VIDEO- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला सुरूवात, भाविकांची अलोट गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 07:28 PM2017-12-16T19:28:19+5:302017-12-16T19:31:47+5:30

मराठवाड्याची सर्वात मोठी ग्रामदेवता तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी महत्वाची यात्रा म्हणून ओळख असलेली लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा 16 ते  20 डिसेंबर 2017 या कालावधीत भरत आहे.

The beginning of Shrikhetra Milegaon Yatra, the crowd of devotees | VIDEO- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला सुरूवात, भाविकांची अलोट गर्दी

VIDEO- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला सुरूवात, भाविकांची अलोट गर्दी

googlenewsNext

नांदेड : मराठवाड्याची सर्वात मोठी ग्रामदेवता तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी महत्वाची यात्रा म्हणून ओळख असलेली लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा 16 ते  20 डिसेंबर 2017 या कालावधीत भरत आहे.

महाराष्ट्र राज्याची वैभव संपन्न सांस्कृतिक परंपरा व मराठवाड्याचे ऐतिहासिक महत्व जतन करणारी श्री खंडोबारायाची ही यात्रा नांदेड ते लातूर या महामार्गावर 50 किमी अंतरावर माळेगाव या गावी भरते. याठिकाणी महामार्गा शेजारी खंडोबा मंदिराची मोठी कमान नजरेला पडते.  महाद्वारातून प्रवेश केल्यानंतर खंडोबाचे मंदिर दिसते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी  विष्णुची प्रतिमा कोरलेली आहे. सभामंडपात प्रवेश केल्यानंतर एक अर्धस्तंभ दिसतो. या अर्धस्तंभावर एक शिलालेख कोरलेला आहे. आठराव्या शतकातील हा शिलालेख मराठी भाषेत आहे.  

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत येणाऱ्या भाविक, यात्रेकरु, व्यापारी आणि नागरिकांसाठी उपयुक्त अशी प्रदर्शन जागृत दैवत खंडोबारायांच्या समोर भरवली जाते. यात्रेचे व्यवस्थापन नांदेड जिल्हा परिषद नियोजनबद्ध करते. देवघरात खंडोबा आणि म्हाळसा यांचे चांदीचे मुखवटे आहेत. लाकडी देवघर चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे. माळेगाव यात्रेच्यावेळी श्रीची पालखी निघते. पालखीची नगर प्रदक्षिणा होते आणि देवस्वारी स्थापन करण्यात येते. 

महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरेचा आदर्श ठेऊन लोककला आणि मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी तमाशा कला महोत्सव, लावणी महोत्सव आणि कुस्त्यांच्या दंगली आयोजित करण्यात येते. त्यासाठी बक्षिसांची लयलूट होते. कुस्तीच्या आखाड्यातील फड जिंकणाऱ्या मल्लास रोख बक्षिसाबरोबर सन्मानाचा फेटा बांधून गौरविल्या जाते. कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी फळे, भाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन व स्पर्धांचे आयोजन केले जाते. पशुसंवर्धन विभागातर्फे पशु, अश्व, कुक्कुट प्रदर्शनाचे आयोजन महत्वपूर्ण आकर्षण असते. विविध विभागाची, माहिती प्रदर्शने, वाघ्या मुरळी, पोतराज, वासुदेव, गोंधळी, उद्योग दालने, संमेलन, मेळावे इत्यादी पाहून यात्रेकरु आपले मन आनंदाने हरवुन बसतो. यात्रेच्या निमित्ताने देशातील विविध भागातून सर्व जातीचे-धर्माचे नागरिक एकत्र  येतात.

Web Title: The beginning of Shrikhetra Milegaon Yatra, the crowd of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.