महाराजबाग बंद होऊ देणार नाही : नागपूरकरांची संतप्त प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 08:51 PM2018-12-05T20:51:38+5:302018-12-05T20:55:33+5:30

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांचे महाराजबागमध्ये पालन होत नसल्यामुळे महाराजबागेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय प्राधिकरणाने घेतला. यासंदर्भातील मेल महाराजबाग प्राधिकरणाला मिळाल्याने खळबळ उडाली आहे. महाराजबाग प्राधिकरणानुसार वेळोवेळी केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला आहे. पण प्राधिकरणाकडून त्याला मंजुरी न देता, मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. महाराजबाग प्राणिसंग्रहालय बंद होणार, अशी चर्चा आज अख्ख्या शहरात होती. नागपूरकरांनी त्यावर संताप व्यक्त करून, महाराजबाग बंद होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. काही संघटनांनी यासंदर्भात आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

Will not close MaharajBagh : Angry reaction of Nagpur | महाराजबाग बंद होऊ देणार नाही : नागपूरकरांची संतप्त प्रतिक्रिया

महाराजबाग बंद होऊ देणार नाही : नागपूरकरांची संतप्त प्रतिक्रिया

Next
ठळक मुद्देकेंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने केली मान्यता रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांचे महाराजबागमध्ये पालन होत नसल्यामुळे महाराजबागेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय प्राधिकरणाने घेतला. यासंदर्भातील मेल महाराजबाग प्राधिकरणाला मिळाल्याने खळबळ उडाली आहे. महाराजबाग प्राधिकरणानुसार वेळोवेळी केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला आहे. पण प्राधिकरणाकडून त्याला मंजुरी न देता, मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला. महाराजबाग प्राणिसंग्रहालय बंद होणार, अशी चर्चा आज अख्ख्या शहरात होती. नागपूरकरांनी त्यावर संताप व्यक्त करून, महाराजबाग बंद होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. काही संघटनांनी यासंदर्भात आंदोलनाचा इशाराही दिला आहे. 


केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मान्यता रद्द करण्यासंदर्भात काही निकष पूर्ण केले नसल्याचे सांगितले आहे. यामध्ये योगासन वर्ग, मॉर्निंग वॉक, बालोद्यान वेगळे करावे, संरक्षण भिंत बांधण्यात यावी, प्लास्टिक बॅगवर प्रतिबंध, रिक्त पदे, पिंजऱ्याचे नवीनीकरण, विना परवाना वन्यप्राण्यांना मुक्त करणे, पर्यटकांसाठी आवश्यक सोयी आदी कारणे देण्यात आली आहेत. महाराजबाग हे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या अखत्यारित आहे. या महाराजबागेतील प्राण्यांची देखरेख प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर बघतात. यासंदर्भात डॉ. बावस्कर यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमानुसार महाराजबागेच्या विकास कार्यासाठी २०११ मध्ये ‘मास्टर प्लॅन’ तयार करून केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठविला. त्यानंतर त्यांनी सुधारणा करण्याच्या सूचना महाराजबाग प्राधिकरणाला दिल्या. त्यानुसार २०१२, २०१४ व २०१६ मध्ये पुन्हा सुधारित प्लॅन केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठविला. परंतु त्यालाही मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे केंद्रीय प्राधिकरणाच्या निकषानुसार विकास कामे होऊ शकली नाही. फेब्रुवारी २०१८ मध्ये महाराजबागेचा ले-आऊट प्लॅन मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मे २०१८ मध्ये प्राधिकरणाने घेतलेल्या सुनावणीत ही बाब आम्ही प्राधिकरणाकडे मांडली. त्यांनी लवकरच मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. पण आता मान्यता रद्द करण्याचा मेल धडकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यासंदर्भात प्राणिसंग्रहालय नियंत्रक एन.डी. पार्लावार यांना विचारणा केली असता, त्यांनी बैठकीत असल्याचे सांगून कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.
महाराजबाग बंद होणार हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर लोकमतने महाराजबागेत येणाऱ्या लोकांचा आढावा घेतला. अनेकांनी केंद्रीय प्राधिकरणावर संताप व्यक्त केला. छोट्या-छोट्या बाबीमुळे महाराजबाग बंद करू नये, अशी भावना व्यक्त केली. महाराजबाग वाचविण्यासाठी काही संघटना नेहमीच पुढाकार घेतात. या संघटनांनी महाराजबाग बंद होऊ देणार नसल्याचा इशारा दिला आहे.
वेळ पडल्यास आंदोलन करू
महाराजबाग नागपूरचा ऐतिहासिक वारसा आहे. मुख्यमंत्र्यांचे काका शंकरराव फडणवीस यांनी महाराजबाग प्रभात मित्र मंडळाची स्थापना केली आहे. ज्येष्ठ समाजसेवक उमेशबाबू चौबे यांनी महाराजबाग वाचविण्यासाठी संघर्ष केला होता. महाराजबाग हे नागपूरचे हृदयस्थळ आहे. अशा महाराजबागेची मान्यता रद्द करण्यासाठी केंद्रीय प्राधिकरणाने घेतलेला निर्णय योग्य नाही. उमेशबाबू चौबे मित्र मंडळ ते होऊ देणार नाही. आम्ही मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांना यात हस्तक्षेप करण्याची विनंती करू, वेळ पडल्यास आंदोलनसुद्धा करू.
दिलीप नरवडिया, सदस्य, उमेशबाबू चौबे मित्र मंडळ

गरज पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ
महाराजबाग नागपूर शहराचे वैभव आहे. निसर्गाचा आनंदासोबत वन्यप्राणीही येथे बघायला मिळतात. केंद्रीय प्राधिकरणाचे काही नियम आहेत. ते पीकेव्हीने पूर्ण करावे, त्यासाठी प्रयत्न करावे, केंद्रीय प्राधिकरणाने त्यासाठी निधी द्यावा. पण महाराजबाग बंद करण्याचा निर्णय चुकीचा आहे. आम्ही होऊ देणार नाही. प्राधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागू, तिथे दाद न मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आमची तयारी आहे.
अ‍ॅड. प्रमोद नरड, अध्यक्ष, आरोग्य आसन मंडळ
नागपूरच नाही तर संपूर्ण विदर्भाच्या दृष्टिकोनातून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले अतिशय सुंदर स्थळ महाराजबाग आहे. शेकडो वर्षांपासून महाराजबाग सुरू आहे. अविस्मरणीय वातावरण आहे. शहराचे असे हे हृदयस्थळ बंद होणे योग्य नाही. शहरातील स्थानिक राजकारण्यांनीसुद्धा हे स्थळ बंद होऊ नये, यासाठी प्रयत्न करावे.
प्रसाद देशपांडे, नागरिक

बालपणापासून महाराजबागेत येतो आहे. आज नातवाला घेऊन आलो आहे. महाराजबाग ब्युटी आॅफ सिटी आहे. नागपूरची ओळख आहे. जे कुणी बंद करीत असेल, त्याला संपूर्ण नागपुरातून विरोध व्हायला हवा.
सुधाकर चुरे, नागरिक

लहान मुलांसाठी महाराजबाग आनंदवन आहे. खेळायला-बागडायला भरपूर खेळणी आहेत. फिश अ‍ॅक्वारियम आकर्षक आहे. सोबत वाघ, अस्वल, शहामृग, मगर हे प्राणी आम्हाला बघायला मिळत आहे. हे प्राणिसंग्रहालय कधीच बंद होऊ नये.
मधुरा रेवतकर, विद्यार्थिनी

आम्ही वेळोवेळी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला आमच्या अडचणी, त्यांचे निकष यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. त्यांच्याकडून मास्टर प्लॅनला मंजुरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. असे असतानाही त्यांनी मान्यता रद्द करण्यासंदर्भात पाठविलेला मेल लक्षात घेता, आम्ही केंद्र शासनाकडे अपील करणार आहोत.
डॉ. सुनील बावस्कर, प्रभारी अधिकारी, महाराजबाग प्राणिसंग्रहालय

असे आहे महाराजबाग 

  • १९०६ मध्ये नागपूर कृषी विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर, या प्राणी संग्रहालयाचे हस्तांतरण विद्यापीठाकडे करण्यात आले़
  • भोसल्यांचा शिकारखाना म्हणून महाराजबाग प्राणी संग्रहालय ओळखले जाते.
  • भोसल्यांच्या पराभवानंतर इंग्रजांनी हा शिकारखाना ताब्यात घेतला आणि त्याचे नामकरण महाराजबाग प्राणी संग्रहालय असे केले.
  • कृषी विद्यापीठाद्वारे कोणतेही सरकारी अनुदान न घेता केवळ नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तिकीट शुल्कातूनच महाराजबागेचे संचालन सुरू आहे.
  • नागपूर शहराच्या मध्यभागी असणारे हे एकमेव हिरवळ स्थान असल्यानेही नागरिकांमध्ये या स्थळाविषयी आस्थेची भावना आहे़
  • विदर्भातील हे एकमेव प्राणी संग्रहालय असून याला यंदा १२५ वर्षे पूर्ण होत आहे.
  • प्राणी संग्रहालय दहा हेक्टरमध्ये पसरले असून येथे २१ प्रजातींचे ३००हून अधिक जंगली पशू-पक्षी वास्तव्यास आहेत़.

 

Web Title: Will not close MaharajBagh : Angry reaction of Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.