देशी खिचडीचा नागपुरात ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, विष्णू मनोहर यांनी शिजवली ३००० किलोची खिचडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 11:39 AM2018-10-14T11:39:53+5:302018-10-14T13:23:16+5:30

प्रख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी एकाच भांड्यात तीन हजार किलो खिचडी शिजवून पाककला क्षेत्रात एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

World record of chef Vishnu Manohar, 3 thousand kilogram khichadi cooked in a single vessel | देशी खिचडीचा नागपुरात ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, विष्णू मनोहर यांनी शिजवली ३००० किलोची खिचडी

देशी खिचडीचा नागपुरात ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, विष्णू मनोहर यांनी शिजवली ३००० किलोची खिचडी

googlenewsNext

नागपूर -भारतीय खाद्य संस्कृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी वेगवेगळ्या विक्रमाला गवसणी घालणारे नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पुन्हा एकदा नवीन विश्वविक्रम रचला आहे. नागपूरमधील महाल परिसरातील चिटणीस पार्क स्टेडियम येथे विष्णू मनोहर यांनी हा विक्रम रचला. त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तसेच राज्य सरकारमधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. 

 विश्व खाद्य दिनाच्या निमित्ताने  खिचडीला ‘राष्ट्रीय अन्न’ म्हणून घोषित करावे, यासाठी वेगवेगळे जिन्नस वापरून ३००० किलोची खिचडी एकाच भांड्यात तयार केली आहे. त्यांच्या या महाकाय रेसिपीची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिमका बुक आॅफ रेकॉर्ड, एशिया बुक आॅफ रेकॉर्ड, इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. कारण या विश्वविक्रमी उपक्रमाला यांचे संमत्तीपत्र मिळाले आहे. 

सलग ५३ तास नॉनस्टॉप कुकींगचा विश्वविक्रम करणारे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी घराघरा आणि गरीबांच्या ताटातील खिचडीला आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. जागतिक खाद्य दिनाच्या निमित्ताने त्यांनी रविवारी चिटणीस पार्कमध्ये ३००० किलोची खिचडी तयार केली. ही खिचडी तयार करण्यासाठी त्यांनी कोल्हापूर येथून खास कढई तयार केली.  ही खिचडी तयार करण्यासाठी त्यांनी ११ फुटाचा सराटा वापरला. लाकडाच्या इंधनाचा वापर करून स्वादिष्ट खिचडी तयार केली. 

विष्णूच्या या उपक्रमाला पहाटे ५.३० पासून सुरूवात झाली. विश्वविक्रम होणार असल्याने ५ परिक्षकाच्या पुढे खिचडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ५७५ किलो दाळ, ५७६ किलो तांदूळ, १०० किलो तुप, १०८ किलो मसाले, २५० किलो भाजीचा वापर करण्यात आला. सकाळी १० वाजेपर्यंत ही खिचडी तयार झाली. 
विष्णूने तयार केलेल्या खिचडीचा पहिला स्वाद केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी चाखला. यावेळी त्यांना दाद देण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. सोबतच मैत्री परिवाराचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, प्रा. विजय शाहाकार, प्रमोद पेंडके, निरंजन वासेकर, विजय जथे, मिलिंद देशकर, राजीव जैस्वाल यांचेही आयोजनात सहकार्य लाभले. या खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी अनाथालय, अंधविद्यालयाचे मुले उपस्थित होते.  या उपक्रमाला भेट देण्यासाठी येणाºयांनीही विश्वविक्रमी खिचडीचा आस्वाद घेतला. 
 

खवय्यांकडून दाद मिळत असल्यामुळे विश्वविक्रमाला गवसणी

५३ तास नॉनस्टॉप कुकींग, कॉर्न फॅस्टीव्हल असो की ३००० किलोची खिचडीचा विक्रम हे केवळ दर्दी खवय्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे होत आहे. भारतात ८० टक्के लोकांच्या घरात शिजणारी आपल्या देशी खिचडीला सरकारने ‘राष्ट्रीय अन्न’ घोषित करावे एवढीच अपेक्षा आहे. 
-विष्णू मनोहर, प्रसिद्ध शेफ 

- विष्णूमुळे भारतीय खाद्यपदार्थ आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचत आहे

पारंपारीक भारतीय पदार्थ कसे लोकप्रिय होवू शकतात, हे विष्णू मनोहर यांनी सिद्ध करून दाखविले आहे. त्यांनी खिचडी तयार करून विश्वविक्रम रचला आहे. अतिशय सुंदर खिचडी झाली आहे. भविष्यात विष्णूनी ‘विष्णू खिचडी’ हा ब्रॅण्ड तयार केल्यास चांगलाच लोकप्रिय होईल. 
-नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

 

Web Title: World record of chef Vishnu Manohar, 3 thousand kilogram khichadi cooked in a single vessel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.