विधान भवनावर १ मे रोजी फडकवणार विदर्भाचा झेंडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 11:48 PM2018-04-07T23:48:49+5:302018-04-07T23:49:01+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी येत्या १ मे रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूरच्या अधिवेशनावर विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येईल, असा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.

Vidarbha flag hoisting on Vidhan Bhavan on May 1 | विधान भवनावर १ मे रोजी फडकवणार विदर्भाचा झेंडा 

विधान भवनावर १ मे रोजी फडकवणार विदर्भाचा झेंडा 

Next
ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समिती : १६-१७ एप्रिलला समितीचे राष्ट्रीय अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी येत्या १ मे रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने नागपूरच्या अधिवेशनावर विदर्भाचा झेंडा फडकविण्यात येईल, असा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.
शनिवारी आमदार निवास येथे समितीच्या कोर कमिटीची बैठक पार पडली. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत ज्येष्ठ नेते अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, अरुण केदार, अ‍ॅड. नंदा पराते, अरविंद देशमुख, राजू नागुलवार, विष्णूजी आष्टीकर, विजया धोटे, रंजना मामर्डे, अ‍ॅड. सुरेश वानखेडे , राजेंद्र आगरकर, मुकेश मासूरकर, अभ्युदय कोसे, भय्यालाल माकडे, रमेश गजबे आदींसह राज्य कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.
येत्या १६ व १७ एप्रिल रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या नियोजनावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या अधिवेशनात विदर्भ संसदही होईल; सोबतच व्यापार व उद्योगजगत, विदर्भ व शेतकरी समस्या यावर कविसंमेलन, गीतगायन, महिलांच्या समस्या, विदर्भाचे घसरते औद्योगिकीकरण व घसरता रोजगार यावर चर्चा होईल. अधिवेशनानिमित्त एक स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी जिल्हावार आढावाही यावेळी घेण्यात आला.
 रोजगारासाठी युवकांचे स्वतंत्र आंदोलन
विदर्भातील कंपन्यांमध्ये विदर्भातील युवकांनाच रोजगार मिळावा, यासाठी युवकांचे स्वतंत्र आंदोलन यापुढे उभारण्याचा निर्णयसुद्धा बैठकीत घेण्यात आला. बाहेरच्या व्यक्तींना रोजगार देणाऱ्या कंपन्यांपुढे आंदोलन करण्यात येईल. युवकांना रोजगार द्या किंवा बेरोजगारी भत्ता मिळावा, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात येईल.

Web Title: Vidarbha flag hoisting on Vidhan Bhavan on May 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.