Drought In Marathwada : खरीप पिके गेली, रबीची शाश्वती संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 06:00 PM2018-12-11T18:00:00+5:302018-12-11T18:00:02+5:30

दुष्काळवाडा : यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे देगलूर तालुक्यात खरीप पिके अखेरपर्यंत सावरु शकली नाहीत.

Drought in Marathwada: Kharif crops have gone, Rabi's season also over | Drought In Marathwada : खरीप पिके गेली, रबीची शाश्वती संपली

Drought In Marathwada : खरीप पिके गेली, रबीची शाश्वती संपली

Next

- श्रीधर दिक्षीत बेम्बरा, ता. देगलूर, जि. नांदेड. 

यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे देगलूर तालुक्यात खरीप पिके अखेरपर्यंत सावरु शकली नाहीत. परिणामी मिळणारे उत्पन्न लागवडीला महाग ठरले. पंचमी, गणेशोत्सव आणि नवरात्र या काळात पाऊस पडेल अशी आशा होती. तीही फोल ठरली. जमिनीमध्ये आता थोडाही ओलावा नाही. अशा परिस्थितीत यावर्षी  रबीच्या पेरण्याची शक्यता नाही. 

अनेक वषार्नंतर पहिल्यांदाच शेतकऱ्यांना रबीच्या  पेरण्या करता येणार  नाहीत. पाण्याची पातळी खालावली असल्याने नोव्हेंबर महिण्यापासूनच ग्रामीण भागात  नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. नगदी पिके असलेले मुग, उडीद, सोयाबीन या पिकांना जेवढी लागवड लागली तेवढेही उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. बहुतांश शेतकऱ्यांची तूर अक्षरश: वाळून गेली आहे.  पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाची तर अत्यंत वाईट अवस्था आहे. प्रारंभापासूनच कापसावर लाल्यासह विविध रोग पडल्याने कापसाची लागवड करुन शेतकऱ्यांच्या कर्जात वाढच झाली आहे. तालुक्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ३९़५० टक्के पाऊस यावर्षी झाला. पावसाने सलग जवळपास दोन महिने पाठ फिरविल्याने रबीच्या पेरण्या शेतकरी करू शकले नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी टाळकी ज्वारीचा पेरा केला, त्याचे मोड उगवले; मात्र  जमिनीत ओल नसल्याने दोन तीन दिवसातच ते जळून जात आहे. 

खरीप हंगामामध्ये  शेतकऱ्यांनी संकरित ज्वारीचा पेराच केला नाही. आता रबीच्या पेरण्या होणार नसल्याने जनावरांना चाराही मिळणार नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उपजिविकेबरोबरच जनावरांसाठी चारा  कसा आणावा याची ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेतात पिकेच नाहीत मग शेतमजुरांच्या हाताला काम कसे मिळणार? उपासमार टाळण्यासाठी सीमावर्ती तेलंगणातील हैदराबाद येथे जाण्याची तयारी अनेकांनी सुरू केली आहे. 
पाणीसाठा गतवर्षीचाच

देगलूर शहरला पाणी पुरवठा करणाऱ्या करडखेड माध्यम प्रकल्पात व येडूर येथील साठवण तलावात गतवर्षीचाच पाणीसाठा आहे. तसेच तालुक्यातील लिंगनकेरूर, हणेगाव येथील दोन तलाव, भुतनहिप्परगा आणि अंबुलगा तलावात पाणीच नाही. पाणी पातळी दिवसागणिक खालावत असल्याने  विंधन विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत.  

रबी हंगामाला फटका बसेल 
खरीप हंगामात झालेल्या अपुऱ्या पावसाचा परिणाम रबी हंगामात निश्चित दिसणार आहे. जमिनीमध्ये ओलावा दिसत नाही. शासन निदेर्शानुसार विविध उपाययोजनांची कामे घेतली जातीलच. मागील वर्षभरात २४७ शेततळी पूर्ण झाली असून त्यामध्ये आजघडीला देखील पाणी उपलब्ध आहे. अशा शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीसाठी तुषार किंवा ठिबकचा वापर केला तर कमी पाण्यावर जास्त क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी अल्पभूधारकांना ५५ टक्के, तर बाहुभूधारकांना ४५ टक्के अनुदान मिळणार आहे 
- शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी, देगलूर. 

बळीराजा काय म्हणतो?

- १९७२ च्या दुष्काळासारखी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर एकरी पंचवीस हजार रुपयांची मदत द्यावी. जनावरांसाठी चारा छावण्या तातडीने उभ्या कराव्यात. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच उपाययोजना झाल्या पाहिजेत. - प्रकाश निवृत्तीराव पाटील, बेम्बरा 

- शेतकऱ्यांनी पदरमोड, उसनवारी करून खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. लागवडीवर जेवढा खर्च झाला तेवढेही पदरात पडले नाही. विम्याची रक्कम देऊनच भागणार नाही. अनुदान मिळाले पाहिजे आणि ते वेळेवर मिळाले पाहिजे. - बसलिंगप्पा सुलपुले, होट्टल 

- तीन वर्षांपासून दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. नजर आणेवारी झाली, प्रत्यक्ष पंचनामे किंवा सर्वेक्षण व्हावे. होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ लागत नसल्याने अनुदानाचा आधार शेतकऱ्यांना तातडीने मिळावा. - कोंडीबा गव्हाणे, अल्लापूर 

- अनेक शेतकऱ्यांना नाफेडकडून तोलाई केलेल्या मालाचे पैसे मिळाले नाहीत. २०१६-१७ मधील पीक विम्याची रक्कम, कापूस अळीचे अनुदान, भावांतर योजनेतील एक हजार रुपये अनुदान अद्याप बऱ्याच शेतकऱ्यांचा हातात पडले नाहीत. - श्रीनिवास कुलकर्णी, तडखेल 

Web Title: Drought in Marathwada: Kharif crops have gone, Rabi's season also over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.