उमरेड बलात्कार प्रकरण: कोलमाफियांसाठी सुरक्षेला खिंडार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 11:02 AM2018-08-17T11:02:30+5:302018-08-17T11:05:23+5:30

कोळसा तस्करीला वाट मोकळी करून देण्याच्या प्रयत्नात अधिकाऱ्यांनी मुद्दामहून सुरक्षेला खिंडार पाडले. त्याचमुळे उमरेडनजीकच्या गोकुल खदानमध्ये सामूहिक बलात्कार करून पीडितेची हत्या करण्याचा थरारक गुन्हा घडल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

Umerad rape case: new angle of coal trafficking | उमरेड बलात्कार प्रकरण: कोलमाफियांसाठी सुरक्षेला खिंडार

उमरेड बलात्कार प्रकरण: कोलमाफियांसाठी सुरक्षेला खिंडार

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यातकोळसा खाणीतील काळे वास्तव

नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोळसा तस्करीला वाट मोकळी करून देण्याच्या प्रयत्नात अधिकाऱ्यांनी मुद्दामहून सुरक्षेला खिंडार पाडले. त्याचमुळे उमरेडनजीकच्या गोकुल खदानमध्ये सामूहिक बलात्कार करून पीडितेची हत्या करण्याचा थरारक गुन्हा घडल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. या घटनाक्रमामुळे वेकोलिच्या वर्तुळात प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
दिल्लीतील थरारक निर्भयाकांडाच्या आठवणी जागविणारे हे संतापजनक प्रकरण स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडले. त्याची सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. खदानीशी सबंधित सूत्रांकडून लोकमतने या प्रकरणामागची पार्श्वभूमी शोधण्याचा प्रयत्न केला असता अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहे. उमरेडनजीक ही गोकुल खदान आहे.
खदानीमधून रोज १०० ते १५० ट्रक कोळसा (२० ते ३० हजार टनांपेक्षा जास्त) बाहेर जातो. सकाळी ७ पासून ते सायंकाळी ६ पर्यंत कोळसा लोडिंग, अनलोडिंग आणि वजनाचे (काटा) काम खदान परिसरात चालते. कोळसा चोरी, तस्करी आणि अदलाबदलीचाही गोरखधंदा येथे चालतो.त्यासाठी ट्रकचालक, वाहकांच्या नावाखाली येथे विविध भागातील खतरनाक गुन्हेगार, कोळसा माफियांकडून पाठविले जातात. कोळसा तस्करीत अडसर येऊ नये म्हणून ते अधिकाऱ्यांचे खिसे गरम करतात. बक्कळ पैसा मिळत असल्यामुळे संबंधित अधिकारीही कोळसातस्करांना हव्या त्या सुविधा उपलब्ध करून देत त्यांच्या मार्गातील अडसर दूर करून देतात. मंगळवारी असेच झाले. अत्यंत संवेदनशील अशा या ठिकाणी धर्मकाट्यावर संबंधित अधिकाऱ्याने पीडित महिला कर्मचाऱ्याला नियुक्त केले. एरवी, त्या ठिकाणी दोन सिक्युरिटी गार्ड असतात. मंगळवारी येथे खाण व्यवस्थापकाच्या मर्जीतील व्यक्तींचे ट्रक तेथे कोळसा घेण्यासाठी येणार असल्यामुळे अडसर नको म्हणून दोन्ही गार्ड तेथून दुसरीकडे हटविल्याची चर्चा आहे. त्याचमुळे ट्रकचालक-वाहकाच्या रूपात तेथे आलेल्या गुन्हेगारांनी दिवसाढवळ्या पीडित महिलेची अब्रू लुटली अन् आपले पाप लपविण्यासाठी तिची दगड-कोळशाने ठेचून निर्घृण हत्या करण्याचा प्रयत्न केला.

अधिकाऱ्याचा दोष उघड ?
या प्रकरणाने केवळ नागपूर-विदर्भच नव्हे तर संपूर्ण वेकोलि वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. वेकोलिच्या वरिष्ठांनी दोन दिवसांपासून या प्रकरणाला कुणाचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे, त्याची चौकशी चालवली आहे. ज्या ठिकाणी ठिकठिकाणचे ट्रकचालक येतात, ज्यातील अनेकजण दारू, गांजा, अफिमच्या नशेत टून्न असतात, त्या ठिकाणी एका महिलेची ड्युटी लावण्यामागे कोणता उद्देश होता, तेथून दोन्ही गार्ड का हटविण्यात आले, त्याची चौकशी केल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणाला खाण व्यवस्थापक जी. एस. राव यांचा हेकेखोरपणा जबाबदार असल्याची माहिती पुढे आल्याचे समजते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे. या संबंधाने राव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Web Title: Umerad rape case: new angle of coal trafficking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.