-17T23:58:19+5:302019-07-17T23:58:43+5:30

म्हसरूळ शिवारातील कलानगर येथे सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ४० हजार रु पये किमतीची सोनसाखळी ओरबाडून चोरट्यांनी धूम ठोकल्याची घटना रविवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास घडली.

28 gm ornaments stretched in Sonasakhal crust | चोरट्यांनी लांबविले २८ ग्रॅमचे दागिने

चोरट्यांनी लांबविले २८ ग्रॅमचे दागिने

Next

नाशिक : म्हसरूळ शिवारातील कलानगर येथे सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ४० हजार रु पये किमतीची सोनसाखळी ओरबाडून चोरट्यांनी धूम ठोकल्याची घटना रविवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात उज्ज्वला संतोष कोळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कलानगरच्या मधुबन बंगल्याच्या परिसरातील रहिवासी उज्ज्वला या रविवारी सायंकाळी त्यांच्या मैत्रीण राधा अग्रहरी यांच्यासमवेत म्हसरूळ येथील कलानगर ते रामेश्वरनगर दरम्यान फेरफटका मारत असताना वाघाडी पुलाजवळ अजिंक्यतारा सोसायटी रस्त्यासमोर काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने कोळी यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात भरदिवसा सोनसाखळी चोरीची घटना घडली होती. सदर घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा परिसरात सोनसाखळी ओरबाडून नेल्याची घटना घडल्याने म्हसरूळ पोलिसांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
दुसऱ्या एका घटनेत इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत सोनसाखळी चोरीची मालिका सुरूच असून, पोलिसांना सोनसाखळी चोरांना अटकाव करण्यात अपयश येत आहे. पाथर्डी फाटा येथील माउलीनगर येथे एका पादचारी महिलेच्या गळ्यातून सुमारे ४८ हजार रुपये किमतीची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी बळजबरीने ओढून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अर्चना कैलास धोंडगे (४२, रा. लक्ष्मीनारायण हाईट्स समर्थनगर) या त्यांची मैत्रीण निकिता पंत यांच्याबरोबर मंगळवारी (दि.१६) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास माउलीनगर येथून पायी घरी जात होत्या. यावेळी दोघा दुचाकीस्वारांनी काळ्या रंगाच्या दुचाकीवरून भरधाव वेगात येऊन धोंडगे यांच्या गळ्यात असलेली १६ ग्रॅमची सोनसाखळी दुचाकीचालकाच्या पाठीमागे बसलेल्या युवकाने ओढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी धोंडगे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात संशयितांविरुद्ध सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक मोरे करीत आहेत.
कार्यालय फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास
सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. पाटील लेन-२मधील कॉलेजरोड परिसरात असलेल्या हेरंब महादेव गोविलकर यांच्या बंद कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी लॅपटॉप, रोकड असा एकूण ७० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. समर्थनगर कॉलेजरोड परिसरात गोविलकर यांचे कार्यालय आहे. बंद कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कार्यालयामध्ये असलेले ५० हजार रुपये किमतीचे चार लॅपटॉपसह वीस हजारांची रोकड असा एकूण ७० हजारांचा ऐवज लुटून नेला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 28 gm ornaments stretched in Sonasakhal crust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.