ठळक मुद्देएक दिवसीय डाळप्रक्रिया चर्चासत्रात उद्योग विकास आयुक्त कांबळे यांची माहितीयेत्या तीन वर्षांत पाच हजार महिला उद्योजक राज्यात तयार व्हाव्यात असा राज्य शासनाचा मानस आहे

नांदेड: महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, अधिकाधिक महिला उद्योजक तयार व्हाव्यात म्हणून राज्य शासन लवकरच महिलांसाठी नवीन उद्योग धोरण आणत आहे. येत्या तीन वर्षांत पाच हजार महिला उद्योजक राज्यात तयार व्हाव्यात असा राज्य शासनाचा मानस आहे, अशी माहिती उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.

नांदेडातील उद्योग भवनच्या भेटीवेळी ते बोलत होते़ यावेळी माजी समाजकल्याण आयुक्त आर. के. गायकवाड, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रभारी संचालक यशवंत भंडारे, उद्योग विकास विभागाचे अधीक्षकीय उद्योग अधिकारी यू. एस. पुरी, व्यवस्थापक बी. डी. जगताप, महाव्यवस्थापक जी. बी. लाडे यांची यावेळी उपस्थिती होती़ यावेळी त्यांनी जिल्ह्यातील उद्योग विकास आणि सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. तसेच शासनाच्या सूक्ष्म व लघु उद्योगाच्या क्लस्टरकरिता सामूहिक सुविधा केंद्र उभारणे या महत्त्वाकांक्षी योजनेतंर्गत नांदेडमध्ये प्रिंटिंग क्लस्टर, ज्वेलरी  क्लस्टर, स्टिल फर्निचर क्लस्टर व माहूर येथे बंजारा आर्ट क्लस्टरला शासनाने मंजुरी दिलेली आहे.

यापैकी प्रिंटिंग क्लस्टर कार्यान्वित झाले असून त्यातील सामूहिक सुविधा केंद्रामध्ये प्रिंटिंगच्या अद्ययावत मशिनरी पावणेपाच कोटींचे अनुदान देवून उभारणी केली आहे. तसेच डॉ. हर्षदीप कांबळे यांनी शिवाजीनगर येथील उद्योग भवनमध्ये भेट देवून सर्व क्लस्टरच्या सदस्यांसोबत चर्चा करुन शासनाच्या योजनेचा जास्तीत-जास्त उद्योजकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन केले. उद्योग भवनमध्ये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र्र याच्यामार्फत आयोजित एक दिवसीय डाळप्रक्रिया चर्चासत्रास भेट देवून उपस्थित जवळपास ५० लाभार्थ्यांशी संवाद साधला. 

ग्रामीण भागातील उद्योजकांनी अशा प्रकारचे प्रशिक्षण घेवून, स्वयंस्फूर्तीने छोटे-मोटे उद्योग सुरु करावेत, असेही आवाहन केले. उद्योजकांना शासन सामूहिक प्रोत्साहन योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम इ. योजनांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करीत असल्याचे सांगितले. तसेच नांदेड जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाकरिता त्यांनी दाखविलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल उद्योजकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.