The liquor of Telangana sold in the border area of Nanded | तेलंगणाच्या दारूची नांदेडच्या सीमावर्ती भागात झिंग
तेलंगणाच्या दारूची नांदेडच्या सीमावर्ती भागात झिंग

कासराळी : (ता़ बिलोली. जि़ नांदेड) बिलोलीहून अवघ्या १२ कि.मी. अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यात मद्याचे दर हे महाराष्ट्रातील दरापेक्षा जवळपास ३५ टक्के कमी असल्याने मद्यपींनी तेलंगणाचा रस्ता धरला आहे़
बिलोली हा महाराष्ट्र - तेलंगणाच्या सीमेवर असलेला तालुका आहे. मांजरा नदी दोन्ही राज्यांना दुभंगते. सीमेचे तसे अंतरही फारसे नाही. बिलोलीहूुन अवघ्या १२ कि़मी़ अंतरावर तेलंगणा राज्यसीमा आहे. येथे बीअरबार किंवा मद्याच्या दुकानात बीअर १०० ते ११० रुपयास मिळते़ तीच बिअर बिलोली व परिसरातील बार व मद्याच्या दुकानात १८० ते २०० रुपयांना मिळते. तेलंगणातील सर्वच मद्यांच्या दरात बिलोलीच्या तुलनेत मोठे अंतर आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात तेलंगणाच्या दारूचीच झिंग दिसते आहे. तेलंगणात मद्यावर एक देश एक करप्रणालीच्या हेतूने १ जुलै २०१७ वस्तू व सेवा कर (जीएसटी)लागू झाल्यानंतरही मद्यावर तेवढेच कर आकारले जातात. अन्य कोणतेही कर तेलंगणात आकारले जात नाहीत. त्यामुळे मद्यपींच्या पैशाची जवळपास ३५ -४० टक्के रक्कमेची बचत होऊ लागली़ त्यामुळे सीमावर्ती भागातील मद्यपी मोठ्या संख्येने तिकडे जात आहेत.
कर कमी म्हणून दर कमी 
महाराष्ट्रापेक्षा तेलंगणामध्ये मद्याचे दर ३५ टक्क्यांनी कमी आहेत. अत्यंत कमी दरात मद्याचे वेगवेगळे ब्रँड तेलंगणात मिळतात. तेथील राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे वर्षातून एकदा किंवा दोनदा संबंधित गावच्या दुकानाचे लिलाव केले जातात. प्रत्येक वेळी वेगळा गृहस्थ लिलावाद्वारे मद्य परवाना मिळवतो. तेलंगणा सरकारने मद्यावर कर लावलेले नाहीत. महाराष्ट्रात मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे कायमस्वरूपी मद्यविक्रीची परवानगी दिली जाते. दर कमी असल्यानेच बिलोलीसह इतर सीमावर्ती भागात मद्यपींचे लोंढे तेलंगणात जाण्याचे प्रमाण वाढले आहे.


Web Title: The liquor of Telangana sold in the border area of Nanded
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.