नांदेड शहरात सात कॉफी शॉपवर पोलिसांच्या धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 01:18 AM2018-11-04T01:18:52+5:302018-11-04T01:19:06+5:30

प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधीक्षक डॉ़अश्विनी शेंडगे यांनी ही कारवाई केली़ या कारवाईमुळे कॉफी शॉप चालकांमध्ये खळबळ उडाली आहे़

Police raid on seven coffee shops in Nanded city | नांदेड शहरात सात कॉफी शॉपवर पोलिसांच्या धाडी

नांदेड शहरात सात कॉफी शॉपवर पोलिसांच्या धाडी

Next

नांदेड : शहरात कॉफी शॉपच्या नावाखाली महाविद्यालयीन तरुण-तरुणींना अश्लीलतेसाठी वाव देणाऱ्या सात कॉफी शॉपवर पोलिसांनी धाडी मारल्या़ यावेळी अनेक जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले़ प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधीक्षक डॉ़अश्विनी शेंडगे यांनी ही कारवाई केली़ या कारवाईमुळे कॉफी शॉप चालकांमध्ये खळबळ उडाली आहे़
शहरात महाविद्यालय परिसर तसेच शहरानजीक असलेल्या ग्रामपंचायत भागात अनेक कॉफी शॉप उघडण्यात आले होते़ या कॉफी शॉपमध्ये खुलेआम महाविद्यालयीन तरुण-तरुणी अश्लील चाळे करीत असल्याचे उघडकीस आले होते़ त्यानंतर पावडेवाडी भागातील पंधरा कॉफी शॉपचे परवाने निलंबित करण्यात आले होते़
त्यानंतर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कौठा तर विमानतळ पोलिसांनीही दोन कॉफी शॉपवर कारवाई केली होती़ यावेळीही अनेक जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले होते़ त्यानंतर कॉफी शॉपमध्ये सुरु असलेला हा गंभीर प्रकार चव्हाट्यावर आला होता़
दरम्यान, पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कॉफी शॉपवर कारवाईचे आदेश दिले होते़ त्यानंतर प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधीक्षक डॉ़अश्विनी शेंडगे यांनी विशेष पथकासह भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात कॅफे शॉपीवर धाडी मारल्या़त्यात कँडी क्रश, ड्रीम लँड, स्वीट लँड, रोमांसा, स्वीट ट्रीट, कृश, फ्रेंडस् कॉर्नर तसेच नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील लव्ह बर्डस या कॉफी शॉपवर धाडी मारल्या़या कॅफेमध्ये अंतर्गत स्वतंत्र छोटे कप्पे तयार करुन मंद प्रकाशात फक्त जोडप्यांना प्रवेश दिले जात होते़
या ठिकाणी असभ्य वर्तन सुरु असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले़ महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार या कॉफी शॉपच्या चालकाविरोधात कारवाई करण्यात आली़ या कॉफी शॉपचे परवाने निलंबित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही डॉ़शेंडगे यांनी सांगितले़ दरम्यान, शहरात अद्यापही अनेक भागात कॉफी शॉपमध्ये अश्लील प्रकार सुरुच असून पोलिसांना कारवाईत सातत्य ठेवण्याची गरज आहे़

Web Title: Police raid on seven coffee shops in Nanded city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.