गारपिटीचा २३ हजार हेक्टरला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:47 PM2018-02-13T23:47:52+5:302018-02-13T23:51:12+5:30

सोमवारी सायंकाळी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नांदेड तालुक्यातील लिंबगाव परिसरामधील शेकडो हेक्टरवरील पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले़ हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी मात्र हताश झाला आहे़

Hail hit 23 thousand hectares | गारपिटीचा २३ हजार हेक्टरला फटका

गारपिटीचा २३ हजार हेक्टरला फटका

googlenewsNext
ठळक मुद्देनऊ तालुक्यांत ३२७ गावे बाधित : लिंबगाव शिवारात बागांमध्ये पडला फळांचा सडा

श्रीनिवास भोसले।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : सोमवारी सायंकाळी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नांदेड तालुक्यातील लिंबगाव परिसरामधील शेकडो हेक्टरवरील पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले़ हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी मात्र हताश झाला आहे़
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत सोमवारी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली़ गारपिटीचा सर्वाधिक फटका लिंबगाव परिसरातील फळबागांना बसला आहे़ नांदेड तालुक्यातील लिंबगाव, तळणी, सायाळ, पोखर्णी, धानोरा, निळा, वडवना, खडकूत आदी गावांतील पिकांसह फळबागा सोमवारच्या गारपिटीने बाधित झाल्या़ सोमवारी रात्रीच्या वेळी गारपीट झाल्याने शेतक-यांना नुकसानीचा अंदाज आला नव्हता़ परंतु, मंगळवारी पहाटे शेतात गेल्यानंतर फळांचा सडाच पडलेला दिसून आला़ परिसरात ३०० हेक्टरवर मोसंबी, २५० हेक्टरवर संत्री, जवळपास १५० हेक्टरवर चिकू आणि डाळींब यासह पपई, अ‍ॅपल बोर, आंबा, टरबूज आदी बागा असल्याचे प्रा़ डॉ़ प्रकाश पोफळे यांनी सांगितले़
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये सोमवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल २२ हजार ८६४ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत़ त्यामध्ये फळबागांनाही मोठा फटका बसला आहे़ मंगळवारी सकाळपासून जिल्हा प्रशासनाकडून या नऊ तालुक्यांमध्ये पंचनामे सुरु करण्यात आले होते, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी दिली़ नांदेड जिल्ह्यातील नांदेड, हदगाव, किनवट, माहूर, नायगाव, बिलोली, माहूर, कंधार, धर्माबाद या नऊ तालुक्यांमध्ये सोमवारी सायंकाळी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली़ या गारपिटीचा नऊ तालुक्यांतील ३२७ गावांना फटका बसला़ त्यामध्ये वीज पडून एक जण जखमी झाला असून लहान व मोठे १७ जनावरे मृत्युमुखी पडले आहेत़ तर जिरायत १९ हजार ३० हेक्टर, बागायत ३ हजार ४८७ हेक्टर, फळपिके ३४७ हेक्टर असे एकूण २२ हजार ८६४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे़ यामध्ये ३३ टक्क्यांपेक्षा अधिक बाधित असलेले क्षेत्र २१ हजार २६६ हेक्टर असून त्यात फळपिके ३१० हेक्टर, जिरायत १७ हजार ६०१ हेक्टर व बागायत ३ हजार ३५५ हेक्टरला मोठा फटका बसला आहे़ जिल्ह्यात सोमवारी ९़८ मि़मी़पावसाची नोंद करण्यात आली होती़


लिंबगाव परिसरात शेकडो हेक्टरवर फळबागा आहेत़ जिल्ह्यातील सर्वाधिक मोसंबी, संत्री, आंबा आणि चिकू उत्पादन करणारा परिसर म्हणून ओळख आहे़ परंतु, सोमवारच्या गारपिटीने मोठा फटका बसला आहे़ गारपिटीने गहू, ज्वारी, कांदा, लसूण, हळद आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ काढणीला आलेल्या पिकांमध्ये गहू, हरभरा पिकांचा समावेश आहे़ धानोरा, लिंबगाव परिसरातील चिकू, मोसंबी, संत्र्याच्या बागांमध्ये सर्वत्र फळांचा आणि पानांचा सडा पडला होता़

तळणी शिवारात यंदा मोठ्या प्रमाणात टरबुजाची लागवड केली़ वैजनाथ सूर्यवंशी, मंगेश सूर्यवंशी आदी शेतकºयांच्या टरबूज शेतीचे मोठे नुकसान झाले़ टरबुजांची झालेली नासाडी, फळांना लागलेला मार पाहून गारांची तीव्रता लक्षात येते़ यामध्ये तरूण शेतकरी मंगेश सूर्यवंशी याने पहिल्यांदाच तीन एकर जमिनीपैकी दोन एकरमध्ये उत्पन्न चांगले मिळेल, या आशेने टरबुजाची लागवड केली होती़ आठवडाभरामध्ये सर्व टरबूज तोडणीलायक होवून अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न झाले असते़ परंतु, सोमवारी झालेल्या गारपिटीने त्यांच्या पदरी निराशा पडली़ दरम्यान, मंगळवारी दुपारी कंधार, लोहा तालुक्यांत काही ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली़

 रात्री ९ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह नांदेड शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला़ वादळी वाºयामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता़ शहरात अनेक ठिकाणी होर्डिंग्ज तुटून रस्त्यावर पडले होते़

धानोरा येथील शेतकरी किशोर केशवराव पोफळे यांच्याकडील जवळपास २० एकरमध्ये मोसंबी, चिकू, अ‍ॅपल बोर, संत्री आदी फळबागा आहेत़ सोमवारच्या गारपिटीने सहा एकरवर अक्षरश: मोसंबी आणि संत्र्याचा सडा पडला होता़़ यात तीन एकर संत्र्याची बाग दोन दिवसांपूर्वी व्यापा-याने चार लाख रूपयाला मागितली होती़ परंतु, उन्हाची तीव्रता वाढल्याने भाव अधिक यईल म्हणून सौदा केला नव्हता, असे शेतकरी किशोर पोफळे यांनी सांगितले़ अजीज भाई यांच्या पॉली हाऊसचे वादळी वा-याने लाखो रूपयांचे नुकसान झाले़

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा या भागातील प्रयोगशील शेतकरी प्रा़ डॉ़ प्रकाश पोफळे यांच्या फळबागांचेदेखील नुकसान झाले़ यात चिकूचे अधिक नुकसान झाले तर शेतातील अनेक झाडे उन्मळून पडली़ लिंबगाव येथील शेतकरी प्रतापराव कदम, उत्तमराव कदम, भास्करराव कदम, विश्वासराव कदम आदींच्या फळबागांना गारपिटीचा फटका बसला़ प्रतापराव कदम यांची चिकूची बाग या भागातील सर्वात मोठी बाग म्हणून ओळखली जाते़ पाडाला आलेल्या चिकूचा खच पडल्याचे पहायला मिळाले़

शासनाने हवामानावर आधारित आणि गारपिटीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दोन विमा केल्याने प्रतिहेक्टरी ३६०० रूपयांचा खर्च येतो़ त्यामुळे बहुतांश फळउत्पादक शेतकºयांनी विमा भरलेला नाही़ आजपर्यंत गारपिटीने एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीच नुकसान झाले नाही़ ही पहिलीच वेळ असून फळ तोडणीच्या वेळेत गारपीट झाल्याने अधिक फटका बसला आहे़ त्यातच नांदेड तालुक्यात संत्र्याला विमा कवच नसल्याने आता सरकार काय मदत करेल, अशी प्रतिक्रिया शेतकरी बालाजी पोफळे यांनी दिली़
नांदेड व लोहा तालुक्यांतील सोनखेड, शेलवाडी, पळशी, बामणी या परिसरात गारपीट झाली़ आ. हेमंत पाटील यांनी नुकसानीची पाहणी करून शेतक-यांशी संवाद साधला. तसेच पंचनामे तातडीने करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आ़ पाटील यांनी सोनखेड, शेलवाडी, पळशी, बामणी आदी गावांना भेटी देऊन पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, मारोतराव धुमाळ, नरसिंग मोरे, मधू बापू देवरे, सुनील रामदासी आदी उपस्थित होते.


हातचे पीक गेले
सोमवारी सायंकाळी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये थैमान घातले़ हाती आलेले गहू, ज्वारी, मका, हरभरा यासह संत्री, मोसंबी, टरबूज, चिकू यासारख्या फळबागांनाही मोठा फटका बसला़ मंगळवारी सायंकाळीही अनेक गावांमध्ये पाऊस आणि गारपीट झाली़ त्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला़

अशोक चव्हाणांकडून पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : तालुक्यातील लिंबगाव परिसरात गारपिटीने झालेल्या नुकसानीची माजी मुख्यमंत्री खा़अशोकराव चव्हाण, माजी मंत्री आ़ डी़ पी़ सावंत यांनी पाहणी करून शेतकºयांच्या व्यथा जाणून घेतल्या़ तसेच मंगळवारी पहाटे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनीदेखील लिंबगाव परिसरात नुकसानीचा आढावा घेतला़
मंगळवारी सकाळी साडेनऊ ते साडेबारा या तीन तासांच्या दौºयात सायाळ, धानोरा, तळणी, लिंबगाव, पोखर्णी इ. १४ ठिकाणी जाऊन आ़ सावंत यांनी पाहणी केली़ गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकºयांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, वेळप्रसंगी विधानसभेत या प्रश्नी आवाज उठविला जाईल, असे आश्वासन आ़ डी़ पी़ सावंत यांनी दिले़ नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी सांगितले़
पाहणीदरम्यान उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ़ तुकाराम मोटे, तहसीलदार किरण अंबेकर, जि़प़सदस्य साहेबराव धनगे, सभापती सुखदेव जाधव, नायब तहसीलदार काकडे, बीडीओ घोलप, मंडळ अधिकारी देशपांडे, नीलेश पावडे, राजेश पावडे, पं़ स़ सदस्य प्रतिनिधी बालाजी सूर्यवंशी, विठ्ठल पावडे, अतुल वाघ, गोपाळराव कदम, पि-हाजी धुमाळ, प्रा़ अवधूत शिंदे आदी उपस्थित होते़

Web Title: Hail hit 23 thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.