नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 04:04 PM2019-06-07T16:04:24+5:302019-06-07T16:06:54+5:30

पराभवाची नैतिक जबाबदारी घेत राजीनामा

Nanded district congress committee give resigns to Ashok Chavan | नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामे

नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामे

नांदेड : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, महानगराध्यक्ष आ़ अमरनाथ राजूरकर यांच्यासह १९ तालुकाध्यक्षांनी आपले राजीनामे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे मुंबईत सादर केले़ यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांचीही उपस्थिती होती़ 

नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो़ मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचा नांदेडमध्ये पराभव झाला़ या अनुषंगाने मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील काँग्रेसच्या वर्तुळात निवडणूक निकालाचे विश्लेषण केले जात होते़ काँग्रेसचा वरचष्मा असलेल्या भागातही पक्षाला कमी मते मिळाली आहेत़ या अनुषंगानेच या पराभवाची नैतिक जबाबदारी म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, आ़अमरनाथ राजूरकर यांच्यासह जिल्ह्यातील १६ तालुकाध्यक्ष आणि देगलूर, सिडको आणि तरोडा ब्लॉक अध्यक्ष अशा १९ जणांनी आज मुंबई येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले़ याबाबत पक्षाचे मराठवाडा माध्यम समन्वयक संतोष पांडागळे यांना विचारले असता प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत हे राजीनामे दिले असून आगामी विधानसभेच्या अनुषंगाने जिल्ह्यात पक्षाची पुनर्बांधणी व्हावी असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Nanded district congress committee give resigns to Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.