तब्बल ३७ वर्षांनी नंदुरबारात मार्चमध्येच तापमान चाळीशी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 09:29 PM2019-03-25T21:29:56+5:302019-03-25T21:30:19+5:30

उष्णतेची लाट : १९८२ मध्ये नोंदवले होते ४१.४ अंश तापमान

 After 37 years, the temperature crosses 40 in Nandurbar in March | तब्बल ३७ वर्षांनी नंदुरबारात मार्चमध्येच तापमान चाळीशी पार

तब्बल ३७ वर्षांनी नंदुरबारात मार्चमध्येच तापमान चाळीशी पार

Next

नंदुरबार : मार्च महिन्यातच कमाल तापमानाची चाळीशी पार करीत जिल्ह्यात तापमानाने तब्बल सदोतीस वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे़ नंदुरबारात सोमवारी तब्बल ४०.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले़ या आधी २७ मार्च १९८२ साली ४१.४ इतके कमाल तापमान नोंदविले होते़ त्याच प्रमाणे ३१ मार्च १९५८ रोजीही तापमान ४३ अंशापर्यंत पोहचले होते़
सध्या उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात हवेचा दाब प्रचंड प्रमाणात कमी झाला आहे़ त्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट बघायला मिळत आहे़
नंदुरबारात सोमवारी १ हजार ४ हेक्टापास्कल इतका हवेचा दाब होता़ तर साधारणत: ताशी १० किमी वेगाने वारे वाहत होते़ आद्रता साधारणत: ३६ टक्के इतकी नोंदविण्यात आली होती़ त्यामुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणात उकाडा सहन करावा लागला होता़ नंदुरबारात सदोतीस वर्षांनी प्रथमच मार्चमध्ये तापमानाने चाळीशी पार केली आहे़ त्यामुळे नागरिकांना उष्णतेची दाहकता सहन करावी लागत होती़
तीन दिवसात तापमानात वाढ
नंदुरबारसह संपूर्ण खान्देशात २६ ते २८ मार्च दरम्यान मोठ्या प्रमाणात तापमान वाढ होणार असल्याचा अंदाज पुणे येथील हवामानतज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे़ तर ‘आयएमडी’नुसार येत्या आठवडाभरात तापमान उष्ण व कोरडे राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे़
सूर्याच्या उत्तरायणास सुरुवात
डॉ़ रामचंद्र साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, सूर्याची वाटचाल आता दिवसेंदिवस उत्तरेकडे सुरु राहिल़ सूर्याचे उत्तरायणास सुरुवात झाली असल्याने रोज तापमानामध्ये किंचित वाढ होताना दिसून येणार आहे़ सध्या वाऱ्यांची दिशा दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे़ त्यामुळे परिणामी उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्र व विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये कमालीची तापमान वाढ होऊन उष्णता जाणवनार आहे़ त्याच प्रमाणे उत्तर महाराष्ट्रात जरी तापमान वाढ होणार असली तरी महाराष्ट्रातील दक्षिण भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे़
सध्या बंगालच्या उपसागरात बाष्पीभवन वेगाने होत आहे़ सोबतच दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे वाहत असल्याने दक्षिण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे़ तसेच विदर्भातदेखील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ नंदुरबारसह जळगाव व धुळ्यातही सोमवारी तापमान चाळीशीच्या जवळपास होते़ जळगावात कमाल ४०.५ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले़ तर ताशी २० किमीपर्यंत वेगाने वारे वाहत होते़ धुळ्यात ३९.९ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले़ जळगाव व धुळ्यात अनुक्रमे २२ व ३४ टक्के इतकी आद्रतेची नोंद करण्यात आली होती़ राज्यात अमरावती, सांगली, सोलापूर, बीड, परभणी आदी जिल्ह्यांमधील तापमानदेखील सोमवारी चाळीशीवर गेले होते़ दोन दिवसात उष्ण लहरींचा प्रभाव वाढणार असल्याचा अंदाज आहे़

Web Title:  After 37 years, the temperature crosses 40 in Nandurbar in March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.