उपराजधानी कृष्णभक्तीत तल्लीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:06 AM2017-08-15T01:06:05+5:302017-08-15T01:07:21+5:30

श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा सोमवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संत्रानगरी कृष्ण भक्तीच्या रंगात रंगली होती.

Vice President | उपराजधानी कृष्णभक्तीत तल्लीन

उपराजधानी कृष्णभक्तीत तल्लीन

Next
ठळक मुद्देश्रीकृष्ण जन्माष्टमी : विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा सोमवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संत्रानगरी कृष्ण भक्तीच्या रंगात रंगली होती. ठिकठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कुठे शोभायात्रा काढून कृष्णजन्माचा आनंद साजरा करण्यात आला, तर कुठे घरी त्यांना विराजमान करण्यात आले. त्यांची आराधना करण्यात आली. विविध मंदिरात धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. सकाळपासून रात्रीपर्यंत आनंददायी वातावरणात नमन करण्यात आले. मध्यरात्रीला कृष्णजन्माचा आनंद एकदुसºयांसोबत वाटण्यात आला.
गोरक्षणतर्फे विशाल शोभायात्रा
विश्व हिंदू परिषदेच्यावतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त वर्धा रोड स्थित गोरक्षण सभा येथून विशाल शोभायात्रा काढण्यात आली. आयोजनाचे हे ३३ वे वर्ष आहे. थाडेश्वर राममंदिराचे श्री १००८ महामंडलेश्वर माधवदास महाराज, स्वामी निर्मलानंद महाराज व भागीरथी महाराज पटेल यांच्या उपस्थितीत सुरुवातीला गोपालकृष्णाचे पूजन करण्यात आले. राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया आणि आमदार सुधाकर देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गो-पूजेनंतर देवाची आरती करण्यात आली. कन्हैयालालच्या जयघोषासह त्यांना विराजमान करण्यात आले. त्यानंतर शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत समाविष्ट असलेले २५ चित्ररथ आकर्षणाचे केंद्र ठरले. कॉटन मार्केटस्थित गीता मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. याठिकाणी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी कलगीधर सत्संग मंडळाचे माधवदास ममतानी, माजी महापौर प्रवीण दटके, विहिंपचे अध्यक्ष सुदर्शन शेंडे, प्रफुल गाडगे, अनुपदादा गुप्ता, रवींद्र पडगिलवार, विहिंप महिला शाखेच्या विदर्भ उपाध्यक्षा ममता चिंचवडकर, नगरसेविका श्रद्धा पाठक, श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष संतोष पापीनवार, संयोजक प्रशांत तितरे, कार्याध्यक्ष प्रदीप बंसल, मनीष मालानी, निखिल तवले, डॉ. राजेश मुरकुटे, राजेश कोल्हे, सुभाष अग्रवाल, डॉ. पंकज पटेल, अमित गाडगे, जगमोहन राठी, राजकुमार शर्मा, निरंजन रिसालदार, मनीष मौर्य आदी उपस्थित होते. संचालन संजय चौधरी यांनी केले.
वाजतगाजत निघाली शोभायात्रा
श्रीगणेशाच्या रथासह शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली. मागे मंगल कलश घेतलेल्या युवती सहभागी झाल्या. यानंतर गोपालकृष्णाचा मुख्य रथ होता. यामध्ये सहभागी आखाडा खेळाडूंनी रोमांचक सादरीकरण केले. भगवान भोलेनाथ, श्रीराम-जानकी, लक्ष्मण व हनुमान, बाबा बर्फानी, बालाजी, अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती, उंट व घोड्यांसह राधाकृष्णाचे सजीव चित्ररथ आकर्षणाचे केंद्र होते. सोबत भजन मंडळाचे पथकही होते. ढोल ताशांच्या गजराने परिसर दुमदुमला होता. ध्वजपताका घेऊन कृष्णभक्त यामध्ये सहभागी झाले होते. शोभायात्रा लोकमत चौक, पंचशील चौक, झांसीराणी चौक, लोहापूल, कॉटन मार्केट होत गीता मंदिरात पोहचली.
पोद्दारेश्वर राम मंदिर
पोद्दारेश्वर राममंदिर येथे सोमवारी जन्माष्टमीनिमित्त वैदिक मंत्रांचा पाठ करण्यात आला. कृष्णदेवाला मोर-मुकुट व बासरीसह सजविण्यात आले. गो-दुग्ध व केसरमिश्रित यमुना जलाने श्रीपुरुषसुक्त मंत्राद्वारे अभिषेक करण्यात आला. मोती आणि राख्यांनी सजविलेल्या झोपाळ्यावर श्री बालकृष्णाला विराजमान करण्यात आले. आयोजनात पोद्दारेश्वर राममंदिराचे प्रबंध ट्रस्टी रामकृष्ण पोद्दार, सुरेश अग्रवाल, पं. उमेश शर्मा, पं. रामाधार शुक्ला, पं. दिनेश शर्मा यांचा सहभाग होता.
हरिहर मंदिर
हरिहर मंदिर येथे सोमवारी रात्री डॉ. मदन महाराज काठोळे यांनी कीर्तन सादर केले. यावेळी पसर अध्यक्ष विजयबाबू क्षीरसागर, गुलाब बालकोटे, पुंडलिकराव बोलधन, चंद्रशेखर वाघ, स्वप्निल वैरागडे, भूषण क्षीरसागर, उमेश नंदनकर, हरिभाऊ कमाविसदार, पुजारी पं. जोशी यांचा सहभाग होता. यासोबतच गोरेवाडा रिंगरोड परिसरात दुपारी १२ ते ३ वाजतादरम्यान संत दयाराम बापू यांच्या संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले. मध्यरात्रीला जेएसडब्ल्यू कॉलनी, हनुमान मंदिर कळमेश्वर येथे पं. ज्वालाप्रसाद महाराज यांच्या कीर्तनासह जन्माष्टमी साजरी करण्यात आली.
इस्कॉनमध्ये आज जन्माष्टमी महोत्सव
इस्कॉनचे नागपुरातील केंद्र श्री श्री राधा गोपिनाथ मंदिराच्यावतीने जन्माष्टमी महामहोत्सवाचे आयोजन १५ आॅगस्ट रोजी राणी कोठी, सिव्हिल लाईन्स येथे करण्यात आले आहे. महापौर नंदा जिचकार यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या उत्सवामध्ये स्वरसंगम सांस्कृतिक मंचच्यावतीने श्रीकृष्ण नृत्यनाटिकेचे सादरीकरण करण्यात येईल. रात्री ८ वाजता श्री श्री राधा गोपिनाथांचा महाभिषेक करण्यात येणार आहे. रात्री १० वाजता उद्धवदास प्रभुद्वारे हरे कृष्ण महामंत्र कीर्तन व श्रीकृष्ण जन्माष्टमी कथा सादर होईल. मध्यरात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून, देवाला ११०८ प्रकारचे भोग अर्पण करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Web Title: Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.