नागपुरात जुळ्यांना जन्म देऊन बाळंतीणीचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 12:14 AM2018-03-04T00:14:44+5:302018-03-04T00:14:58+5:30

दोन मुलांना जन्म देऊन अचानक बाळंतीणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात शनिवारी पहाटे झालेल्या या घटनेमुळे मृताच्या नातेवाईकांनी हलगर्जीपणाचा आरोप लावला.

The unfortunate death of the mother by giving birth to twins in Nagpur | नागपुरात जुळ्यांना जन्म देऊन बाळंतीणीचा दुर्दैवी मृत्यू

नागपुरात जुळ्यांना जन्म देऊन बाळंतीणीचा दुर्दैवी मृत्यू

Next
ठळक मुद्देडागा रुग्णालय : नातेवाईकांनी घातला गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन मुलांना जन्म देऊन अचानक बाळंतीणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात शनिवारी पहाटे झालेल्या या घटनेमुळे मृताच्या नातेवाईकांनी हलगर्जीपणाचा आरोप लावला.
‘सिरोपॉझिटिव्ह’, साडेसात महिन्यांची प्रसुती व प्रसुतीनंतर औषधे देऊनही प्लासेंटा (वार) बाहेर न आल्याने शस्त्रक्रियेद्वारे ते काढण्याची तयारी करीत असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
नागपुरातील रहिवासी असलेल्या २६ वर्षीय गर्भवतीच्या पोटात दुखायला लागल्याने कुटुंबीयांनी शुक्रवारी रात्री १.३० वाजता गांधीबाग येथील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात दाखल केले. रात्री ३ वाजून ५ मिनिटांनी तिने पहिल्या बाळाला जन्म दिला तर दोन तासानंतर, पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांनी दुसºया बाळाला जन्म दिला. दोन जुळ्या मुलांना जन्म दिल्याने ‘प्लासेंटा’ बाहेर आला नव्हता. त्यासाठी डॉक्टरांनी औषधे दिली. परंतु दोन तासानंतरही ‘प्लासेंटा’ बाहेर न आल्याने शस्त्रक्रियेद्वारे तो काढण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला. रुग्णासोबतच विविध तपासण्यांची कागदपत्रे नव्हती. यामुळे शस्त्रक्रियेपूर्वी त्या महिलेचे हिमोग्लोबीन व इतर चाचण्या करण्यात आल्या. या शस्त्रक्रियेत रक्तस्राव होण्याचा धोका असल्याने रक्ताची जमवाजमव करण्यात आली. सकाळी ७ वाजून १७ मिनिटांनी बाळंतीणीला शस्त्रक्रिया गृहात हलविण्यात आले. शस्त्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच अचानक तिला हृदयविकाराचा झटका आला. त्यातून बाहेर काढण्याचा डॉक्टर प्रयत्न करीत असतानाच तिचा मृत्यू झाला. सकाळी ८.३० वाजता मृत्यूची माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना दिली. याला घेऊन नातेवाईकांनी शस्त्रक्रिया गृहात गोंधळ घातला. शहर काँग्रेस समितीचे सचिव इर्शाद अली व वसीम खान यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी डागा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पार्वेकर यांना घेराव घातला. याच दरम्यान पोलीसही आलेत. डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना तिच्या आजाराची माहिती दिल्यावर प्रकरण शांत झाल्याचे डागा रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
उपचारात उशीर झाला
मृताच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप लावला. ते म्हणाले, सामान्य प्रसुतीच्या नावाखाली रुग्णाकडे दुर्लक्ष केले. यात खूप रक्तस्राव झाला. शिवाय, ५ वाजेपासून ते ७ वाजेपर्यंत तिच्यावर उपचारच झाले नाही. या वेळेत तिच्यावर उपचार झाले असते तर तिचा जीव वाचला असता, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
जन्माला आलेले शिशू कमी वजनाचे
साडेसात महिन्यातच प्रसुती झाल्याने तिची दोन्ही जुळी मुले कमी वजनाची आहे. पहिले शिशु १.४ किलोग्रॅमचे असून ती मुलगी आहे तर दुसरे शिशु हे केवळ १ किलोगॅ्रमचे असून तो मुलगा आहे. दोन्ही शिशुंवर मेयोतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
शस्त्रक्रिया लांबल्या
मृताच्या नातेवाईकांनी सकाळी ८.३० वाजेपासून शस्त्रक्रिया गृहासमोर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काही तास हा गोंधळ सुरू असल्याने रुग्णालयातील शस्त्रक्रिया लांबल्या, शिवाय रुग्ण तपासणीतही अडथळा आल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पार्वेकर यांनी सांगितले.
तहसील ठाण्यात तक्रार दाखल
मृत महिलेच्या पतीने तहसील ठाण्यात जाऊन या प्रकरणाची मौखिक तक्रार दाखल केली. परंतु या संदर्भातील लेखी तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे अद्यापही करण्यात आलेली नसल्याचे समजते.
शवविच्छेदन न करताच घरी नेला मृतदेह
सुत्राने सांगितले, नातेवाईकांनी गोंधळ घातल्यानंतर डागा प्रशासनाने शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला. मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून मेयोत पाठविण्यात आला. परंतु काही दूर गेल्यानंतर नातेवाईकांनी आॅटोमधून मृतदेह आपल्या घरी नेला. मात्र पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर मेयो रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणला.
चौकशी केली जाईल
नातेवाईकांच्या आरोपावरून चौकशी केली जाईल. शिवाय ‘डेथ आॅडिट’ही केले जाईल. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे, त्याच्या अहवालानंतरच नेमके कारण सांगता येईल. परंतु तूर्तास तरी ‘पल्मोनरी अ‍ॅम्बोलिसम’मुळे महिलेचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता आहे. रुग्णालयातर्फे कुठलाही हलगर्जीपणा झालेला नाही.
-डॉ. सीमा पार्वेकर
वैद्यकीय अधीक्षक, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय

Web Title: The unfortunate death of the mother by giving birth to twins in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.